*पुस्तक परीक्षण*
जीवनमार्गदर्शक लेखसंग्रह
*प्रश्न तेच,पाऊलवाटा नव्या*
जीवन जगत असताना सुखाबरोबर दुःखाचे येणे अटळ असते. पण सुख आले की हुरळून न जाता व दुःखात घाबरून न जाता, आलेल्या संकटांना व दुःखांना सकारात्मकतेने सामोरे गेले की दुःखाचा भार हलका होतो. यासाठी आपल्याला विविध छंद जोपासण्याची आवश्यकता आहे. जसे आपण कर्म करत असतो तसेच फळ आपणाला जीवनात मिळत असते असे विचार लेखक एम. एस. जाधव यांनी *प्रश्न तेच पाऊलवाटा नव्या* या त्यांच्या पुस्तकातील *जगण्याचे कर्म आणि मर्म* या पहिल्याच लेखातून सांगितले आहे.
*पाणी प्रदूषण* रोखण्यासाठी ठोस निर्णय, कृती महत्वाची या लेखातून पाणी म्हणजे जीवन आहे. या पाण्याचा वापर योग्य रीतीने केला पाहिजे. या पाण्याचे प्रदूषण आपण रोखले पाहिजे. ही काळाची गरज आहे. हे सांगून लेखकाने त्यावर उपायही सांगितला आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण या मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा याबद्दलचे आपले विचार *मोबाईलचे स्वरूप, वापर, तोटे आणि फायदे* या लेखात लेखकाने सुंदर रीतीने केले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे सुसंवाद व्हायच्या ऐवजी मानव अबोल झाला आहे, व मनाला आनंद देणारे छोटे-छोटे खेळ सुद्धा आपण विसरून गेलो आहोत. संस्काराचे मनोरे गळून पडले आहेत,याची खंत ते यात व्यक्त करतात.
*निवडणूक* या लेखात लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत असतानाच आजच्या युगात यासाठी जो गैरमार्ग अवलंबला जातो हे पाहून लेखकाचे मन दुःखी होताना दिसते. लोकशाहीतील मतदार राजाने कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता योग्य तोच उमेदवार निवडून दिला पाहिजे असा सल्लाही ते जाताजाता देतात .
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती त्यामुळे सर्वांना आपल्या मनाप्रमाणे वागता येत नव्हते. मनाला मुरड घालण्याची सवय लागत होती. एकमेकांना आधार देत एकमेकांबद्दल आदर,प्रेम व्यक्त करत कुटुंबातील सदस्य रहात होते.आता समाजाचे चित्र बदलले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हाती पैसा आल्यामुळे पालक आपल्या पाल्यांना मागेल तसा पैसा पुरवत आहेत, त्यामुळे हवा तेव्हा हवा तेवढा पैसा मिळत असल्यामुळे या मुलांना हा पैसा कुठून येतो याची जराशीही जाणीव नसल्यामुळे त्यांना त्या पैशाची किंमत वाटत नाही. आणि हा दिलेला पॉकेटमनी मुले कशावर खर्च करतात याची दखल ही पालकांच्या कडून घेतली जात नाही. *पॉकेटमनी कशासाठी?* या लेखांत लेखकाने अतिशय गंभीरपणे विचार केलेला आहे.
आजच्या स्पर्धेच्या व जागतिकीकरणाच्या युगामध्ये *प्रसार माध्यमांचा युवा वर्गावर होणारा परिणाम* अतिशय सुंदर शब्दांमध्ये लेखकाने व्यक्त केलेला आहे.
आज भ्रष्टाचार हा परवलीचा शब्द झालेला आहे यावर अनेकांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. उपाय ही सुचवलेला आहे. लेखक जाधव यांनी *भ्रष्टाचार, एक कारणमीमांसा आणि उपाय* या लेखात नियमबाह्य वर्तन करणे म्हणजे भ्रष्टाचार होय अशी साधी सुटसुटीत भ्रष्टाचाराची व्याख्या केलेली आहे. भ्रष्टाचाराची ही कीड कुठेतरी थांबायला पाहिजे यावर उपाय सुचवताना माणूस भ्रष्टाचारी का झाला यावर त्यांनी चिंतन केले आहे. ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीला जर यश आले नाही तर आपणापुढे रक्तक्रांती शिवाय पर्याय नाही असा क्रांतिकारी विचार येथे व्यक्त करताना दिसतात.
*गुंडांना राजकीय नेत्यांचा व पोलिसांचा वरदहस्त* या लेखात आजचा देशाचा आधारस्तंभ असलेला तरुण वर्ग खून मारामाऱ्या, लूटमार, बाह्य आकर्षण,व त्यांना नेत्यांच्याकडून मिळत असलेले अभय यामुळे काही बेताल तरुण गल्लीबोळातून दहशत माजवताना व सामान्यांचे जीवन बेहाल करताना दिसतात.यावर पोलीस प्रशासनाने निष्ठेने कार्य करावे अशी एक प्रामाणिक इच्छा लेखक व्यक्त करतो.
*वृत्तपत्रे-ग्रामीण पत्रकार समस्या, जबाबदारी व सद्यस्थिती* या लेखात लेखकाने पत्रकारिता ही समाजातील खरी परिस्थिती जनतेसमोर आणण्याचे काम करत असते . अशावेळी पत्रकारांना अभय देणे,त्यांचे संरक्षण करणे,त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देणे,गरजेचे आहे ही वस्तुस्थिती लेखकाने प्रामाणिकपणे व्यक्त केली आहे.
आजच्या चंगळवादी समाजात व्यसनाच्या राक्षसाने अनेकांचा बळी घेतला आहे.या व्यसनाधीनतेमुळे होणारे दुष्परिणाम त्या व्यक्तीबरोबर त्याच्या कुटुंबातील लोकांना सहन करावे लागतात. परिणामी सर्वांचीच मानसिकता नष्ट होते.व्यसन ही एक मानसिक व व्यक्तीनिष्ठ प्रक्रिया आहे त्यामुळे व्यसनापासून दूर राहणे सहजशक्य आहे असे मतही लेखक *व्यसनाधिनता समाजाला लागलेला शाप* या लेखातून परखडपणे मांडतात .
*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रकारीतेतील योगदान* या लेखात पिढ्यानपिढ्या दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा, चाली-रुढी इ.समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या दलित समाजाला जागृत करण्याचे काम बाबासाहेबांच्या लेखणीने केले आहे.त्यासाठी त्यांनी अनेक नियतकालिके, पत्रके काढली व समाजातील लोकांना जागे करण्याचा प्रयत्न केला.हे सोदाहरण वाचकांच्या समोर मांडले आहे.
प्लॅस्टिक आज हद्दपार होऊ घातलेले आहे पण ते सहजासहजी शक्य नाही कारण जोपर्यंत प्लॅस्टिक ला पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते पूर्णपणे हद्दपार होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता प्लॅस्टिक विरोधात करुन जर वागायचे ठरवले तरच ते शक्य आहे असा ठाम विश्वास लेखकाने *दैनंदिन जीवनातील प्लॅस्टिकचा वापर,परिणाम अन् उपाय* या लेखात व्यक्त केला आहे .
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते.त्यावेळी आपली मानसिकता महत्वाची भूमिका बजावते.अशावेळी सकारात्मकता कामी येते.अन्यथा नकारात्मक विचारांमुळे नको ते विचार मनात थैमान घालतात.आत्महत्या करणे हा एक नवीन पायंडा सध्या पडत आहे . *विद्यार्थ्यांची आत्महत्या: चिंतन व परीक्षण* या लेखात लेखकाने विद्यार्थ्यांची मानसिकता सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी थोरांची चरित्रे वाचावीत व त्यांपासून प्रेरणा घ्यावी व आपले अनमोल जीवन किंमती बनवावे,त्यासाठी वर्षभराचे नियोजन करावे,आत्मचिंतन करावे असे मार्गदर्शनही केले आहेत.
आर्थिक अडचणी सर्वांनाच येतात, अशावेळी साहजिकच बँकेकडे लोक जातात. कर्ज घेतली जातात, पण वेळेवर भरली जात नाहीत. त्यामुळे बँकांना याचा फटका बसतो,प्रसंगी त्या डबघाईस येतात.त्याचप्रमाणे घोटाळा होऊनही बँकांचे अस्तित्व धोक्यात येते. याची माहिती अनेक ज्वलंत उदाहरणाद्वारे लेखकाने *बँकींग क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा-पीएनबी* या लेखातून केला आहे.
शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे . शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे . हे जरी खरे असले.सर्वज्ञात असले तरी आजची शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून लेखन हवालदिल झालेला दिसतो . कारण आज शेतकरी हा ओला व सुका दुष्काळ,कर्जबाजारीपणा,रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा खालावलेला स्तर,वीज व पाणीटंचाई, पिकांवरील अनेक प्रकारचे रोग या व अशा अनेक कारणांमुळे त्रस्त झालेला आहे.स्वातंत्रपूर्व व स्वातंत्र्यानंतर चा काळ व त्यामधील शेतकऱ्याच्या अवस्थेचे बारकाईने निरीक्षण करुन लेखक जाधव यांनी *शेतीवरील संकटे आणि उपाय* या लेखात शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत याचा विचार समर्थपणे मांडला आहे .
कोणतीही गोष्ट असूदे त्याचा सराव केला की ती गोष्ट अत्यंत सफाईदारपणे करता येते.तसेच यशस्वी जीवनाचे आहे.क्षेत्र कोणतेही असो त्यातील यशासाठी सातत्याने सराव महत्त्वाचा आहे . सराव हा जिंकण्याचा खरा,सत्य, वस्तुनिष्ठ सिद्धांत आहे त्यासाठी सहनशीलता, निश्चलता अत्यंत आवश्यक असते हेही लेखक आपल्या *सराव यशाचे मापदंड* या लेखात करतात.यासाठी सरावाचे महत्त्व सांगणारी मा.हरिवंशराय बच्चन यांची कोशिश करनेवालोंकी हार नहीं होती ही कविता वाचकांच्या समोर ठेवली आहे.
ध्येय,इच्छा, महत्वाकांक्षा, किंवा यशासाठी स्वतःच स्वतःला दिलेला योग्य विचार म्हणजे मार्गदर्शन होय.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य मार्गदर्शन व मार्गदर्शकाची नितांत गरज आहे.तसेच आपण ठरविलेले ध्येय,लक्ष्य अचूक साध्य करता येईल असा ठाम विश्वास लेखकाने *मार्गदर्शन कशासाठी* या लेखात व्यक्त केला आहे.
जीवन जगत असताना ताण असावाच लागतो पण तोच ताण जर मर्यादेच्या बाहेर गेला की तो सर्वांचीच मानसिकता बिघडवून टाकतो.म्हणून जीवनात नेहमी सकारात्मकता अंगी बाणवली पाहिजे, चांगल्या सवयी लावून घेणे,कामाचे,वेळेचे नियोजन करणे अशा पद्धतशीर मार्गाचा अवलंब केला की जीवन ताणरहित होईल असे प्रांजळ मत लेखकाने *ताण-तणाव: संकल्पना, स्वरूप, परिणाम आणि उपाय* या लेखात केलेला आहे.
स्त्री पूर्वीपासून सबलाच आहे.आदिकालापासून तिला महत्व आहे. आजच्या युगात ती सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. कुटुंब पुरुषांपेक्षा स्त्रियांच चांगल्याप्रकारे चालवू शकतात याची अनेक उदाहरणे लेखकाने *रुढी परंपरेतून स्त्री मुक्त होत आहे* या लेखात दिली आहेत व स्त्रीच्या उज्ज्वल भविष्याची मनोकामना केली आहे .
पुस्तकाच्या समारोपाच्या लेखात *सरत्या वर्षाला निरोप,अन् नवे संकल्प* या लेखात लेखकाने मन,मनगट व मेंदू यांचा योग्य समन्वय साधून शांतता,समता,बंधूभाव, राष्ट्रप्रेम ,पर्यावरण संरक्षण, आत्मिक विश्वास वाढवण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे असा संदेश दिला आहे.
अशा वीस लेखांचा संग्रह असलेले हे 84 पानांचे पुस्तक वाचनीय आहे.आजच्या युवावर्गाला मार्गदर्शक असे आहे.सर्वांना मार्गदर्शक असणारे हे पुस्तक प्रत्येकाने विकत घेऊन वाचावे. पुस्तकाचे मुखपृष्ठ शिर्षकाला साजेसे आहे. मलपृष्ठावरील लेखकाची माहिती लेखकाबद्दल बरचं काही सांगून जाते.तेजश्री प्रकाशनाने पुस्तकाची बांधणी सुबक,आकर्षक केली आहे.कागदही उच्च प्रतिचा वापरला आहे.त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.पुढील आवृत्ती काढताना अक्षरांचा साईज थोडा मोठा ठेवला तर वाचकांना वाचताना त्रास होणार नाही . सुशिक्षितपणाचा कोणताही गंध नसलेल्या आईच्या प्रेरणेतून आपली लेखणी अखंडपणे चालवत असलेल्या लेखकाला त्यांच्या पुढील लेखनप्रवासासाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
*समिक्षण*
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment