Monday, 26 August 2019

चित्रचारोळी ( जन्म )

उपक्रम

चित्रचारोळी

जन्म

सुखात जीवन उदरातले
बाह्य जगात असुरक्षित
उलटी दुनियादारी पहा
वैद्यकीय हातात सुरक्षित

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 24 August 2019

चारोळी ( माझी मैत्रिण )

झटपट चारोळी स्पर्धेसाठी

विषय - माझी मैत्रीण

श्वास माझा माझी मैत्रीण
विश्वास सदैव आत्मीयतेने
सुखदुःखाची खरी साथीदार
केले मन रिते भावनिकतेने

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Tuesday, 20 August 2019

कविता ( उसासा )

उपक्रम

कविता

उसासा

अवकाळी पावसाचा मारा,
अवचितच धरणीवरती आला.
पाहता पाहता सभोवतालचा,
सर्व भाग पाण्याखाली आला.

नव्हता वेळ कुणाकडेही,
टाकण्याला उसासा क्षणाचा.
श्वास दबले हुंदक्यातच,
ठाव उडाला मनाचा.

वाहिला संसार पाण्यात,
घरदार धारेला लागले.
झाली वाताहत कुटुंबाची,
मन चडफडू लागले.

टाकून उसासा दु:खाचा,
जनसागर हताश झाला.
शून्यातून संसार कसा उभारु,
एकमेकांना विचारु लागला.

सगळे एकाच नावेतील प्रवासी
आता उसासाच आहे सोबती.
समजून परदु:ख आपलेच,
एकमेकां सहाय्य करती.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.

Monday, 19 August 2019

चारोळी ( दिलदार )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - दिलदार

झरा माणुसकीचा वाहतो
अखंड मानवतेच्या मनात
दिलदार मित्रांच्या साथीने
अजरामर नांव जनांत

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 18 August 2019

चारोळी ( नाते बहिण भावाचे )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - नाते बहिण भावाचे

नाते बहिण भावाचे अजोड
नाही कधीही तुटायचे
आईवडिलांनी सिंचलेले रोपटे
कधीच ना वठायचे.

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Thursday, 15 August 2019

चारोळी ( देशभक्ती )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय-- देशभक्ती

भारतमातेच्या रक्षणासाठी
वीरांनी केले बलिदान आपले
देशभक्ती ही अशीच असते
पोकळ बातांचे नकोत इमले

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

मुक्तछंद ( जखमा हृदयाच्या )

स्पर्धेसाठी

मुक्तछंदातील कविता

विषय- जखमा हृदयाच्या

खोल गेल्या दु:ख देत
जखमा आज हृदयाच्या
निसर्गाच्या अवकृपेची
पाहिली मी दर्दभरी कहाणी
कोठून कशा आल्या धारा पावसाच्या..
लोंढा पाण्याचा काळ बणून आला भरवस्तीत.
हाहाकार माजला सगळीकडे
जनता हवालदिल झाली.
अशी कशी निसर्गाची अवकृपा झाली.
बरसला मेघराजा वेड्यासारखा,
सैरावैरा धावला मानव भेदरलेल्या कोकरासारखा.
आली कृष्णामाई धावत, प्रत्येकाला घेत कवेत.
गेले घरदार पाण्याखाली
संसार सारा वाहून गेला.
डोळ्यादेखत जनावरांना,
बुडताना पाहून जीव गेला.
छीन्नविछीन्न हृदय झाले,
भावनांचा सुटला बांध.
जखमा हृदयाच्या भरतील का ?....आता.
कोण आहे आमचा त्राता ?
निसर्गाची करणी का चूक मानवाची ?
विचार कर मानवा ,वागणे बदल,
आतातरी निसर्ग रक्षणासाठी पावले ऊचल.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Wednesday, 14 August 2019

चित्रचारोळी ( परतफेड )

उपक्रम

चित्रचारोळी

परतफेड

परतफेड निसर्गाने केली
दिलेलं सारं साभार पोहचवले
प्लॅस्टिकची दुनियादारी भोवली
मानवाचे जीवन टांगनीला लागले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 12 August 2019

चित्रचारोळी ( ललना )

उपक्रम

चित्रचारोळी

केशसंभार सोडून निघाली
उगवतीकडे अनवाणी ललना
लालपांढरी साडी सावरत
अधीर सूर्याची लाली पाहताना

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( लग्नगाठ )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

विषय -- लग्नगाठ

सहजीवनाची वाट
होते सुकर चांगली
लग्नगाठ बसताना
मना आतुरता आली

आली सोडून माहेर
जाण्या सासरी लाडकी
माहेरच्या घरातली
दाखवण्या माणुसकी

झाला मंत्रोच्चार छान
वरमाला गळ्यामध्ये
नजरानजर झाली
स्नेह दिसे डोळ्यामध्ये

विधी विधानांची नांदी
लग्नगाठ बांधलेली
सुकुमार सकवार
वधुकन्या लाजलेली

गोड स्वप्नांचा इमला
साकारण्या सुरु झाला
गोड जीवनात आता
मोद आपसूक आला

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 11 August 2019

चारोळी ( प्रलय येता )

उपक्रम

चारोळी

प्रलय येता

प्रलय येता हाहाकार माजतो
चराचराची हतबलता दिसते
जातीभेदाच्या भिंती पाडून
माणुसकी मात्र पहायला मिळते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर.

Saturday, 10 August 2019

द्रोणकाव्य ( अशा या सांजवेळी )

स्पर्धेसाठी

द्रोणकाव्यलेखन

विषय -- अशा या सांजवेळी

अशा या सांजवेळी
   मन बावरते
    धुंदीत गाते
      नादावते
       हसते
        गाते
         मी

अशा या सांजवेळी
  पाऊस बरसे
  काही ठीकाणी
    ते तरसे
    न मिळे
     पाणी
       हो

अशा या सांजवेळी
  पूर पावसाचा
    अनुभवला
      नयनांचा
        बांधच
          फुटे
            हा

अशा या सांजवेळी
  दिसे मानवता
   नष्ट दुष्टता
   ही धन्यता
     मिळे
       हो

अशा या सांजवेळी
  शोध मानवाचा
  घ्यावा सुखाचा
   हसण्याचा
    आनंद
     सदा
      घ्या

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 9 August 2019

कविता ( थैमान पुराचे )

काव्यस्पर्धेसाठी

विषय -- थैमान पुराचे

संततधार पावसाने घातले,
सगळीकडेच थैमान पुराचे.
हाहाकार माजला धरणीवरी,
पाहून रौद्ररूप पावसाचे.

कल्पनेच्या पलीकडले सारे,
अंदाज साऱ्यांचाच चुकला.
नाही नाही म्हणता मानवाचा,
संसारच पाण्यात बुडाला.

नदी,ओढे,नाले,भरले दुथडी,
रस्तेही गायब पाण्याखाली.
बघता बघता घरेदारे गेली,
क्षणात सारी वाताहत झाली.

मिळाली जलसमाधी येथे,
कितीक निरपराध्यांना.
आईच्या कुशीतले पाहून बालक
पाझरच फुटला पत्थरांना.

तोडून बंधन जातीपातीचे,
मानव धावला मदतीला.
माणूसकीचे दर्शन झाले,
तोड नाही इथल्या एकीला.

कवयित्री ©®

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

कविता ( कोप निसर्गाचा )

कविता

कोप निसर्गाचा

जातपात विसरून जनता ,
कामास की हो लागली.
नाही काही आड आले,
सारी मदतीसाठी धावली.

भेद सारे मावळून गेले,
वैरत्व कुठेच नाही दिसले.
भेदभाव सारा गळून गेला,
सर्वत्र बंधुत्वच अनुभवले.

पाण्याच्या महापूरात ,
माणुसकी जागी झाली.
आता कळेल जनतेला,
जातियतेची ठिणगी कुणी पेटवली

संकटे येतात शिकवायला,
खरा माणूस ओळखायला.
दोस्त का शत्रू समजवायला,
खरे जीवन दाखवायला.

पाण्याबरोबर वाहून गेला,
अहंभाव अन् दंभ मानवाचा.
आगतिक मानव निसर्गापुढे,
रोष पाहून पर्यावरणाचा.

मारल्या बाता विज्ञानाच्या,
हतबलता दिसून आली.
निसर्गमातेच्या कोपापुढे,
सारी नतमस्तक झाली.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 8 August 2019

कविता ( कृष्णामाई )

कविता

कृष्णामाई

संथ वाहणारी कृष्णामाई,
अशी कशी कोपलीस ?
काय चुकले आमचे माते,
जरा थांबून सांगशील ?

नको कोपू अशी आमच्यावर,
सगळीच तुझी गं लेकरे.
जातील कुठे,कशी सारी ?
सारीच तुझी अजाण पोरे.

गल्लीबोळातून ,घराघरातून,
सानथोरांच्या झोपडी महालातून
नाही सोडलीस कुठलीच जागा
अशी का चिडलीस मनातून ?

थांब आता ,विचार कर जरा,
बाळगोपाळांच्या मनाचा.
नको कालवू माती आता,
विचार कर त्यांच्या आनंदाचा.

कीती गेले बळी निरपराध,
दोष त्यांचा सांगशील का ?
कृष्णामाता लेकरांची तू ,
आतातरी थांबशील का ?

काय हवे तूला सांग मला,
चूक आमची मान्य आहे.
पर्यावरण रक्षणासाठी आता,
सदैव दक्ष राहणार आहे.

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 7 August 2019

कविता ( सरींनो घ्यावी आता विश्रांती )

उपक्रम

सरींनो घ्यावी आता विश्रांती

आहे आकाश भरलेले गच्च
जमीनीवर सर्वत्र ओले कीच्च

पाट पाण्याचे अलोट वाहती
जाताना बरोबर संसारही नेती

गल्लीबोळातून नदी पळते आहे
ओलाव्यातचं आग पेटली आहे

आवडत्या सरी नावडत्या झाल्या
धारा अश्रूंच्या डोळ्यातून वाहिल्या

कौतुक चार दिवसांतच संपले
जनजीवन विस्कळीत झाले

सरींनो घ्यावी आता विश्रांती
बोल हे आले विचाराअंती

नको असा कोपू हे मेघराजा
कीती झाला तुझा गाजावाजा

विनंती हात जोडून करती सारे
आलास तसा मेघा आता जारे

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 3 August 2019

चित्रचारोळी ( हिरवाई )

उपक्रम

चित्रचारोळी

हिरवाई

गर्द हिरवाईच्या बाहुपाशात
दोन पर्वतराजी विसावल्या
निळ्या आकाशात वरती
मेघांच्या रांगा लागल्या

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर