Monday, 31 August 2020

चारोळी (धक्का)

चारोळी

धक्का

सुखाचा असो की दु:खाचा 
धक्का धक्कादायक असतो
नयनी अश्रू तर वदनी हसू
भावनांचा बांध सावरत नसतो 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (नववधू )

चित्रचारोळी

नववधू

नववधू मेहंदीने रंगली
सलज्जता गाली आली 
भरजरी शालू जरतारी कंचुकी
गजऱ्यासह अलंकाराने नटली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( ललना )

चित्रचारोळी

ललना

भरजरी वसने लाल वर्णी
अलंकाराने सजली काया
सलज्ज वदनी हास्य शोभते
गजरा कुंतली अत्तराचा फाया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( रोपाला जपा )

चित्रहायकू

रोपाला जपा

रोपाला जपा
जाईल पायदळी
भाग्य उजळी

थांब मानवा
तुझे पाय थांबव
जरा लांबव

बीज अंकुरे
प्रकटते पालवी
जीव घालवी

जगण्यासाठी
कर प्रयत्न करे
हाताने धरे

जपा प्रकृती
सर्वांनाच जपेल
जीव जगेल

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( जनजागृती )

चारोळी

जनजागृती

हटवण्या महामारीला 
जनजागृती खूपच झाली
घातली कीती बंधने तरीही
हाती फक्त निराशाच आली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

गणपतीची आरती

स्पर्धेसाठी

विषय- गणपतीची आरती

अक्षरसंख्या 12,यती 6 व्या अक्षरावर
शिर्षक- श्रीगणेशा

जय जय देवा, जय श्रीगणेशा,
पूर्ण करिशी तू , भक्त अभिलाषा ।। धृ ।।

प्रसन्न वाटते,तुझ्या दर्शनाने।
खावून मोदक,खूष वदनाने।।
कृपा राहो तुझी,ही मनीची आशा ।। 1 ।।

तूच विघ्नहर्ता,तूच एकदंता।
मिळे यश आम्हा,तुजला वंदिता ।।
खात्री असे सर्वां,ना होई निराशा ।। 2 ।।

फुल जास्वंदाचे,आवडे मोदक।
ज्ञानाचा द्योतक,बुद्धी ही शोधक ।।
सदैव गातो मी,स्तुती परमेशा ।। 3 ।।

कोड नंबर LMD 167

कविता (सखी-सावित्री फातिमा )



विषय- ज्ञानज्योती फातिमामाई

शिर्षक- सखी सावित्री-फातिमा

समाजव्यवस्था ओलांडली,
तोडून शृंखला परंपरेच्या.
सहकार्य वृत्तीने देऊन आसरा,
कामी आली फुले दांपत्याच्या.

वाडा भिड्यांचा पावन झाला,
शिक्षणगंगा पाहून दारी.
बंधुराजांच्या प्रोत्साहनाने,
फातिमा भरुन पावली उरी.

उद्धार करण्या स्त्रीवर्गाचा,
सखी सावित्री तेथे श्रमली.
ज्ञानदानाची पावन सरीता,
समाजात आणून सोडली.

साहिला तत्कालीन असंतोष,
ना ढळले धैर्य समाजासमोर.
साथ सावित्रीची ना सुटली,
ना झुकली कधी ध्येयासमोर.

प्रथम महिला अध्यापिका,
ठरली मुस्लिम समाजातील.
शिकवून शहाणे केले सहजी,
माता भगिणी परिसरातील.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

कविता दशपदी( सुरक्षेची ढाल )

उपक्रम

काव्यप्रकार-दशपदी

विषय-हृदयात वसे तूच

शिर्षक- सुरक्षेची ढाल

समजले तुम्ही सुरक्षेची ढाल,
नाहीतर झालो होतोच बेहाल.

चौकाचौकात उभे सजगपणे,
प्रयत्न खूप केला सहजपणे.

रस्त्यावर,सर्वत्र सफाई केली,
रोगराई हटण्यास सज्ज झाली.

डॉक्टर दिनरात राबती जरी,
सेवाभावच सदैव त्यांच्या उरी.

आरोग्य कर्मचारी हा सोसतोय,
सुख सर्वांनाच कष्टून देतोय.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 27 August 2020

कविता (जगण्याची चोरी झाली )

उपक्रम
विषय- जगण्याची चोरी झाली
शिर्षक- अस्तित्व

अस्तित्व टिकवून ठेवताना,
जगण्याची चोरी झाली.
नाती जुळवताना आता,
संशयाने गिरकी घेतली.

आली कुठुन ही महामारी,
विश्वास जगण्यावरचा उडाला.
अदृश्य शत्रूवर वार करताना,
शस्त्र कोणते?संभ्रम पडला.

बंद झाल्या भेटीगाठी,
भितीने पसरले पाय.
मरणानंतर सरणावरही
स्वकीय दूर लोटले जाय.

भिक्षा मागती जगण्यासाठी,
नाही उपाय हाती सापडला.
जगण्यावरचा प्रत्येकाचाच,
हक्क हिरावून कुणी नेला?

क्षणभंगुर झाले जीवन,
मृत्यू झालाय स्वस्त.
जीवनदान देण्यासाठी,
जीवरक्षक आहेत व्यस्त.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 26 August 2020

हायकू ( चढण )

हायकू

चढण

आयुष्यातील
चढण भावनांचे 
नाना रुपांचे

निसर्गाच्या
कुशीतले चढाव
शौर्य बढाव

डोंगरावर
पायवाट सुंदर
छान मंदिर

चढून जावे
पायऱ्या अवघड
त्या अनगढ

कळस दिसे
उंचीवर रेखीव
आहे आखीव

लाल रंगाच्या
उधळण मातीची
समाधानाची

गातात पक्षी
मधूर आवाजात
सुख देतात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 25 August 2020

कविता (साथ )

उपक्रम

चित्रकाव्य

साथ 

हातात हात घेऊन प्रेमाने,
युवा तरुण पुढेपुढे चालले.
कुंपण देते साक्ष प्रितीची,
रक्षण्या बाजू उभे ठाकले.

हिरवळ शोभे पायवाटेला,
जणू चालले बागेत जोडीने.
नीलवर्ण वसने अंगावरती,
सौंदर्य वाढले तिचे साडीने.

वारा अवखळ खोड काढतो,
केशसंभाराशी खुशाल खेळतो.
अलगद हलवून बाजूस सारतो,
कुंतल हलके गळ्यात माळतो.

साथ एकमेकांना देती,
नजर करती गप्पा प्रेमळ.
कणखर करांनी मृदुल करांचा,
दिले आश्वासन सोज्वळ.

पाऊल पडती मार्गक्रमण्या,
पोहचण्या यशोशिखरावरी.
साथ अखंडित एकमेकांची,
राहिल असेल जर जिद्द उरी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू( गौराई )

उपक्रम

हायकू

विषय - माझी गौराई

माझी गौराई
सालंकृत सजली
घरात आली

पानाफुलांची
एकजीव बांधणी
सजे प्रांगणी

हळदकुंकू
लावला माथ्यावर
वस्त्र सुंदर

प्रतिष्ठापना
श्रींपुढे आनंदाने
गोड गळ्याने

भाजी भाकरी
नैवेद्य दाखविला
प्रसाद दिला

गौराई गाणी
गाती स्त्रिया जोशात
विना पाशात

करुनी पूजा
रोज भक्तीभावाने 
दोन कराने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रहायकू( खोपा )

चित्रहायकू

खोपा

सुगरणीचा
खोपा हा अधांतरी
टांगला वरी

तारेवरती
लटकत राहिला
पक्षी बंगला

धोकादायक
जिवावर उदार
असा आधार

दोन ओळीत
भरपूर घरटी
दिसते दाटी

आकाशाखाली
उन्हात पावसात
होतो आघात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 22 August 2020

चित्रचारोळी ( गणपती बाप्पा )

चित्रचारोळी

गणपती बाप्पा

जरीपटक्यात शोभला गणेश
धोती अतीसुंदर नीलवर्ण
सर्वांगावर आभूषणे चमकती
सिंहासनावर विराजे धुम्रवर्ण

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 12 August 2020

कविता ( घरकुल )

रोज एक कविता चित्रकाव्य स्पर्धेसाठी
चित्र क्रमांक - 2

घरकुल

घरकुल आहे छोटे छोटे,
पण सुंदर नी टुमदार दिसे.
इवले इवले शोभून दिसते,
इवल्या इवल्या खांबावर वसे.

वसे खोडाच्या मध्यभागी,
जरी निष्पर्ण झाला सगळा.
एकच पर्ण पिवळे लटकते,
आहे हा नजारा असा वेगळा.

भासते घरटे चिमण्या पिलांचे,
लाकडी बारीक पट्ट्यांचे.
छोटासाच जिना बोलावतो,
चढून त्यावर दृश्य पाहण्याचे.

जमिनीवरती झुडपे उगवली,
जणू भासती काटेरी कुंपण.
रक्षण्यास ती तयार सदैव, 
सुरक्षित भासे सारे अंगण.

पांढऱ्या फुलांची नक्षी शोभे,
लाकडाच्या लहान भिंतीवर.
धुराडेही काळे काळे दिसे,
सोडण्या धुर वर छतावर.

छोटे प्राणी दिसती बसलेले,
उतरत्या छपरात निवांत.
निवाऱ्यात सुरक्षित असती,
जरी बाहेर कीतीही आकांत.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

कविता ( पाऊस )

रोज एक कविता चित्रकाव्य स्पर्धेसाठी
चित्र क्रमांक - 1

पाऊस

पाऊस आला पाऊस आला,
आनंदाने नाचू गाऊ चला.
चल गं ताई चल जाऊया,
पावसात चिंब भिजू चला.

निळ्या पोशाखात शोभतेस,
आहे पँन्ट निळीच माझीही
चॉकलेटी सदरा माझा छान,
पिवळ्या बाह्या तुझ्याही.

मुसळधार पावसाच्या सरी,
झेपावतात शरीरावर सलग.
नाही करु शकत आपण,
त्यांना आपल्यापासून अलग.

प्रतिबिंब आपले सुंदर दिसते,
जमिनीवरील पाण्यातले.
पाणी टपटप गळत आहे,
तुझ्या माझ्या केसातले.

नाच आपला पावसातला,
निखळ आनंदाचा जणू झरा.
तोड नाही याला कशाचीही,
चल झेलू या गारगार धारा.

पसरले हात धरण्या थेंबांना,
धरु पाहता येई न हाता.
मोहरले सारे तनमन खुशीत,
चिंब भिजायला पावसात जाता.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Monday, 10 August 2020

चित्रहायकू (मोर )

चित्रहायकू

मोर

दगडावर
वेलींनी वेढलेल्या
नख्या रोवल्या

पक्ष्यांचा राजा
डौलाने आहे उभा
भरली सभा

तिरकी मान
निळ्याशार रंगात
छान ढंगात

लांब शेपूट
सौंदर्याचा नजारा
मोरपिसारा

तुरा शोभला
सुंदर शिरावर
मना आवर 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 9 August 2020

कविता ( क्रांती )

कविता

क्रांती

रक्षण्या भारतमातेचा सन्मान,
पेटून उठले स्वातंत्रवीर महान.
घेऊन हाती मशाल क्रांतीची,
पेटवण्या सज्ज झाले जहान.

प्रेम स्वातंत्र्याप्रती भरलेले,
सज्ज घेऊन प्राण हाती.
लावला टिळा स्वरक्ताचा,
स्वाभिमानाने आपल्या माथी.

लढले क्रांतीवीर वेडे होवून,
रक्तरंजित केली आनंदाने.
माथी लावण्या भारतमातेच्या,
यशस्वी कुकुंमतिलक त्वेषाने.

यशपताका क्रांतिकारी,
बलिदानाने पावन झाली.
स्वातंत्र्याच्या वेदीवरती,
आहुती प्राणांची दिली.

धन्य भारतमाता वदली,
ऋणानुबंध हे कायम राहतील
हजार निपजतील शूरवीर 
अभिमानाने जगी वदतील.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 7 August 2020

चारोळी ( जिवलगा )

चारोळी
जिवलगा

जिवलगा तू असा बिलगला 
जसा वारा बिलगे वृक्षाला
हलवून टाकतो पान न् पान 
तसा थरार माझ्या कायेला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 6 August 2020

चारोळी ( सहन )

सहन

नाही सहन होत आता 
कोरोनाची ही घुसखोरी 
स्वकीयांच्या ताटातूटीने 
जणू वाटतो हा अघोरी

श्रीमती माणिक नागावे

चारोळी (पूर )

पूर

पूर भावनांचा दाटला उरी
ओसंडण्या अधीर शब्दांतून
शब्दफुलांच्या लाटेमधुनी
वाहू लागल्या मनामनातून.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( पूर )

चारोळी

पूर पाण्याचा धरणातला
जलधारा उत्सुक वाहण्याला
नदी दुथडी भरुन वाहते
सुजलाम सुफलाम करण्याला

रचना
श्रीमती माणिक नागावे

द्रोणकाव्य ( श्रावणधारा )

स्पर्धेसाठी

द्रोणकाव्य

विषय- श्रावणधारा

श्रावणधारा आल्या 
बरसल्या अशा 
भिजून गेल्या
पोरीबाळी
हासल्या
गोड
त्या

झेपावल्या जोरात
धरणीवरती
खूप वेगात
सरसर
तालात
सरी
त्या

चराचर भिजले
पालवी फुटली
आनंदी झाले
सर्वजण
नाचले
धरी
या

मांदियाळी सणांची 
उत्साह भरला
जोड मनांची
आज झाली
खाण्याची
मौज
हो

उन्हाची पावसाची
लपाछपी चाले
मोरपीसाची
रोज दिसे
रंगाची
छटा
ही

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 4 August 2020

कविता ( मोबाईल )

कविता

मोबाईल

आला जमाना मोबाईलचा,
नांदी ऑनलाइन शिक्षणाची.
अशी पसरली एक महामारी,
झाली दारे बंद विद्यालयाची.

आप्तस्वकीय दूरदेशी गेले,
आसुसला जीव भेटण्याला.
हाती मोबाईल काय आला,
समोर उभा आप्त बोलण्याला.

कार्यालयीन कामकाजासाठी,
आला धावून सखा मोबाईल.
मांडले विचार वेबिनार झाली,
शंका साऱ्या निघून जातील.

नको तार ना टपाल पाठवायला,
मोबाईल आहे उभा दिमतीला.
निरोप कळतो तत्परतेने,
असो मित्र लांब दूरदेशीला.

जेवढा उपयोगी तेवढा घातक,
ठरवायला हवी पद्धत वापरायची.
म्हटलं तर आबादी नाहीतर बरबादी.
योग्य रीत आपणच ठरवायची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 3 August 2020

हिंदी कविता ( ये बंधन तो राखी का बंधन है )

काव्य प्रतियोगिता के लिए

विषय- ये बंधन तो राखी का बंधन है

आया त्यौहार राखी का सुहावना,
भाई बहन के प्यार का तराना।
ये बंधन तो राखी का बंधन है,
सब मिलकर मौज मनाना ।

रेशम डोर कहो या धागा,
प्यार ही प्यार बसा है इसमें।
एकदुजे के दिलका आईना है,
साफदिल छवी दिखती जिसमें।

कलाईपर बांधा रेशम का धागा,
तिलक कुंकुमका लगाया माथेपर।
आरती की शुभकामना के साथ,
जच रही राखी भाई के हातपर।

वादा रक्षा का करता भाई,
उपहार प्यारसे देता भाई।
चमक उठी आँखे बहनाकी,
चेहरेपे उसके खुशी आई।

आशिष लेता तो कभी देता,
भाई छत्रछाया सदा देता।
इसी प्यार के बलपर रहती,
जीवन उसका आनंदसे बितता।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर