Monday, 19 July 2021

अष्टाक्षरी ( रुप सावळे सुंदर )

उपक्रम

अष्टाक्षरी
विषय- रुप सावळे सुंदर

शिर्षक- विठुराया

रुप सावळे सुंदर
विठुराया पांडुरंगा
रोज गाती भक्तजन
मनोभावे रे अभंगा

काय वर्णू रुप तुझे
सावळेच देहरुप
पाहताच प्रकटले
मनी आलाय हुरुप

माता रुक्मिणी रुसली
राग लटका ऊरात
ऊभी नाहीच शेजारी
हासे प्रेमाच्या भरात


कर कटी स्थिरावले
टीळा लल्लाटी शोभला
प्रेम लोचनी प्रकटे
मना संतोष लाभला

कानी कुंडल हालती
लकाकती सभोवार 
मंजिऱ्यांच्या सुवासाने
मोद मनास अपार

जगजेठी वैष्णवांचा
विटेवर दिसे ऊभा
दर्शनास आसुसली 
सुखावली छान प्रभा

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

अष्टाक्षरी चित्रचारोळी(सोनचाफा )

अष्टाक्षरी चित्रचारोळी

सोनचाफा

सोनपितरंगी फुले
द्वयकरी प्रफुल्लले
चाफा टपोरा बहरे
धुंद आनंदी खुलले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 18 July 2021

चारोळी (वारी )

चारोळी

वारी

पंढरीनाथांचा गजर करीत
वाजती लयीत टाळ मृदंग
तुळशी वृंदावन शिरी शोभते
मुखी विठ्ठलाचे पाझरे अभंग

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी( अनमोल )

चारोळी

अनमोल

अनमोल ठेवा मानवतेचा
भरुन उरावा हृदयांतरी
सहनशीलता अंगी बाणन्या
संवेदनशीलता धरा अंतरी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता( वारी )

काव्यलेखन स्पर्धेसाठी

विषय - माझी पंढरीची वारी

शिर्षक - वारी

वैष्णवांची वारी,निघाली पंढरपूरी
पहावया रुप, उभे विटेवरी .
पुंडलिका भेटी , आला पंढरी
सेवा मायबापाची,तृप्त हा अंतरी

विठ्ठल नामाचा,गजर तो झाला
तृप्त झाले मन,नाद कानी आला
सान थोर भेदांना,नसे थारा
एकदिलाने रमती,बेधुंद आसमंत सारा

वारकरी सारे , गोळा दर्शनाला
आला पूर भाविकांचा चंद्रभागेला
माऊलीच्या गजरात झाली गळाभेट
नाही सहन होणार आता ताटातूट

किती वर्णू हा नयनरम्य सोहळा
आनंदच त्याचा आगळावेगळा
भक्तीसागरात चिंब मी न्हालो
लोभस दर्शनाने पावन की झालो

विठ्ठल दारी वैष्णवांची वारी
घेऊन मनी आस दर्शनाची
टाळ,मृदुंग, चिपळ्या,पताका
शोभते गळा माळ तुळशीची

वैष्णवांची वारी भक्तीभावाने
दिंडीतून निघाली पंढरपूरी
दर्शन विठ्ठलाचे मनिषा ही एक
न उरे मनी आशा दुसरी

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चित्रचारोळी(लगोरी )

अष्टाक्षरी चित्रचारोळी

डाव लगोरीचा सुरु
सप्तमित्र गुंग होती
निसर्गाच्या सानिध्यात
सारी बेभान खेळती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 27 June 2021

चारोळी( रीत )

चारोळी

रीत

रीत अशी ही जगावेगळी
परंपरा साऱ्या गहाण पडल्या
अदृश्य विषाणूमुळे असहाय्यपणे 
माणुसकीच्या भिंती कोसळल्या

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 24 June 2021

चित्रचारोळी( सय )

चित्रचारोळी
 सय

सुवर्ण आभा विलसली
रिक्त हिंदोळ्यावर अलवार
झोके घेते नवतरुणी विरहात
सय सख्याची स्मरते हळुवार

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 20 June 2021

हायकू ( हिरवाईचं लेणं )

हायकू

हिरवाईचं लेणं


धरती ल्याली
हिरवाईचं लेणं
मंगल गाणं

हिरवेगार
गवत पसरले
दु:ख हरले

शांत मनाला
गारवा लाभतोय
सुखावतोय

पशुपक्ष्यांचे
आनंदी विहरणे
नृत्य करणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 18 June 2021

हायकू( प्रहर )

उपक्रम
हायकू

प्रहर

प्रसन्न मन
पहाटेच्या कवेत
धुंदी हवेत

प्रहर प्राची
किलबिल खगांची
दाटी ढगांची

भर दुपारी
माथ्यावर तडका
सृष्टी भडका

संध्या समयी
निरवता भोवती
शांत सोबती

रजनीनाथ
वसुंधरेला भेटे
चंदेरी वाटे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 17 June 2021

षडाक्षरी ( सुगंध मनीचा )

स्पर्धेसाठी

षडाक्षरी

विषय- सुगंध मनीचा

शिर्षक- परिमळ

सुगंध मनीचा
दरवळे छान
कार्यात तत्पर
मिळतो सन्मान

बंधुभाव ठेवा
एकीने वागून
सुगंध मनीचा
टाका पसरुन

जिद्द गरजेची
सातत्य चिकाटी
अलौकिक कार्य
यशाची हाकाटी

मनाचा नेहमी
मोठेपणा दावा
सदाचार अंगी
बाणायला हवा

सुगंध मनीचा
चहुदिशा वाहो
कीर्तीचा नगारा
मनोमनी जावो

मातापिता घरी
आनंदी दिसती
सौख्याचा सागर
अखंड वाहती

ठेवून ध्यानात
स्वर्ग बनवावा
घराचा आपल्या
पायाच भरावा

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

काव्यांजली ( रिमझिमतं मन )

स्पर्धेसाठी
काव्यांजली
विषय- रिमझिमतं मन

शिर्षक- धारा पावसाच्या


रिमझिमतं मन
नाचते पावसाच्या धारेत
एकसुरी तारेत
आनंदाने

रिमझिमत्या पावसाने
झाडीवेली तृप्त झाल्या
समाधानी दिसल्या
डोलताना

गारवा वाढला
थरथर जीवाचीही वाढली
धुंदी चढली
आपसूकच

प्रेमवीरांच्या आणाभाका
निसर्गाच्या साक्षिने होती
भविष्य पाहती
नयनांमध्ये

रिमझिमतं मन
अनुभव प्रेमाचे घेते
साथ देते
एकमेकांना

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 6 June 2021

चारोळी ऱ्य( शिवराज्याभिषेक )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- राज्याभिषेक

शिर्षक- क्षण आनंदाचा

क्षण आनंदाचा राज्याभिषेकाचा
परिपूर्णत्वाचा जाणत्या राजांचा
स्वप्नपूर्ती झाली हिंदवी स्वराज्याची
छत्र चामरात,शोभे मान छत्रपतींचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 19 May 2021

कविता (बाल आनंद)

चित्रकाव्य

शिर्षक- बाल आनंद

चला खेळूया मैदानावर
सवंगड्यांना घेऊन सोबत
नाही पारावार आनंदाला
जणू अंधारातील तो खद्योत

उंच उडी मारून हवेत
बालक निखळ हसत आहे
घेऊन आधार बॅटचा घट्ट
स्वतःला सहज तोलून पाहे

कुंपण आहे साक्षिला शेजारी
दादा सावरतो मित्राचा तोल
छोटू अनुभवतो क्षण सारे
मिठी दादाची कीती अनमोल

हिरवाई सुचवते नवजीवन
संघर्ष करतच जगायचे 
कीती आल्या अडचणी तरी
मनसोक्तपणे हुंदडायचे

शाळा असल्या बंद जरी
कसरत करण्या नको कमी
खेळाबरोबर व्यायामाची 
द्यावी सर्वांना हीच हमी

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 8 May 2021

कविता ( माझा गाव माझा अभिमान )

काव्यलेखन स्पर्धेसाठी

विषय- माझा गाव माझा अभिमान

शिर्षक- कुरुंदवाड नगरी

पंचक्रोशीत दुमदुमली
माझी कुरुंदवाड नगरी
माझा गाव माझा अभिमान
भासे स्वर्गच अवतरे भूवरी

राजे पटवर्धन सरकार
राजवाडा होता खरा बुलंद
मंदिर विष्णूचे बनविले 
घाटावर खेळे वारा बेधुंद

ऐतिहासिक परंपरा न्यारी
संगीत भूषण येथे जन्मला
कर्ता करविता सर्कशीचा 
छत्रे असती, जगी बोलबाला

हिंदु-मुस्लिम ऐक्य दिसते
मशिदीतही गणेश बसतो
ढोल-ताशे नाद घुमतो
जातियतेच्या भिंती नसती

कृष्णा-पंचगंगा संगम भारी
दत्तात्रय पदस्पर्शाने पावन झाला
भक्तजण जमती आदरभावे
दिगंबराचा घोष येथे घुमला

कृषी, कृषीवल सर्वत्र दिसे
वांगी प्रसिद्ध कृष्णाकाठची 
बासुंदी, पेढे,खवा भारी इथला
घाई चविष्ट जेवण खाण्याची

खेळ खेळती मनसोक्तपणे
मल्लविद्या, तालिम बहरते
खो-खो,कबड्डी,हॉलीबॉल 
वेटलिफ्टिंग परदेशी नावाजते 

सुजलाम, सुफलाम माझी नगरी
अभिमानाने गर्जत असती
एकोप्याने अन् माणुसकीने
सुखी समाधानी सारी राहती

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 18 April 2021

चारोळी (माणुसकी )

चारोळी

माणुसकी

माणुसकी शोधता सापडत नाही
संकटसमयी सहजच प्रकटते
आधार देत एकमेकांना स्नेहाने
धीराने महामारी छेदून जाते

रचना
श्रीमती माणिक नागावे

Friday, 2 April 2021

हायकू ( आश्रय )

हायकू

आश्रय

घेती आश्रय
बुंध्यावर वृक्षांच्या
जाती लतांच्या

जातात वर
सहज आधाराने 
घेती धीराने

अधिवासात
आश्रित राहतात
एक होतात

पर्यावरण
आश्रयाचे दालन
करा पालन

वसुंधरेला
दिनमणीचे दान
असावे भान

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (तिरंगा )अष्टाक्षरी

अष्टाक्षरी

तिरंगा
          १
जांभळट पार्श्वभूमी
तिरंग्याचे फडकणे
पर्वताच्या माथ्यावर
डौलदार ते दिसणे
             २
आकाशात दिसतात
तारकांचे शुभ्र गोल
स्वर्णमयी किरणांचा
देखावाच अनमोल

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 22 March 2021

कविता( वनवास )

उपक्रम

विषय - चित्रकाव्य

शिर्षक-- वनवास

जागतिक महामारी काय आली
सारे जीवनच कोलमडून गेले
बंद वाटा,बंद दारे,बंद गावोगावी
पोटापाण्याचे हाल झाले.

उदरभरणासाठी आगतिक मानव
चहुदिशांना असहाय्यपणे पांगला.
पाय अनवाणी, दिशाहीन भटके
कुठे,गांव,कुठे घर नी कुठे बंगला? 

संसार डोईवरती लादुनी 
बायका पोरे फरफटत नेई
रक्ताळले पाय, निघाली पोपडे
दिशाहीन तारु कुठे जाई? 

स्वकीयच झाले परके येथे
दुरदेशीचे सदन हाक घालते
नको बघणे वळुनी मागे 
रक्ताळलेली वाटच हात देते

तमा न मजला पोळलेल्या पायांची
चालून चालून थकले कीती ते
कठीण कातडी तरी सोलवली
अंतरंग लालसर वेदना देते

वनवास भयंकर पदरीं आला
लहानगीला का बरे शिक्षा? 
काय गुन्हा अर्धांगिनेने केला ?
कोण करणार याची समिक्षा? 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( खाऊचे झाड )

कविता
खाऊचे झाड

चला चला जाऊ सारे
पहायला झाड खाऊचे 
सारी लागली पळायला 
वाटेत घर छान माऊचे

म्याऊ म्याऊ कुठे चाललात
तोंड पुसत मनीमाऊ बोलली
खाऊचे झाड ऐकताच तीपण  
साऱ्यांच्या मागे पळू लागली

पाहून झाड हरकली सारे 
मुलं उड्या मारु लागली 
खाऊच खाऊ झाडावर 
खुळ्यासारखी सारे वागली

चॉकलेट,गोळ्या, बिस्किटे
मिठाई गोड गोड आवडीची
पानापानावर फुलले फुलबाजे
भाजी पानांची नावडीची

पोटभर खाऊन झाले
ढेकर देऊन हसू लागले
शहाणपणाच कामाला आला
एकमेकांशी प्रेमाने वागू लागले

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( तुळशी वृंदावन )

चारोळी
तुळशी वृंदावन
 
लिंपून छान तुळशी वृंदावन
पहाट प्रहरी पाणी घालती
मनोभावे नमन शांतचित्ताने
सूवासिनी फेऱ्या मारती 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( काटकसर )

उपक्रम

चारोळी

काटकसर

साठा जलाचा संपत चाललाय
गरज काटकसरीने वापरायची
रोखून प्रदूषण, ठेवून स्वच्छता
निसर्गरक्षा आहे अंगीकारायची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 18 March 2021

चारोळी (आरंभ )

चारोळी

आरंभ

आरंभ चारोळीने आज केला
समुहात प्रवेश केल्यानंतर 
उपक्रमाच्या हिंदोळ्यावर 
शब्दांची सुमने झाल्यावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 4 March 2021

अष्टाक्षरी ( मायबाप )

उपक्रम

अष्टाक्षरी

मायबाप

असतात नेहमीच
 हृदयात माता पिता
मुलांच्याच आनंदात
नाही होत कधी रिता

सकलांना दे आधार
मानस्तंभ घरातील
आज्ञा त्यांच्या मानाव्यात
मनातून फुलतील

प्रेरणाच देती सदा
आपल्याच लेकरांना
यशोगाथा लिहण्यास
प्रोत्साहन पाखरांना

मायबाप छायावृक्ष
सदा उभे शिरावर 
जसा देतो सावलीच
वट गोल पारावर

बोल अनुभवी देती
 संकटात सावरती
लक्ष देऊन ऐकावे
सुखी क्षण जागवती

लेक लाडकी लाडाची
पाठवणी करतात
रडताना डोळ्यांनाच
उगीचच पुसतात

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

षडाक्षरी( दूर पायवाट )

उपक्रम

दूर पायवाट


मज आठवते
सदा सर्वकाळ
दूर पायवाट
गावाचा तो माळ

गावरान दृश्य
मोहवते मना
नागमोडी वाट
दिसे सर्व जना

खडकाळ रस्ता
डांबराची आस 
सरकारी गोष्टी
होतो फक्त भास

मातीने भरली
म्हणती फुफाटा
चालताना पायी
रुते रुक्ष काटा

तरीही आवडे
पायवाट फार
आठवते सदा
मायेचा आधार

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी (म्हातारपण )

चित्रचारोळी

संपत चालली वेळ म्हातारपणी
समय मापदंड भरला तरुणपणी
वर्तमानाचा धरून हात दाखवतो
शिदोरी अनुभवाची चरणोचरणी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता(प्राण्यांची शाळा )

स्पर्धेसाठी

कविता

विषय-प्राण्यांची शाळा

शिर्षक- जंगलातील शाळा

चला चला पाहू या सारे,
आनंदाने प्राण्यांची शाळा.
भेटायला आली सगळे ,
पडती एकमेकांच्या गळा.

सिंह आला गुरुजी बनून,
ओळीत बसून घ्या बरे.
ससा,माकड,वाघ अन् कोल्हा,
आंघोळीसाठी शेजारी झरे.

हरण आले उड्या मारत,
हत्ती आला झुलत झुलत.
झेब्र्याची तर उंचच मान,
अस्वल आले डुलत डुलत.

गमभन ,बाराखडी काढली,
नाही काढली तर हातावर छडी.
माकडांनी कवायत केली.
वरुन मारली खाली उडी.

गाणी गप्पा गोष्टी झाल्या,
शाळा सुटायची वेळ झाली.
घणघण घंटा वाजली जोरात,
सारी प्राणीमुले पळत गेली.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

षडाक्षरी(पळस फुलला )

उपक्रम

षडाक्षरी

विषय-पळस फुलला

वसंत ऋतूत
पळस फुलला
गडद केशरी
लाल रंग आला

औषधी गुणांचा
आयुर्वेदातील
समुह पानांचा
तीन दिसतील

रुंद जाड पर्ण
पत्रावळीसाठी
बिया फार कडू
रोग जाण्यासाठी

पळस पापडी
संस्कृत पलाश
थबके प्रवासी
थकवा खलास

भुरळ पडते
अनोख्या रंगांची
विस्तवासारखे
शांतता डोळ्यांची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी( स्वाभिमानी माता )

राज्यस्तरीय अष्टाक्षरी चारोळी स्पर्धेसाठी

शिर्षक- स्वाभिमानी माता

स्वाभिमानी असे माता
बाळ घेई अंगावर
डोईवर खलबत्ते
लक्ष तिचे ध्येयावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (वसंत ऋतू )

साप्ताहिक लेखन स्पर्धेसाठी

विषय- वसंतोत्सव करू साजरा

काव्यप्रकार- दशाक्षरी

शिर्षक- वसंत ऋतू

आला ऋतू वसंत हा आला.
वर्षावत सुंदर फुलांना.
सोनपिवळी पालवी आली,
हलकेच निष्पर्ण झाडांना.

बरसात रंगाची न्यारीच,
रंगीबेरंगी सुमने भारी.
सुगंधित आसमंत वाटे,
तन सहजच दु:खहारी.

सजली धरा हिरवाईने,
सर्वां भासे नववधूसम.
भास्कराच्या भेटीने लाजली,
आहे तिचाच तो प्रियतम.

आम्रतरूवर  बोले मैना,
मंजूळ ताल भुलवी मना.
चैत्राचे चैतन्य बहरले,
चराचर मोदे घेई ताना.

लोचनी सौंदर्य प्रसवले,
कलिकांची पुष्पे फुलारली.
वातावरणी मोद पसरे,
अवनी सारी धुंदच झाली.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 28 February 2021

कविता (सूर्यास्त )

अ.भा.शि.साहित्य-कला-मंच

मासिक काव्यलेखन स्पर्धेसाठी कविता

विषय- अशा सांजवेळी

शिर्षक- सूर्यास्त

विचार आले अशा सांजवेळी 
आवर्तने घेत मनामनातून
पाहून सुर्यास्त आकाशात
सौंदर्य भरले कणाकणातून

फिरती माघारी घरट्याकडे
खग फडफडवती पंख ओढीने
आस मनाला सान पिलांची
राहती सहकार्य अन् गोडीने

ओढ आईची लेकराला
माता आगतिक संसारासाठी
दिवस बुडण्याची भिती मनात
धडपड करी पोहचण्यासाठी

छटा सोनेरी तरुवरी फुलल्या
आसमंती लालीमा पसरली
दृश्य मनोहर पाहून हसली
धरा रोमहर्षित पहा झाली

शिणलेल्या मनाला हवा विसावा
पारावर गोतावळा जमला 
जाणून घेतले सुखदुःख सारे 
मनोभावनांचा निचरा झाला

आयुष्याच्या सांजवेळी 
हिशोब जीवनाचा केला
आपलेच संचित आपल्या हाती
सारा कर्तृत्व कर्माचा बोलबाला

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 21 February 2021

चारोळी ( भाषा )

उपक्रम

चारोळी
विषय- भाषा

माध्यम संपर्काची भाषा 
देवाणघेवाण भावभावनांची 
प्रकार जरी अनेक तरी 
जोडते तार मनामनांची 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (मुक्तसंचार )

चित्रचारोळी

मुक्त संचार

निरभ्र आकाशी घेती भरारी
 करी मुक्त संचार उघडून पर
अलगद उघडून कर प्रेमाने
जाती पाखरे आनंदाने वर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( धुरळा )

धुरळा

कामाचा असो वा मातीचा
धुरळा हा उडतोच उडतो
कीतीही गेला वर जरी 
शेवटी खाली धरतीवरच पडतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (नवी पहाट )

उपक्रम

हायकू

विषय- नवी पहाट

नवी पहाट
सोनेरी किरणांची
सुखवायची

लाल केसरी
लालीमा पसरली
प्राची हसली

जागी अवनी
कामात चराचर
भरे उदर

व्यायामासाठी
योगासने करती
फिरण्या जाती

आरोग्य लाभे
लवकर उठणे
खूप जगणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (वसंत ऋतू )

साप्ताहिक लेखन स्पर्धेसाठी

विषय- वसंतोत्सव करू साजरा

काव्यप्रकार- दशाक्षरी

शिर्षक- वसंत ऋतू

आला ऋतू वसंत हा आला.
वर्षावत सुंदर फुलांना.
सोनपिवळी पालवी आली,
हलकेच निष्पर्ण झाडांना.

बरसात रंगाची न्यारीच,
रंगीबेरंगी सुमने भारी.
सुगंधित आसमंत वाटे,
तन सहजच दु:खहारी.

सजली धरा हिरवाईने,
सर्वां भासे नववधूसम.
भास्कराच्या भेटीने लाजली,
आहे तिचाच तो प्रियतम.

आम्रतरूवर  बोले मैना,
मंजूळ ताल भुलवी मना.
चैत्राचे चैतन्य बहरले,
चराचर मोदे घेई ताना.

लोचनी सौंदर्य प्रसवले,
कलिकांची पुष्पे फुलारली.
वातावरणी मोद पसरे,
अवनी सारी धुंदच झाली.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 11 February 2021

चित्रहायकू ( फुलपरडी )

चित्रहायकू

फुलपरडी

रंगीबेरंगी
विविध रंगी फुले
गच्चीत डुले

नक्षी सुंदर
कलाकारी नाजूक
पेलते हुक

 फुलांची कुंडी
 चारी बाजू बांधली
छान टांगली

लाल पांढरी
 पुष्पे टवटवीत
सर्वां हवीत

हिरवी पाने
मधून डोकावती
लवलवती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 10 February 2021

हायकू (खट्याळ सांज )

हायकू

खट्याळ सांज

मना भावते
खट्याळ सांज भारी
आनंद उरी

वारा वाहतो
चराचर हलते
धुंद डोलते

सूर्यास्त वेळ
पक्षी निघाले घरा
छान आसरा

गुराखी चाले
सोबती जनावरे
रानात चरे

निस्तेज झाली
टवटवीत फुले
वेचती मुले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 7 February 2021

कविता, अष्टाक्षरी (आयुष्याच्या संध्याकाळी )

काव्यस्पंदनी रविवारीय चित्रकाव्य स्पर्धा

अष्टाक्षरी

शिर्षक- आयुष्याच्या संध्याकाळी


दोन जीव असहाय
चालतात रस्त्यावर
आयुष्याच्या संध्याकाळी
भार झाले मुलांवर

हात धरून हातात
एकमेकां सांभाळती
अनवाणी पाय त्यांचे
पहा उन्हात पोळती

काठी आहे आधाराला
तोल तीच सावरते
वृद्धत्वाने आपसूक
काया ही थरथरते

खांदे झुकले वयाने
देही खुणा वार्धक्याच्या
सोबतीला ताठ मान
स्वाभिमानी पावलांच्या

शुभ्र अनुभवी केस
वस्त्र पाहता ढगळी 
नाही कदर कुणाला
रीत ही जगावेगळी

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 31 January 2021

हायकू (नागवेल )

हायकू

नागवेल

विड्याची पाने 
पायपर बिटल 
नांव सेटल 

खाऊची पाने 
मुखशुद्धीस छान
पूजेत मान 

सदाहरित
बहुवर्षायू वेल
सर्वा मिळेल 

हृदयाकृती 
वर्ण चकचकीत 
ती सुगंधित

औषधी गुण
वात कफ नाशक 
असे पाचक

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (शांतिदूत )

उपक्रम

चारोळी

शांतिदूत

वर्णद्वेषाच्या जोखडातून सुटका
अहिंसेच्या मार्गाने शांतिदूताने
केली देशबांधवांची निश्चयाने 
जणू पखरण केली देवदुताने 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( सकवार )



चित्रचारोळी

नाजूक, सकवार कोमलबाला 
जपायलाच हवी तळहातावर 
कुशी मातेच्या करांची सुरक्षित
बनू दे कर्तृत्ववान स्वबळावर 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( आधार )

चारोळी

आधार

आधार शब्दाची धार धीराची
संकटसमयी समजून सांगते
शब्दांची ही किमया न्यारी 
सहनशीलतेची कसोटी घेते 

रचना
श्रीमती माणिक नागावे

Tuesday, 26 January 2021

चारोळी (तिरंगा )

चारोळी

तिरंगा

तीन रगांची न्यारी किमया
त्याग सुचिता समृध्दी देई
अभिमान भारतवासीयांचा
दर्शनाने ऊर भरुन येई

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

हायकू ( परागकण )

हायकू

 परागकण 

परागकण
मध्यभागी फुलाच्या
छान जोडीच्या

नवनिर्मिती
स्री-पुंकेसर करी
कलिका धरी

पसरवते
बीज वात सर्वत्र
सुंदर गात्र

वंश राखतो
परागीभवनाने 
तनमनाने 

पर्यावरण
समतोल राखतो
मध चाखतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 20 January 2021

हायकू ( मंत्रमुग्ध )

हायकू

मंत्रमुग्ध

निसर्गदृश्य
आनंदाची पर्वणी
गातसे गाणी

चराचराचे
विलक्षण सौंदर्य
दिसे औदार्य

डोंगरमाथा
हिरवीगार झाडी
नेसली साडी

घेते वळण
सरिता वक्राकार 
छान आकार

निरभ्र नभ
कापूस पिंजलेला
दाद कलेला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 18 January 2021

चारोळी ( राष्ट्रध्वज )

स्पर्धेसाठी
चारोळी

विषय-राष्ट्रध्वज

तिरंगा नभी डौलात फडकतो
राष्ट्रध्वज सन्मान भारतवासियांचा
त्याग,समृद्धी अन् शांतता दर्शवी
अभिमान सदैव देशवासियांचा 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Saturday, 16 January 2021

षडाक्षरी( अवनी )

उपक्रम

षडाक्षरी 

विषय-निसर्ग कविता

शिर्षक- अवनी

सजली अवनी
मनी मोद झाला
चराचर फुले
गोड क्षण आला

बागेत कळ्यात
पराग लपती
सुगंधी वर्षाव
आनंदे करती

गवती कुरणे
पशूपक्षी वसे
सुखाचा मेळावा
समाधानी दिसे

निर्झर वाहती
खळखळ छान
संथ ती वाहती
दिसे वेगवान

डोंगर कपारी
न्हाती प्रकाशात
खगांच्या खेळांची
नक्षी आकाशात

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (मैफल )

मैफल

साहित्यिकांचा जमला मेळा
सजली मैफल काव्यालंकाराची
शब्दाशब्दांचा स्पर्धा सुरु झाली
सोबत अखेरपर्यंत अर्थालंकाराची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Friday, 15 January 2021

चित्रचारोळी (लाचारी )

चित्रचारोळी

रापलेल्या चेहऱ्यावर नोटेचे बंधन
हक्क मागायची वाटच बंद झाली
 मानव हतबल लाचार गुलामीत
कर्तव्यापुढे विवेकबुद्धी गहाण पडली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 14 January 2021

भावगीत(स्नेह तिळाचा अखंड राहो )

उपक्रम
भावगीत

विषय- स्नेह तिळाचा अखंड राहो 

स्नेह तिळाचा अखंड राहो
प्रेमभावना फुलत जावो ।। धृ।।

स्नेह वाढला तिळाने मनी
गोडी वाढली गुळाने जनी
जनमानसात रुजत जावो ।।१।।

सण संक्रातीचा उर्जेचा
आहे साऱ्यांच्या मर्जीचा 
स्नेहझरा हा सतत वाहो ।।२।।

गोड जरी अंगावर काटेरी रुप 
लहानथोरांना वाटते अप्रूप
नवरंगातील तिळगुळ खावो।।३।।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

उखाणे

उखाणे स्पर्धेसाठी

1)  प्राचीवरती सूर्य उगवला लालीमा उधळत
कल्लाप्पांचे नाव घेते साहित्य क्षेत्रात तळपत.

2) क्षण आला भाग्याचा वाढदिवसाचा
कल्लाप्पांचे नाव घेते उत्सव संक्रातीचा.

3) तिळ फुलला गुळाच्या गोडीने
संसार रथ सजला कल्लाप्पांच्या जोडीने.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी (आला सण संक्रांतीचा )

आला सण गोड संक्रातीचा 
वाढवण्या स्नेह,गोडी तिळगुळाची 
गोड गोड बोलून प्रेम वाढवू आपले
जुळून येतील नाती मनामनाची 

माणिक नागावे

चारोळी (जिजाऊ )

स्पर्धेसाठी

विषय- राजमाता जिजाऊ माँ साहेब

संस्काराच्या मुशीतून घडवला
संस्थापक हिंदवी स्वराज्याचा 
राज्याभिषेकाने पावन केला
नरवीर स्वाभिमानी बाण्याचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

चारोळी(स्वराज्यजननी )

चारोळी

स्वराज्यजननी

थोर माता स्वराज्यजननी 
प्रेरणा शूर प्रतापी शिवरायांची 
रचला पाया हिंदवी स्वराज्याचा 
लकेर शोभे वदनी समाधानाची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( तृण )

हायकू

विषय - तृण


हिरवे तृण
गालीचा मऊशार 
पायाला गार 

गवत छान
उगवले दारात 
मोद ऊरात

गजाननास
आवडतात दुर्वा
वाटतो हवा

खाद्य प्राण्यांचे 
औषधी गुणधर्म
जाणते मर्म

गवतावर 
सुखावते मनाला
सुख तनाला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

कविता (राजमाता जिजाऊ )



शिर्षक- राजमाता जिजाऊ

माता जिजाऊ थोर माता
आनंदाने संघर्षातून सोशिकतेने
प्रसविला स्वराज्य संस्थापक
संयमाने घडविला पुत्र निर्भयतेने

सहवासाने बाल मावळ्यांच्या 
दिली प्रेरणा लढण्यासाठी
संस्काराच्या सांगून गोष्टी 
थोर चरित्रे शिवबासाठी

चालविला नांगर सोन्याचा 
बालशिवाजीच्या कोमल कराने 
नाही भिती निर्वंशाची मनी होती
अंधविश्वास सारीला निकराने

गडकिल्ले मिळविले सुसंवादाने 
नाही बधले त्यांच्यावर स्वारीने 
तोरण स्वराज्याचे बांधले नेटाने
प्रसंगी पेलले संकट तलवारीने

राज्याभिषेक सोहळा अतिसुंदर
पूर्णत्वाची भावना मनोमनी दिसे 
राजमाता जिजाऊ झाल्या माँसाहेब
जनतेचाच विकास ध्यानी वसे

समाधानाने देह ठेवला धरेवर 
लाडकी लेक सिंदखेडराजाची 
बनली महान माता शिवरायांची 
अर्धांगिनी शूरवीर शहाजीराजांची

कवयित्री
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
साने गुरुजी विद्यालय,कुरुंदवाड
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
mknagave21@gmail.com
मोबा.नं.9881862530

Saturday, 9 January 2021

चित्रचारोळी(मातृत्व )

उपक्रम
चित्रचारोळी

मातृत्व

मातृत्वाची परिभाषाच वेगळी
सावरते पिल्लांना आकांताने
आईवर विश्वास मुलांचा भारी
पकडून ठेवती एकमकां चिकाटीने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( अवचित )

चारोळी

अवचित

काल अचानक अवचित बरसला
वाटे ऋतूमानाचेही गणित चुकले 
विषाणूच्या नावाखाली सहजच
कीतीक निरागस प्राणास मुकले

रचना
श्रीमती माणिक नागावे

चारोळी ( ध्यास स्वप्नपूर्तीचा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- ध्यास स्वप्न पूर्तीचा 

उरी ध्यास स्वप्न पूर्तीचा सदैव
प्रोत्साहन लेखणीस सारस्वतांच्या 
निरलसपणे सेवा ध्येयपूर्तीसाठी
राशी पडल्या अलंकृत शब्दांच्या 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (शतपावली )

उपक्रम
चारोळी

शतपावली

जाणून महत्त्व आरोग्याचे
शतपावली अंगीकृत केली 
आयुष्याच्या संध्याकाळीसुद्धा 
गरज ओळखून पुन्हा स्विकारली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

मुक्तछंद (सावित्रीबाई फुले )

मुक्तछंद काव्य

विषय- क्रांतिज्योती सावित्री


मनुवादाच्या काळ्याकुट्ट अंधारात
चाचपडत,रडत,खुरडत होती नारी
अंगवळणी पडले होते जन्मोजन्मी
नव्हते वाटत होते ते अघोरी 
गांजलेल्या, पिचलेल्या स्त्री- शक्तीला 
करण्या जागे अवतरली ज्योती 
मिणमिणत्या प्रकाशात धडपडत 
मशाल क्रांतिकारी पेटवली.
धगधगत्या अग्निकुंडातली ज्वाला 
लवलवतच पसरली दाही दिशा 
जनमानसात उमटवला ठसा भारी 
विरोधकांचा करुन बिमोड विचाराने 
कृतीतून शिक्षणगंगा दारी आणली.
बहुजनांच्या मुलींना दारी खुली शिक्षणाची 
अडथळे बहु पण निर्धार प्राणपणाचा 
साथ ज्योतीला क्रांतीज्योतीची 
धुरा हाती सत्यशोधक समाजाची
भाव मनीचे उमटले साहित्य संपदेत
पुत्र मानस यशवंत महान 
आदेश मातेचा केली सेवा प्लेगरुग्णांची 
झेलला काळाचा घाला हसतमुखाने 
निघाली थोर माता अंताच्या सफरीवर
थोर उपकार मातेचे नारीजातीवर
वंदनीय, पूजनीय, वात्सल्यमूर्ती 
वंदन तुजला करते मनोभावे 
आठव तू,तू प्रेरणा सबलतेची 
जाण ठेवून कृतीची माते 
जातील पुढेपुढे या आजच्या नारी.


कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी( सावित्री )

स्पर्धेसाठी

चारोळी

सावित्री

स्त्री-जातीची उद्धारक सावित्री
 क्रांतिकारी ज्योत जोतिबाची 
साहून अनन्वित अत्याचार 
खंबीर मनस्विनी छाया दुर्गेची 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

हायकू (फुलपाखरू )

चित्रहायकू

फुलपाखरू

फुलपाखरू
पानावर विसावे 
मना मोहवे

नक्षी सुंदर
अंगावरी शोभते
छान दिसते

तांबूस लाल
पंखावरती डोळे
पिवळे काळे 

लांबलचक
मिशा काळ्या दिसती
मार्ग शोधती

मोह मनाला
वाटे धरावे हाती
उडून जाती

कोमल जीव
जपावे मनोभावे
संगीत गावे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

अभंग ( हे गजवदना )

साप्ताहिक रविवारीय साहित्य लेखन स्पर्धा 28 साठी

साहित्य प्रकार - अभंग

विषय- गणपती

शिर्षक- हे गजवदना

नमन तुजला। हे गजवदना।
सुख देशी मना। सदोदित।।१।।

पुत्र शंकराचा । पार्वती नंदन।
करितो वंदन। मनोभावे।।२।।

मोहक दर्शन। लोभस लोचन।
संकटमोचन। आळवीती ।। ३ ।।

सुपासम कर्ण । सोंड शोभे भारी।
आवड ती भारी। मोदकाची।। ४।।

गळा शोभे माळा। कुंडले कानात।
दंत वदनात। चमकती ।।५।।

मूषक वाहन। तल्लीन पायाशी ।
कृपा अभिलाषी। प्रामाणिक।।६।।

गणपती बाप्पा। विद्येची देवता ।
संकटी पावता। दु:खहर्ता ।।७ ।।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 1 January 2021

चारोळी( सुख यावे दारी )



चारोळी

विषय-सुख यावे दारी

सुख यावे दारी अट्टाहास साऱ्यांचा
नववर्षाच्या प्रारंभी संकल्प करती
सकारात्मकता बाणवून प्रयत्नांती 
जे लढती तेच सफल या जगती 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर