Tuesday, 31 October 2017

अवचित

दर्पण
अवचित

अवचित
माझ्या जीवनात
अवचित
डोंगर दुःखवेगाचा कोसळला संसारात
अवचित
सौभाग्याचं लेणं हरवून गेलं जीवन अंधारात
अवचित
चाचपडल्या दाही दिशा सुकाणुविणा नौका जशी भेलकांडते सागरात
अवचित
शोधला मीच मार्ग माझा , पाहिले भविष्याला माझ्या दोन निरागस मुलांत
अवचित

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड .

Monday, 30 October 2017

दीनवाणी

स्पर्धेसाठी

     चित्रचारोळी

भुकेजली ही दीनवाणी
खाती हो भीक आनंदाने
महान भारताच्या स्वप्नांची
आस का धरावी बालकाने ?

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर .

Sunday, 29 October 2017

भेट

उपक्रम

    दर्पण

    भेट

भेट
झाली एकमेकांची
भेट
विरहाने जळणा-या दोन जीवांची
भेट
एकमेकांना शांत करत , कदर करत भावनांची
भेट
अशी असावी ज्यात असावा  जिव्हाळा , उकल व्हावी विचारांची
भेट
एकदा झाली की कधीही न विसर पडणारी प्रेमळ अलगद शब्दांची .
भेट

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

ओढ

उपक्रम

ओढ

ओढ तुझी नी माझी
नाही कुणा समजायचे
हळुवार भेटींचे प्रेमळ क्षण
दोघांनाच ते उमगायचे .

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

राज मनीचे

स्पर्धेसाठी

घे भरारी महास्पर्धेसाठी

काव्यफेरी -- २

विषय -- प्रेमकविता

    राज मनीचे

राजमनीचे अधरी येता ,
काया ही बावरते .
थरथर तनुची पाहता ,
आपसूकच ते लाजते .

तू जवळ नसतानाही ,
तुझ्या आठवणींचा सहवास.
गहिवरल्या मिठीत माझ्या ,
तुझ्या सोबतीचा भास .

असाच मनीचा भाव ,
तुझा नी माझा राहूदे .
साथ तुझी , त्या भावना,
सदैव मनात असूदे.

प्रित माझी शोधते तू कुठे ?
मन ते बेचैन होते .
वाट आयुष्याची बिकट ,
तरीही मी चालते .

सहवास जरी अल्पसा ,
मिळाला मजला .
कोंदणात मनाच्या तो ,
कायमचाच वसला .

    कोड क्र. ः  GB 127

धमक

स्पर्धेसाठी

  चित्रचारोळी

नसला जवळ मोबाईल
तमा नाहीच तरुणाईला
शून्यातून स्वर्ग निर्मीण्याची
धमक आहे त्यांच्या साथीला.

     रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

Thursday, 26 October 2017

अपेक्षा

स्पर्धेसाठी

    शब्दचारोळी

विषय -- अपेक्षा

अपेक्षा कोण कशी करावी
सगळं गणित चुकतयं
कर्तव्य विसरुन आपले
हक्काच मागण मागतयं

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर .

Wednesday, 25 October 2017

पोशिंदा

आजचा उपक्रम

शब्द -- पोशिंदा

पोशिंदा जगाचा पहा कसा
आज चाललाय फासावर
आहे का ते बळ कुणाच्यात
तोलायला जीव हातावर ?

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ  ,
जि. कोल्हापूर .

नातं

नातं
आपलं तिघांच
नातं
कधीही परकं न मानायच
नातं
एकमेकांसाठी असच हसत खेळत आनंदात जगायचं
नातं
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर कर्माच्या दोरीने प्रयत्नांच्या पाटावर अलवार झुलायचं
नातं
अस ठेवायचं की ज्याची विण नेहमीच नात्यातील आनंदाला अलगद तोलायचं
नातं

     श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Tuesday, 24 October 2017

आधार

दर्पण

शब्द -- आधार

आधार
जीवनाचा मला
आधार
माझा मलाच असा गवसला
आधार
शोधताना खंबीर करावे लागले माझ्या मनाला
आधार
मला माझ्या दोन मुलांचा , आहे शांती माझ्या जीवाला
आधार
म्हणजे जगात वावरताना मानसिकतेला बळ देणारे, शांत करणारे जीवाच्या आकांताला.

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि.कोल्हापूर.

उघड्यावरचा संसार

स्पर्धेसाठी

       चित्रचारोळी

    उघड्यावरचा संसार

स्त्री-पुरुष समानता येथे
सांगावी हो लागत  नसते
उघड्यावरचा संसार हा
खळगी पोटाची भागवते.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,जि. कोल्हापूर .416106
9881862530 .

Thursday, 19 October 2017

शब्दरुपी बाण

शब्दरुपी बाण तुझे
भिडले काळजांतरी
लाज आली गाली
धुंद मी हृदयांतरी

Tuesday, 17 October 2017

प्रदुषण मुक्त दिवाळी

स्पर्धेसाठी

         चारोळी

प्रदुषण मुक्त दिवाळी

नका फोडू फटाके हवेत
करा प्रदुषण मुक्त दिवाळी
पर्यावरणरक्षण हाती घ्या
करु श्वासाला जागा मोकळी

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

Sunday, 15 October 2017

वाचनाचे महत्व

लेखस्पर्धेसाठी

विष -- वाचनाचे महत्व

" वाचाल तर वाचाल " असे म्हटले जाते ते अगदी खरं आहे .वाचनाने आपल्याला खूप उपयुक्त अशी माहीती मिळते.वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते .जीवनात वावरताना काय चांगले काय वाईट हे समजते म्हणजेच मन विचारी बनते.आपण मोठ्या संकटाना सामोरे जातो , थोडक्यात सांगायचे तर आपण वाचतो , सुरक्षित राहतो.

   विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकाबरोबरच संदर्भ पुस्तकेही वाचली पाहीजेत जेणेकरुन त्या घटकाबद्दल पूर्ण माहीती मिळते. तो घटक व्यवस्थित समजतो. पेपर सोडवताना याचा फायदा होतो.

  भारताचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना वाचनाची आवड होती . त्यांचे वाचनही खुप झाल्यामुळे त्यांची वैचारिक प्रगल्भता प्रचंड होती .विचारात साधेपणा होता .त्यांनी लिखाणही भरपूर केले आहे.आपले विचार ईतरांपर्यत पोहचवले आहे.यामुळे शासनाने त्यांचा जन्मदिवस " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करायचे ठरविले आहे , त्यानुसार विविध ठिकाणी हा दिन मोठ्या ऊत्साहात साजरा केला गेला.वाचनाचे , पुस्तकाचे महत्व सांगीतले गेले.वाचनाचे तास घेऊन वाचनप्रेरणा देण्यात आली.

वाचनाने मनातील मळभ दुर होते .मन प्रसन्न बनते. जेवढे वाचन करु तेवढं मन आनंदित होते . वाचनाने आपल्याला देशविदेशातील माहीती मिळते .

   म्हणून वाचतच राहीले पाहीजे व ज्ञानाचा प्रकाश घरोघरी पोहचवला पाहिजे .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

काव्यरुपी सुविचारांचे सुगंधी साबण

स्पर्धेसाठी

विषय -- काव्यरुपी सुविचारांचे सुगंधी साबण

        आनंदवन

आनंदवनी पोहचलो जेव्हा ,
अनुभूती वेगळी आली तेव्हा
सर्वधर्मसमभाव मानवताच दिसली,
आपुलकीची भावना मनात दाटली.

स्वावलंबन शिस्त ती भारी ,
स्वच्छता नांदतसे दारी .
हस्तकलेत निपुण सगळे ,
प्रत्येकाचे रुप आगळे .

कुणी कुणाचा मालक ना दास,
प्रत्येकाला कामाचाच ध्यास
झाडाफुलांचा निसर्ग खेळतो
श्रमसाफल्याचा हार माळतो

भूमी आगळी लोक वेगळे,
बिनहत्यारी सर्व मावळे .
कुणी न नेता ना सेनापती ,
आम्हीच हो ईथले नृपती .

प्रणाम करुनी मी नतमस्तक
आत्मभान देतसे दस्तक .
कोण आपण कुठली जनता
जपली जाते फक्त मानवता.

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530 .

दिवाळीचा फराळ

स्पर्धेसाठी

  विषय - दिवाळीचा फराळ

आली दिवाळी आनंदाची ,
सर्व सणांतील महत्वाची .
फराळांची येथे लयलूट ,
नाही गणती करायची .

फराळाला ना तोटा येथे ,
लाडू चकली चिवडा बुंदी .
करंजी शंकरपाळे अनारसे ,
खाऊन येईल खास धुंदी .

सगेसोयरे मित्रमंडळी ,
जमले सारे झाली गोळा .
फराळाचा पाडण्या फडाशा,
बालगोपालांचा जमला मेळा

आकाशकंदिलाची झगमग ,
अन् पणतीचा मंद प्रकाश .
दारात शोभे रांगोळी सुंदर ,
रोषनाईने प्रकाशले आकाश

अशीच रोषनाई फुलवा ,
अनाथांच्या अंधारजीवनी.
फुलवा हास्यज्योती मधुर,
चेहऱ्यावर त्यांच्या दानानी.

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

Saturday, 14 October 2017

संसार

स्पर्धेसाठी

झटपट चारोळी स्पर्धा

विषय-- संसार

असा करावा संसार नेटका
मन , बुद्धी ठेऊन ताब्यात
वेळ नाही लागत मोडायला
सहज जातो तो धोक्यात.

  रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर.

मानवा जागा हो

काव्यस्पर्धेसाठी

          फेरी क्रं. 11

कोड क्रं. -- 1028

     विषय -- विररस

       मानवा जागा हो

जाग मानवा जागा हो ,
परीवर्तनाचा धागा हो .
पेटुन उठू देत बाहू तुझे ,

भ्रष्ट या लाचार दुनियेत ,
अविवेकाचा आलाय पूर .
विवेकबुद्धी वापरून तुझी ,
खरच ,कर तू यांना दूर .

स्फुलींग पेटवून हृदयात ,
अन्यायाचा पाडाव कर .
लाख आशा तुझ्यावरच ,
न्यायाची तू कास धर .

चल ऊठ , जागा हो ,
ऊठवणार नाही कोण तुला .
जागृत कर मनीच्या आशा ,
मानवतेची आन तुला .

भारतमाता वाट पाहते ,
सुंदर , रम्य सकाळची .
तूच आहेस तिचा त्राता ,
कर पूर्तता तिच्या स्वप्नांची .

कोड क्रं.  --  1028

Thursday, 12 October 2017

भेट प्रेमाची

स्पर्धेसाठी

        शब्दचारोळी

विषय - भेट प्रेमाची

तुझी नी माझी भेट प्रेमाची
अशीच फुलत राहो सदा
मानवतेच्या स्पर्शाने खुलो
प्रेम आपुले असेच सदा.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Wednesday, 11 October 2017

दागदागिने

स्पर्धेसाठी

विषय -- दागदागिने

सजून वधू ऊभी मंडपी
शोभे दागदागिने सुंदर
खरे दागिने शील नम्रता
तेच बनवी घर मंदिर.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Monday, 9 October 2017

स्पर्धेसाठी

      चित्रचारोळी

पाहता तुला कवेत त्याच्या
सखे निशब्द दुःखी झालो ग
एकांती चंद्रासम निस्तब्ध
काठी जलाशयाच्या आलो ग.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर.
9881862530 .

पुनम का चाँद

प्रतियोगिता के लिए

   पुनम का चाँद

जमीन से लेके फलक तक
बस तेरा ही दिदार है |
झलक पाने की तेरी ,
हर एक का इंतजार है |

अमावस के बाद पुनम
अंधेरे के बाद उजाला |
दुःख के बाद सुख ,
करो न कभी मन मैला |

प्रेमीयोंके आखोंका तारा
सुहागणोंका रखवाला |
कवियोंकी कल्पना का बिंदू
है सदा आजीवन मतवाला |

चाँद की तुम चाँदणी ,
फैली रोशणी जगमग नभमें
पावन तू मनभावन तू
प्यार सदा तेरे ऊर में |

पूर्णत्व का एहसास तू
आनंद की भरमार तू
आकाश का दिया तू
बच्चोंका चंदामामा भी तू |

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

परतीचा पाऊस

स्पर्धेसाठी

       चारोळी स्पर्धा

     परतीचा पाऊस

कोसळला अंदाधुंद काल
परतीचा पाऊस जोराने
अवकाळी का हस्तनक्षत्र ?
काय करावे बळीराजाने ?

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Sunday, 8 October 2017

खरे बोला

स्पर्धेसाठी

लेखस्पर्धा  -- खरे बोला

" सत्य मेव जयते " अर्थात सत्याचाच नेहमी विजय होतो , हे वचन फक्त वचनच नाही तर ती वस्तुस्थिती आहे.
        जीवनात , आयुष्याच्या चढऊतारातून मार्गक्रमन करताना अनेकवेळा खोटेपणाचा अनुभव आलेला असतो. दररोज आपल्या अवतीभोवती अनेकजण सतत खोटे बोलताना दिसतात.विशेष म्हणजे त्याचे त्यांना काहीही वाटत नाही.असं काहीजण म्हणतात की " खोटं बोला खर नेटानं बोला " हे अशा लोकांना तंतोतंत लागू पडते.पण एकवेळ अशी येते की हे लोक चारचौघात तोंडघशी पडतात.पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

    सुटलेला बाण व बोललेला शब्द कधीही मागे घेता येत नाही.तसेच बाणाने घेतलेला वेध ,व शब्दाने झालेली जखम कधीही भरुन न येणारी असते. म्हणून नेहमी खरे बोलावे

खरे बोलल्याने काही वेळेला आपणच अडचणीत येतो पण पश्चातापाची वेळ कधी येत नाही व कुणाच्या आधिनही राहण्याची गरज नसते.परमेश्वराला जरी कुणी पाहीलं नसलं तरी ,     "सत्य हाच परमेश्वर " असं म्हटलं जातं. म्हणजे परमेश्वरावर जेवढी श्रद्धा असते तेवढीच श्रद्धा सत्यावर असते.

खरे बोलावे असे फक्त म्हणून चालत नाही ,तर शब्दाला कृतीची जोड देणे महत्त्वाचे असते.आपण जर खरेपणाने वागलो तर बाकीचे आपल्यावर अवलंबून असणारेही खरेच वागतात .सत्याची शिकवण ही शिकवून होत नसते तर ती रक्तातच म्हणजेच ऊपजतच असावी लागते.

   महत्वाचे म्हणजे खरे बोलणा-या व्यक्तीला कधीही कुठलाही तणाव येत नाही .कारण एक खोटे बोलले की ते झाकण्यासाठी पुन्हापुन्हा खोटे बोलावे लागते व ते सिद्ध करण्यासाठी आटापीटा करावा लागतो व मग मानसिकता बिघडते .

" सत्याला " मरण नाही .शेवटी सत्याचाच विजय ठरलेला असतो.ज्याप्रमाणे     " टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही " तसेच खरे बोलून निश्चींत रहाणे केंव्हाही चांगले.तर मग , नेहमी खरे बोला ,आनंदी रहा.

   श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.416106

सुहागन

प्रतियोगिता के लिए

      सुहागन

सुहाग को अपने दिलसे
चाहती है हर सुहागन
उसीके एहसास से जागा
वो नशीबवाली का आँगन

    रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

Saturday, 7 October 2017

आरसा

महाकाव्य स्पर्धेसाठी

            फेरी क्रं. 10

     कोड क्रं. 1028

          अष्टाक्षरी

          आरसा

बिंब पाहता स्वतःचे
हरकून मन गेले
बोलू लागला आरसा
क्षणभर स्तब्ध झाले

बोल आरशाचे होते
छान सजलीस बाई
रहा अशीच आनंदी
नको रुसण्याची घाई

जशी दिसतेस तशी
दाखवणे माझे काम
दोष नको देऊ मला
यात काहीं नाही राम

आचरण ठेवा स्वच्छ
मुखावर दिसे स्पष्ट
सांगे खरेच आरसा
नका मानू त्याला दुष्ट

वागा नेहमी नेकीने
देतो संदेश आरसा
हृदयास शांती लाभे
ठेवा तुम्ही भरवसा

कोड क्रं. 1028

Thursday, 5 October 2017

शरदाचे चांदणे

स्पर्धेसाठी

     शब्दचारोळी

विषय -- शरदाचे चांदणे

शुभ्र चंदेरी आकाशातील
सुंदर शरदाचे चांदणे
मोहवते मनाला सर्वांच्या
हेच आहे सुखाचे मागणे.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Wednesday, 4 October 2017

डोळ्यांची भाषा

स्पर्धेसाठी

    फेरी क्र.09

कोड क्र. 1028

विषय -- प्रेमकविता

       डोळ्यांची भाषा

काळ्या डोळ्यातील ,
फुले दोन बोलली .
पसरली गालावर ,
लाल गुलाबी लाली .

अधर हलले , शब्द फुटले ,
ऐकण्यास मन अधीर झाले.
हृदयात भावकारंजा फुलला
रोमरोम न्हाऊन निघाले .

लोचनांची भाषा नकळत ,
समजे दुजा लोचनाला .
अर्थ न त्याचा दुजा कळे ,
समजे ते फक्त प्रेमहृदयाला.

वदनी पसरल्या पहा आज ,
रेषा मनातील भावनांच्या .
सहज बसल्या जाऊन ,
कोंदणात नयनांच्या .

कळले एकमेकांचे इशारे ,
केले अनेक नव बहाणे .
आपसुकच आले मग जाणे,
स्फुरले गाणे , प्रिततराणे .

कोड क्र.  1028

Tuesday, 3 October 2017

जलाशय

स्पर्धेसाठी

      चित्रचारोळी

काळ्या पांढऱ्या बदकांनी
सजला आनंदी जलाशय
हिरवाईच्या पार्श्वभूमीवर
प्रसन्नतेचे आनंदालय .

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Monday, 2 October 2017

बापू तुमच्या देशात

स्पर्धेसाठी

       काव्यस्पर्धा

   बापू तुमच्या देशात

सुवर्णाक्षरांनी लिहलाय ,
इतिहास जगाच्या नकाशात.
सगळं अलबेल असावं ,
खरचं ,बापू तुमच्या देशात.

सत्यवचनांचा नियम तुमचा,
मोडीत काढलाय सर्वांनी .
अहिंसा तत्वाची होळी आज
केलीय ईथे आंदोलकांनी .

शरीर उघडे टाकलात तुम्ही,
गरीब या देशबांधवांसाठी .
आज पैसेवालेच फीरतात ,
उघडे , अंधानुकरणासाठी.

आधी केले मग सांगीतले ,
उपदेश तुमचा खास होता .
फक्त सांगणे न आचरता ,
परंपराच झालीय आता .

बापू तुमच्या देशात ,
माजलीय आज अराजकता.
या परतूनी , गरज तुमची ,
निकालात निघाली मानवता

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

प्रेरकशक्ती

स्पर्धेसाठी

      प्रेरक शक्ती

एक बापू एक लाल ,
इतिहास भारताचा रचला छान .
मितभाषी म्हणून ओळख यांची ,
सदैव लीनतेने झुकते मान.

शस्त्रविरहीत क्रांती यांची ,
अहिंसा हेच प्रभावी साधन.
सत्य वचनांच्या बाणातून ,
घायाळ ते परकीयजन .

प्रेरकशक्ती भारतभूमीची ,
आशास्थान जनमानसांचे .
हाक देताच जनतेला तयार ,
जत्थे स्वातंत्र्यसैनिकांचे .

मूर्ती लहान , कीर्ती महान ,
त्यागाची ती महीमा अपार .
देशप्रेमाची ज्योत पेटवून ,
केले स्वातंत्र्यस्वप्न साकार .

राष्ट्रपिता बापू महान झाले ,
लाल ,दुसरे पंतप्रधान बनले.
वंदन तया करु विनम्रभावे  ,
तनमन हे नतमस्तक झाले .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Sunday, 1 October 2017

गंध फुलांचा

स्पर्धेसाठी

       चारोळी

विषय -- गंध फुलांचा

वेडावून मन गेले आज
हुंगुन ते गंध सुमनांचे
पाहुनच सौंदर्य फुलांचे
नयनी भाव समाधानाचे .

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.