Sunday, 3 December 2017

जनसेवा हीच ईश्वरसेवा

लेखस्पर्धेसाठी

जनसेवा हिच ईश्वरसेवा

      " खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे " असे परमपूज्य साने गुरुजी नेहमी म्हणत.त्यांनी  आपल्याला सांगीतलय की , जगात जे दीन व पददलीत आहेत , जे रंजलेले गांजलेले आहेत त्या सर्वांना आपण जवळ केले पाहिजे , त्यांना ऊठवले पाहिजे , त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले पाहिजे.कारण या लोकांच्यातच देव वसला आहे.जर आपणाला देवाची  ईश्वराची सेवा करायची असेल तर आपणाला कुठे देवळात  जायची गरजच नाही.

    आज आपण दररोजच्या जीवनात अनेक अंध , अपंग , निराधार , गरजू पिडीत व शोषित लोकं आपल्या आजूबाजूला पहात असतो.खरतर या लोकांना मदतीची नितांत गरज असते.आपण यांच्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो व नको तिथे पैसा खर्च करतो.हे सर्व करण्यापेक्षा या लोकांची सेवा आपण करु शकतो व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो.त्यांचा हसरा व समाधानी चेहरा पाहिला की खूप आनंद वाटतो , व आपण ईश्वराची सेवा केल्याचे समाधान मिळते.

     भगवान महावीरांनीही गृहत्याग करुन आपले सारे जीवन लोकांच्यासाठी अर्पण केले व अहिंसेचा महामंत्र दिला.कुणालाही दुखवायचे नाही , सर्वांशी भेदभाव न करता प्रेमाणे वागायला शिकवले.भगवान श्रीकृष्णानंही अत्याचारी कंसाला मारुन जनतेची सुटका केली व महाभारताच्या युद्धातही न्यायी व गरजू पांडवाना मदत केली.परममीत्र सुदामालाही मदत केली.

   अनेक शास्रज्ञांनीही अनेक उपयुक्त असे शोध लावून जनतेची सेवाच केली आहे.संत महात्म्यांनीही आपल्या आचरणाने जनसेवाच केली आहे.संत कबीरांनी कापड विणून गरजू लोकांना दिले.संत तुकारामांनी स्वतःचे सर्वस्व गमविले पण जनसेवा सोडली नाही.गाडगेबाबांनी तर स्वतः पुढे होऊन सफाईचे कार्य केले आरोग्यपूर्ण जीवनासंबधी अंधश्रद्धेबद्दल जागरुकता निर्माण केली. व  " आधी केले मग सांगीतले " याची प्रचीती दिली. मदर टेरेसा यांनी आपला देश सोडून भारतात येऊन कुष्ठरोग्यांची दीनदलीतांची सेवा केली व महान बनल्या.मा.बाबा आमटे, श्री.विकास आमटे व श्री. प्रकाश आमटे यांनी स्वत्त्वाचा त्याग करुन आपले सारे जीवन कुष्ठरोग्यांची व आदिवाशींची सेवा करण्यात घालवली.मा. नसिमा हुरजूक यांनी आपले सारे जीवन अपंगाच्यासाठी वाहून टाकले.अनाथांची माय    "माई " सिंधुताई सपकाळ यांनी तर अनंत यातना सहन केल्या व आनाथांच्यासाठी व पिडीत लोकांसाठी आपले जीवन अर्पिले आहे. मा मेधा पाटकर यांनीही आदिवाशी व पिडीत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहेत.

   अशी अनेक जीवंत उदाहरणे आहेत ज्यांचे जीवनच जनसेवा आहे.या सर्वांचा आपण आदर्श घेतला पाहिजे व आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढीतरी जनसेवा केली पाहिजे.गरजूंना धान्य , कपडे व ईतर जीवनावश्यक वस्तू दिले पाहिजेत.ज्यावेळी बाजारात जातो त्यावेळी मॉलमध्ये न जाता रस्त्यावर विकणारे अनेक अंध , दिव्यांग ,गरजू लोक असातात त्यांच्याकडूनच वस्तू घ्याव्यात कारण त्यावरच त्यांचे पोट अवलंबून असते.

    चला तर मग करुया मदत गरजूंना व ईश्वरसेवेचा लाभ घेऊया.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

No comments:

Post a Comment