Monday, 22 March 2021

कविता( वनवास )

उपक्रम

विषय - चित्रकाव्य

शिर्षक-- वनवास

जागतिक महामारी काय आली
सारे जीवनच कोलमडून गेले
बंद वाटा,बंद दारे,बंद गावोगावी
पोटापाण्याचे हाल झाले.

उदरभरणासाठी आगतिक मानव
चहुदिशांना असहाय्यपणे पांगला.
पाय अनवाणी, दिशाहीन भटके
कुठे,गांव,कुठे घर नी कुठे बंगला? 

संसार डोईवरती लादुनी 
बायका पोरे फरफटत नेई
रक्ताळले पाय, निघाली पोपडे
दिशाहीन तारु कुठे जाई? 

स्वकीयच झाले परके येथे
दुरदेशीचे सदन हाक घालते
नको बघणे वळुनी मागे 
रक्ताळलेली वाटच हात देते

तमा न मजला पोळलेल्या पायांची
चालून चालून थकले कीती ते
कठीण कातडी तरी सोलवली
अंतरंग लालसर वेदना देते

वनवास भयंकर पदरीं आला
लहानगीला का बरे शिक्षा? 
काय गुन्हा अर्धांगिनेने केला ?
कोण करणार याची समिक्षा? 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment