Wednesday, 28 November 2018

चारोळी ( समाधान )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - समाधान

यशस्वी जीवनाच्या वाटेवरती
समाधान ठरते खरी शिदोरी 
नका थारा देऊ विकारांना मनी 
चालेल मग त्यांचीच शिरजोरी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( वेडी माया )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - वेडी माया

तारते संकटातून धैर्य देते
तीच असते आईची वेडी माया
साहे लाख यातना अपमानाच्या
झिजवून आपली सोशिक काया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Sunday, 25 November 2018

शृंगार रस ( पैंजण बांधताना )

शृंगार रस

विषय - पैंजण बांधताना

कोमल ,सुंदर तव पावले,
दिसली मजला सहजच.
रंग गोरा दिसला मजला ,
वाकून तू पैंजण बांधताना.

काटा ऊभारी मम शरीरावर,
रोमांचित झाली माझी काया.
नाजूक पाऊल नयनी ठसले,
कर आसुसला स्पर्श कराया.

शहारली तव कोमल काया,
हात फिरे चरण कमलावरी.
आरक्तली लाज लोचनी,
धडधड वाढली आज ऊरी.

मूऊमऊ , नितळ पाय ते ,
ठोके वाढले  हृदयात सजने.
ऐकुन पदी पैंजण वाजताना,
विसरलो मी मलाच ललणे.

अदा तुझी पाहता मोहिणी,
जीव कामातूर गं झाला.
नको छेडू तू तारा मनीच्या,
प्रितगंध हा भरून वाहिला.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड जिल्हा. कोल्हापूर

बालकविता ( बाहुली )

बालकविता

विषय- बाहुली

गोबऱ्या गोबऱ्या गालांची,
निळ्या निळ्या डोळ्यांची.
ईवलुसे नाक ऊडवणारी,
माझी बाहुली फार प्रेमाची.

रंगीत रंगीत कपडे घालून,
माझ्या जवळ रोज बसते .
सगळं काम अन् अभ्यास सोडून,
मी तिला सजवत राहते.

डोळे फीरवते गरागरा ,
झगा फुगवते भराभरा .
ईटुकल्या ओठातून ,
म्हणते आवरा, आवरा.

कानात डूल सुंदर,
हलते डुलुडुलु छान.
मैत्रीणत माझ्या पहा,
बाहुलीचाच माझ्या मान.

नाही करमत मला,
बाहुलीशिवाय माझ्या.
नाही येत मला आता,
तीच्याशिवाय कशातच मजा.

या या सगळे खेळू ,
बाहुलीला घेऊन खेळू.
आनंदाने ईकडेतिकडे,
बेधुंदपणे आता पळू.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (संविधान- आम्ही भारतवासी )

स्पर्धेसाठी

भारताचे संविधान

शिर्षक -- आम्ही भारतवासी

मी नसून आम्हीत सामावलेले,
भारतवासियांच्यासाठी लिहलेले.
महामानवाच्या पावन सिद्धहस्त ,
लेखनीतून सहज पाझरलेले.

गर्भित सार्वभौमित्व भारताचे,
समाजवादी विचारांनी भरलेले.
देतसे धर्मनिरपेक्षतेचा नारा ,
लोकशाहीतून एकता साधलेले.

समाजातील सर्व घटकांना ,
दिले स्थैर्य सामाजिक विचारांचे.
स्वातंत्र्य विश्वास अन श्रद्धेचे
रुजवले बीज मनी समानतेचे.

साधण्या प्रतिष्ठा राष्ट्राची ,
वदली महत्ता एकात्मतेची . 
प्रवर्धित करण्या बंधुता  ,
जागवली ज्योत संकल्पनेची.

निर्धारपूर्वक अंगीकृत करण्या,
बांधील सर्व प्रिय भारतवासी .
संविधान हे भारताचे आहे ,
ठेऊ सदैव याला हृदयापाशी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Saturday, 24 November 2018

चारोळी ( लग्न )

चारोळी

लग्न

कुटुंबाच्या परीपूर्णतेसाठी
लग्न सोपस्कार गरजेचा असतो
सुरवातीला हवासा वाटणारा
आयुष्यभर टिकवण्यात कस लागतो

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Thursday, 22 November 2018

अभंग रचना (मनाचिये गुंफी )

स्पर्धेसाठी

अभंग रचना

विषय - मनाचिये गुंफी

ध्यानस्त बसोनी ।
शांतता मिळाली ।।
अशांती पळाली ।
वेगात हो..।। १ ।।

मनाचिये गुंफी ।
विचार चांगला ।।
मदती धावला ।
सद्विचार ।। २ ।।

मनाचिये गुंफी ।
विवेक जागला ।।
अविवेक गेला ।
प्रसन्नता ।। ३।।

मनाचिये गुंफी ।
प्रेमाचा सागर ।।
करु भव पार ।
सहजच ।। ४।।

मनाचिये गुंफी ।
पावन प्रसंग ।।
झाले आज दंग ।
आपोआप ।। ५ ।।

देवाचा गजर ।
अखंड चालला ।।
साधक बोलला ।
सुवचने ।। ६ ।।

मन हे रंगले ।
तुझीयाच पायी ।।
वाणी गाणी गाई ।
तुझीच रे ।। ७ ।।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 17 November 2018

मुक्तछंद काव्य ( परंपरा )

मुक्तछंद काव्य स्पर्धेसाठी

विषय - परंपरा

देश माझा भारत महान
जगी विलसते याची शान.
दुमदुमतो हा भव्य नारा
भारतमाताकी जय बोला.
परंपरा याची महान जगती
सर्वधर्मसमभाव आनंदे नांदतो .
सर्वधर्मसहीष्णुता म्हणती प्रेमे
बंधुभाव सतत वर्धिष्णू असे ईथे.
गुण्यागोविंदाने नांदती भाऊ आणि भैय्या ..
अनेक वेष,धर्म अन् जातीपंथ
जसे कमलदलातील पाकळ्या अनेक एकसंध राहती.
मंदिर मस्जिद, गुरुद्वारा, चर्च अन् अग्यारी जरी असले अनेक,
प्रेमभाव, देशप्रेम एकच असे.
परंपरा ही पाहुणचाराची खंड नसे यात कधीही..
प्रेमभावे स्वागत असे पाहुण्यांचे.
जीव देती जीवाला,ईमान ईथले थोर शिवबांचे अन् ज्योतीबांचे.
माता जिजाऊ, अहिल्या ,सावित्री
प्रेरणास्थान स्त्रीजातीचे ठरले.
वेद, पुराण, रामायण, महाभारत , कुराण,बायबल,ग्रंथसाहिब
ग्रंथ थोर ठरती मार्गदर्शक.
देश माझा गौरवशाली भारत .
सस्नेह वंदन लाख मनस्वी .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Thursday, 15 November 2018

हायकू ( मौज थंडीची )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय - मौज थंडीची

मौज थंडीची
आज आपण घेऊ
आनंदी गाऊ

बचाव करु
स्वेटर अंगी घालू
थंडीला झेलू

मफलरच
डोक्यावर गुंडाळू
लाकडे जाळू

शेकोटी पेटे
आमच्या दारी खूप
पसरे धूप

मज्जा करुया
गरमच होऊया
रोज गाऊया

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 13 November 2018

बालकाव्य ( मी कोण )

बालकाव्य लेखन स्पर्धेसाठी

विषय- मी कोण

मी तर मनू आईबाबांची ,
लाड लाडुली भावांची .
मन्या माझ्या मैत्रीणींची,
माणिक सर्व नातेवाईकांची .

खेळ खेळले सर्व मैदानी ,
गोट्यांचा डाव अंगणी.
गल्लीतील खेळ चिन्नी दांडूचा ,
पाठशिवणीचा खेळ प्रांगणी.

शिकले सायकल पडतखडत,
सतरा जखमा हातापायावर.
नाही तमा , दु:ख वाटे कधी,
शिवाशिवीचा डाव मैदानावर.

बालवाडीतील पहिला दिवस,
रडून दंगा केला खूप खूप.
लागली सवय हळूहळू मग,
डब्यात शोभे चपाती तूप.

दंगामस्ती आरडाओरडा,
हा तर आमचा टाइमपास.
आठवते मज माझे बालपण,
स्मरणात राहतो खासम खास.

नवे खेळ, नवे दोस्त,मैत्रिणी,
रोज नवनव्या खेळ क्लूप्त्या.
भंडावून सोडावे सगळ्यांना,
चिंता कुणाला, कशाच्या होत्या?

रम्य ते बालपण ,त्या आठवणी,
मी व्रात्य, दंगेखोर, बंडखोर होते.
रमते मन माझे भूतकाळात,
आपसूकच मग ऊल्हसित होते.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

लेख ( दिपावली नंतरचे चार दिवस )

स्पर्धेसाठी

लेख

विषय - दिपावलीनंतर चे चार दिवस

शेवटच्या दिवसापर्यंत शाळा करुन शेवटी एकदा दिवाळीची सुट्टी पडली.मग सुरू झाली लगबग फराळाच्या विविध प्रकारच्या वस्तूंची तयारी करणे.पदार्थ तयार करणे. लक्ष्मीपूजन,पाडवा,भाऊबीज हे सण खासकरून महत्त्वाचे व खूपच घाईगडबडीत व गोंधळात गेले पण तेवढाच आनंद ही देऊन गेले.

हुश्श !! संपली एकदाची दिवाळी म्हणून एक दिर्घ ऊसासा सोडला. पण एकदम मोकळं मोकळं वाटायला लागले. ते आनंदाने गोंधळात सर्वांच्या गोतावळ्यातील क्षण आठवू लागले व मन परत विषण्ण झाले. घरच्या कामात मन गुंतवले.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेपराचे गठ्ठे आठवले.अरे बापरे !!! म्हणत ऊठले व गठ्ठे घेऊन बसले.पण कुठलं काय नी कसलं काय. सगळाच विरस ... नको वाटायला लागलं . दिवाळीच्या कालावधीतील दिवस आठवून मन खट्टू झाले. या मनाची समजूत काढणे खूप अवघड गेले. शेवटी एकदाचे हळूहळू त्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसल्या. नेहमीचे रुटीन सुरु झाले. सुट्टी चे थोडे दिवस राहिले होते ते आपल्या साठी खर्च करायचे ठरविले. दोन दिवसात कुठे सहलीला जाता येईल का याचा विचार सुरू झाला व महाबळेश्वर हे ठीकाण पक्के झाले. आनंदाने सर्व तयारी करुन सर्वजण निघालो. ही कौटुंबिक सहल मनाला आनंद देणारी व सुखावणारी ठरली. निसर्गाच्या सानिध्यात , निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत सर्व ठीकाणे बघून झाली. खूप मज्जा आली. वेण्णा लेकमध्ये नौकानयन मनाला मोहवून, सूखावून गेले. सनराईज पाँईंट पासून सनसेट पाँईंट पर्यंत दिवसभर मजेत घालवला.मनाने व शरीराने फ्रेश होऊन परत घरी आलो. त्या धुंदीत दिवाळी चा शिण कुठल्या कुठे पळून गेला. एकप्रकारची नवचेतना निर्माण झाली. सर्व आप्तेष्टांना भेटून मन तृप्त झाले होते.नव्या ऊभारीने कामाला लागले. पेपराचे गठ्ठे बोलवत होते.त्यांना घेतल व तपासून काढले. निवांत थोडी विश्रांती घेतली.सर्वात महत्वाचे म्हणजे साहित्यिक ग्रुपला जादा वेळ देता आला.लिखाण झाले. वाचणाला व लिखाणाला वेळ मिळाला.त्यामुळे मन आनखीनच खुश झाले.

खरंच दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असं म्हणावेसे वाटते. हो ते खरंही आहे.जीवनात जगत असताना असे सुखदुःखाचे प्रसंग येतात ते जीवन सुसह्य करण्यासाठीच . चला तर मग लागा नव्या ऊमेदीने,ऊत्साहाने कामाला.जीवन यशस्वी करण्यासाठी सज्ज होऊया.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 12 November 2018

लेख ( मन )

मन

आज माझं मन खूप आनंदी आहे. आज माझं मन खूप दु:खी आहे, ऊदास आहे.असे ऊद्गगार आपणास सगळीकडे ऐकायला मिळतात.मनाला लगलं माझ्या, मनाला लागेल असं बोलू नये.मन मारायला शिक असा सल्लाही मुलींना दिला जातो. पण नेमकं मन म्हणजे काय ? याचे उत्तर कुणाला देता येणार नाही. आजपर्यंत मनाची परिपूर्णपणे व्याख्या कुणीच करु शकले नाही.
मन म्हणजे आपल्या भावना असं म्हणू शकतो.कारण आपण आनंदी, दु:खी होतो तेव्हाच आपल्याला मनाल लागले,कींवा मनाला आनंद झाला असे म्हणतो.बहिणाबाईंनी देखील मनासंबधी आपले विचार प्रकट केले आहेत.त्यांच्या मताप्रमाणे मनावर आपला ताबा राहू शकत नाही. जैन तत्वज्ञानात ,धर्मात जैन मुनींना दिगंबर दिक्षा प्राप्त करायची असेल तर त्यांना आपल्या षडरिपूंवर ताबा होतो तेंव्हाच दिक्षा दिली जाते , याचाच अर्थ असा होतो की ते आपल्या मनावर पूर्णपणे ताबा ठेऊ शकतात. आपल्या मनात अनेक चांगले व वाईट विचार नेहमी येत असतात. त्यावेळी सारासार विचार करून आपण ठरवत असतो की काय करावे.हा सारासार विचार म्हणजे मनाचाच भाग म्हणता येईल. जो सुशिक्षित आहे , रोजगार करतो त्याच्या मनात वाईट विचार यायची शक्यता कमी असते.पण ज्याला स्वतःचे एकवेळचे पोट भरायची भ्रांत असते तो अविचार करु शकतो.त्यामुळे असे म्हटले आहे की," मन चंगा तो कठौती में गंगा " आपला विकास, प्रगती, अधोगती आपल्या मनावर अवलंबून आहे. तेव्हा शरीर निरोगी असावे. कारण " निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते." हे बरोबर आहे. कारण मनाची एकाग्रता ही शारीरिक व्याधींवर केंद्रित झाली तर स्वविकासाला वेळ देता येत नाही. त्यामुळे नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम, योगासने, प्राणायाम केले पाहिजेत. मन हे चंचल आहे. क्षणात ईथे तर क्षणात तिथे ते सहजपणे विहरु शकते.आपल्या मनातील विचार कधीही दाबून ठेवायचे नाहीत, तर ते दिलखुलासपणे व्यक्त होऊ द्यावे. तरच आपण तणावरहित जीवन जगू शकतो.मनातील विचार प्रकट झाले तरच आपण सुखी होऊ शकतो..चला तर मग व्यक्त होऊ या.मन मोकळे करु या व जीवन आनंदी बणवू या.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Sunday, 11 November 2018

चारोळी ( काव्यदिप )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - काव्यदिप

काव्यदिपच हा शब्दसुमनांचा
प्रकाश विचारांचा पसरवतो
खरा वसा समाजप्रबोधनाचा 
चालवून बदल हा घडवतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( आनंदी क्षण )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- आनंदी क्षण

जीवनात येतात प्रत्येकाच्याच
नेहमीच्या सुंदर आनंदी क्षण
जपून ठेवावे मनाच्या कुपीत
मोहरण्या आयुष्याचा हर कण

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता मुक्तछंद ( भाऊबीज )

मुक्तछंद काव्य

विषय- भाऊबीज

आला सण दिवाळीचा,
घेऊन आनंदाचे भरते.
रोज नवा दिन रोज महत्व वेगळे.
भाऊबीज स्मरते मला खूप ,
देते आनंद जीवाला.
प्रेम माझ्या भावंडांचे सुखावे मनी खूप.
ओवाळीते मी प्रेमाने .
मागते आशिष देवाला
सुखी ठेव बंधुराया जरी गडबड कितीही, 
करु औक्षण बंधुरायचे,
कामना आयुरारोग्याची, भरभराटीची.
प्रेम भावाबहीणीचे अखंड राहो
हीच मनिषा मनी.
ओवाळून पंचारती देई कुरवंडी जीवाची.
बंधू तत्पर सदा रक्षण्या बहिणीला.
सण भाऊबीजेचा देई प्रेमाची त्या साक्ष.
सदा राहो प्रेम भावाबहीणीचे येथे.
घर राहते हसरे पाहून प्रेम यांचे.
फुलू दे रोज अशीच प्रीत ,वाढू दे गोडवा.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 6 November 2018

कविता ( आली आली दिवाळी )

उपक्रम

बालगीत

आली आली दिवाळी

आली आली आली आली ,
दिवाळी दिवाळी दिवाळी.
चला चला रे नाचू गाऊ ,
खेळू आपण पळापळी.

आईने केल्या चकल्या लाल,
लाडू झाले गोल गोल गोल.
करंजीचा झाला धनुष्यबाण,
शंकरपाळी त्याच्या खालोखाल.

चिरोटे आवडतात भारी मला,
चवच न्यारी अनारसाची.
बुंदीच्या लाडवाला खूपच मान,
सोबत आहे खमंग चिवड्याची.

लाडवाचे प्रकार तरी कीती ?
रवा , शेंगोळ्या, बेसनमोगरी.
शेव पापडी छानच झाली,
खाऊन खाऊन फुगली ढेरी.

सुगंधी साबण सुगंधी ऊटणे,
सुगंधी तेल अन् अत्तराचा फाया.
जिकडे जाऊ तिकडे जाणवते,
सर्वांचीच आहे सुगंधित काया.

आली आली दिवाळी घरी,
आनंदाने नाचली सारी .
दिवे लागले ऊजळल्या पणत्या,
लख्ख प्रकाश पडला दारी.

करूया प्रेमाचे सिंचन आज,
स्नेहभावना वाढीस लावू.
चंदू,मंगू,पप्या, राणी,सुमी,
चला चला आनंदाने धावू.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 5 November 2018

कविता ( अनाथांची दिवाळी )

स्पर्धेसाठी

करूणरस

विषय -अनाथांची दिवाळी

माय गेली बाप गेला ,
धरणीकंपाच्या माऱ्यात .
झाली पोरकी पोरेबाळे ,
जो तो आपल्याच तोऱ्यात .

कुणाकडे करायचा हट्ट ,
कोण आहे अनाथांचा वाली ?
नाही दसरा नाही दिवाळी ,
नशिबाची आबाळच झाली.

येता सण दिवाळीचा ,
जनता सारी हर्षित होते.
आमच्या आकांक्षाची मात्र,
आपसूकच होळी होते .

अनाथांची दिवाळी काय असणार  
लाचारीचं जगणच नशिबात.
अपेक्षित नजरेने पहायचं फक्त,
फराळ फक्त पहायचा स्वप्नात.

नको दैवा,जीणं अनाथांचं ,
भावनांचं दिवाळं निघायचं .
जड वाटतात पोटची पोरं ,
आम्ही तर उपऱ्यानेच जगायचं.

अनाथलयात मिळाला आसरा,
सहानुभूतीने समाधान मिळाले.
दातारांच्या दातृत्वाने खास ,
अनाथांच्या मनी सुख मिळाले.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Saturday, 3 November 2018

कविता, अष्टाक्षरी ( मी दुर्गा )

स्पर्धेसाठी

अष्टाक्षरी

शिर्षक- मी दुर्गा

नार मी नवयुगाची
चाल माझी पुढेपुढे
नाही घेणार कधीही
कसलेच आढेवेढे

झोपवली शांतपणे
खांद्यावर मातृत्वाच्या
बाळी माझी निवांत तू
रहा कुशीत आईच्या

भाव चेहऱ्यावरील 
सर्व काही सांगतात
वीरमाता शूरमाता
शोभे विळा या हातात

माथी कुंकुम पसरे
भासे जशी दुर्गा माता
नाश करण्या या जगी
तुजविण कोण त्राता

खोचूनच पदराला
टाके पाऊल पुढती
थरकाप ऊडतोय
रुप तूझे हे पाहूनी

रक्ताळल्या शरीराने
टिकवते मी स्त्रीत्वाला
वार झेलला विखारी
खांडोळीच करण्याला

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Friday, 2 November 2018

कविता ( प्रिया आज माझी )

स्पर्धेसाठी

कविता

प्रिया आज माझी

बोलावते पहा प्रेमाने,
प्रिया आज माझी मजला.
नेत्रकटाक्षाच्या बाणांनी ,
घायाळ मी दिसे तिजला.

हलकेच हसणे ओठामध्ये,
मदहोशीत मजला नेते.
दंतपक्ती मोतीयाच्या पाहून,
मोहरुन मन माझे हे जाते.

माझीया प्रियेचे चालणे,
जशी चालली गजगामिनी.
आसूड ओढत हृदयावरती,
निघाली मस्त सौदामिनी.

ठसली मनात खोलवर माझ्या,
कधी ना आता दुरावणार.
साथसंगत जीवनांतापर्यंत ,
मधेच ना कधी मी सोडणार.

तूच माझी प्रिया , प्रेयसी ,
मीच तुझा सखा सोबती.
फुलवू जीवन दोघे मिळुनी,
राहू आनंदी आपण जगती.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Thursday, 1 November 2018

बालगीत ( अगडबंब हत्ती )

बालगीत

अगडबंब हत्ती

आला आला पहा जरा,
अगडबंब हत्ती हो आला.
चला चला सगळे चला रे,
हत्तीला या पाहू चला .

कीती मोठा अगडबंब हा ,
मनाला माझ्या वाटते भिती.
सोंड पाहून येते मनी
लांबच लांब सोंड कीती.

सुपासारखे मोठे मोठे कान,
दिसतच नाही कुठे मान ?
हत्ती आहे एवढा मोठा ,
डोळे मात्र पहा याचे लहान.

पाय पाहून वाटते भिती ,
केळीच्या झाडासारखे जाड.
शेपटी मात्र आहे छोटीशीच ,
हलवतो सारखा ताडताड.

चालला रस्त्यावर हळूहळू,
घंटा गळ्यातील वाजे टणटण.
प्रश्न पडलाय मनात माझ्या
वजन हत्तीचे कीती टण ?

आला आला हत्ती आला ,
अगडबंब हत्ती आला .
पाहून हत्तीला झुलताना,
आनंद मुलांना खूप झाला.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर