Friday, 18 September 2026

कविता षडाक्षरी (गजवक्र)


दिनांक १८/९२०२६
साहित्य - षडाक्षरी काव्यलेखन 

विषय - गजवक्र

गजवक्र देवा
गणेश म्हणती
अनेक नावांनी
जन बोलावती 

सुंदर ती काया
मोहवे मनाला
वक्राकार सोंड
लोभस तनाला

मोदक आवडे
एकवीस सजले
प्रेमाने खाताना
तुंदिल हसले

दुर्वा आघाड्याची 
सोबत लागते
कषायांचा दाह
शितल वाटते

डोळ्यात करुणा 
ओसंडून वाहे
गजानन भक्तां 
सदोदित पाहे 

मूषक वाहन
विनम्र पायाशी 
सदैव प्रसाद 
दिसतो हाताशी

आशिष भक्तांना 
प्रेमभावे देतो 
वंदन पायाशी
नत सदा होतो

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड,ता.शिरोळ
जिल्हा.कोल्हापूर

Thursday, 9 July 2026

ओळख स्व:ताची



*विषय - स्वतःची ओळख आणि वेगळेपण* 

 *शायरी प्रकार* 

सांगते मी आज जगाला समजावून 
स्व:ताची ओळख आणि वेगळेपण 
लाडकी लेक मी मनू म्हणून बोलावती 
जरी असते नांव माणिक गोड बालपण 

कलेचे माहेरघर माझे कुरुंदवाड 
हस्ती महान ज्यांचे असे हे जन्मगाव 
मातापिता थोर गाजवले शिक्षणक्षेत्र
समाजसेवा असे नेहमीच श्रेष्ठ भाव

वारसा बंधू भगिनी आम्ही चालवला
प्रेमभाव,जनसेवा मार्ग अभिमानाने स्विकारला
घडवून नागरिक आदर्श संयमाने
ज्ञानामृताचा पवित्र वसा अंगीकारला

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Friday, 5 June 2026

कविता (शब्दांची ताकद)


विषय....शब्दांची ताकद
काव्य प्रकार....शायरी( मराठीत)

शीर्षक. शब्दधन

शब्दांची ताकद आजमवताना 
धुमारे अक्षरांना सहजी फुटले
एक एक विचार अलगद उतरले
अर्थामधूनी तीर भावनांचे सुटले

शब्दधन ज्याच्या अंतरी वसे
काव्य, साहित्य अलवार प्रकटे
शब्दधन प्रसवताना लागते 
कळ सोसावी आपण  एकटे

शब्द करतात घाव जहरी
न दिसणारे वळ जालीम 
नसे त्यावर औषध कोणते
चांगल्या शब्दांची व्हावी तालीम

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा.कोल्हापूर
9881862530

Tuesday, 5 May 2026

कविता (निसर्ग किमया)

काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित 
साप्ताहिक उपक्रम 
दिनांक -७/५/२०२७
विषय - चित्रकाव्य 
शिर्षक - निसर्ग किमया

सोनेरी प्रकाशात सर्वत्र पसरला 
सोनेरी निळसर ढग जमले 
पिवळसर पोपटी रंगाने
आकाश गोलाकार दिसू लागले 

वृक्षद्वय उभे ठाकले भूवरी
जणू दोन मार्ग जीवनाचे 
एक वेडावाकडा अनिर्बंधतेचा 
एक उभे दृश्य स्वाभिमानाचे 

छाया दोघांची वेगवेगळी
एक विखरली गटागटातून 
दुसरी एकसंध दाट सावली 
पसरली भुवरी सुंदर छटांतून 

मार्ग जीवनाचा सरळ असावा 
नसावा त्यात कोणता छुपेपणा
असावा सर्वांसाठी समान न्याय 
आपोआपच निसटे खोटेपणा 

वेडेवाकडे कंगोरे जीवनाचे 
सुखदुःख,अन्याय,अत्याचाराचे
पार करून सर्वांना निश्चयाने 
गाडून टाकू जीवन भ्रष्टाचाराचे 

सरळ मार्गाची उंचीच भारी 
वक्रता आपोआपच होते छोटी 
निसर्ग किमया कधी न कळली
मोहवी दुनिया खरी असो वा खोटी

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड जिल्हा - -कोल्हापूर

आला उन्हाळा

शब्दगंध साहित्य मंडळ आयोजित काव्य लेखन उपक्रम 
उपक्रम क्रमांक २०
 दिनांक ५/५/२०२६
 विषय - आला उन्हाळा 

जीवाची काहीली करत 
आला आला उन्हाळा आला 
धारा घामाच्या लागल्या 
कासविस जीव झाला 

भास्कर हा तापला तापला 
आला उन्हाळा सांगू लागला 
झाले मलूल चराचर सारे
लागे वृक्ष छाया शोधायला 

रणरणत्या उन्हातून जाती
कारागीर स्वत:च्या पोटासाठी 
पाय पोळते अनवाणी आता
भांडती लेकरे ताटासाठी

घर्मबिंदू पुसायाचे किती 
पदर ओला चिंब झाला 
लेकराच्या जीवापुढे मायेने
सूर्य सारा डोक्यावर घेतला 

काय करावे काय सूचना झाले 
वृक्षराईची महती पटू लागली 
सज्ज होऊ सारे पेरु बीजाला
वृक्षवल्लीची महती पटली 

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा 
 नागावे कुरुंदवाड 
जिल्हा, कोल्हापूर 
९८८१८६२५३०

Tuesday, 21 April 2026

कविता (दोन ध्रुवावर दोघे आपण)

मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान महाराष्ट्र 
(नोंदणी क्रमांक ९४१/२०२५) आयोजित भव्य
राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा २०२६ या स्पर्धेसाठी 

विषय-दोन ध्रुवावर दोघे आपण 
शिर्षक-दोन ध्रुवावर दोघे आपण 

दोन ध्रुवावर दोघे आपण 
आस भेटण्याची असे मनी
स्वप्नवतच ही सारी दुनिया
सलतसे उरी सल क्षणोक्षणी

दोन ध्रुवावर दोघे आपण 
ध्येय तरी आपले एक असे 
पूर्णत्वाला नेण्यासाठी 
प्रयत्न अपुरे कधीच नसे

दोन्ही ध्रुवावरची शीतलता भारी
एकसंध आहे तोवरच बरी
छळते भास्कराचे अस्वस्थ होणे 
हीम वितळे भीती ठरे खरी

शक्य अशक्यतेची दुनिया सारी 
भरवसा ना कधी कुणावर
विश्वास शोधे आधार स्वतःला 
मळभ दाटले पहा नात्यावर

श्रद्धेचा बाजार मांडला 
टांगली नीतिमत्ता वेशीवर 
भक्तीच्या पोकळ बुरख्याखाली 
शालीनता गेली फासावर 

प्रेम द्वेष मानवी भावना 
काय द्यावे आपण जगाला? 
परोपकार हाच जीवनाधार
कळेल कधी का हे मानवाला?

सांकेतिक क्रमांक-MSKKP255

Friday, 3 April 2026

प्रभू येशू

*शब्दगंध साहित्य मंडळ आयोजित उपक्रम क्रमांक-१३*
*दिनांक-३ एप्रिल २०२६*
*विषय-गुड फ्रायडे*
*शीर्षक - प्रभू येशू 
काव्यप्रकार - येशू स्तवन

प्रभू येशू जन्मला 
पावन झाली धरती
प्रकाश सर्वत्र पसरे 
गाऊ लागले आरती

देवतांनी आकाशातून
धरेवर वर्षाव केला 
प्रभू येशू बाळाला 
शुभाशीर्वाद दिला

तेज:पुंज बालक पाहता 
समाधानी लहर मनी
पोटी भगवान आला
आईबाबा धन्य जीवनी

जनकल्याण होते ध्येय
 उद्धार गरवंतांचा केला
पापी दुष्ट शक्ती नाराज
नेस्तनाबूत प्रयत्न झाला 

क्रुसावर चढविला 
क्रूरतेचा कळस गाठला
मुखी फक्त क्षमायाचना 
पुण्यसंचय आला गाठीला

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड, जिल्हा -कोल्हापूर
९८८१८६२५३०

Thursday, 12 March 2026

कविता -चैत्र पाडवा

शिर्षक -चैत्र पाडवा

सण हा मोठा भाग्याचा
आला हा चैत्र पाडवा
गुढ्या उभारुया दारी
आला वाणीत गोडवा.

सफाई घर,अंगणाची 
होतो आरोग्याचा वास
गुढीपाडवा आनंदाची लहर
वाटे सर्वांनाच हा खास 

नवसंकल्पनाना आली झळाळी
मनामनातून फुलले धुमारे 
परिमार्जन सर्व जुन्या चुकांचे 
सकारात्मकतेची वाहिली वारे 

राखतो आरोग्य कडुलिंब माळ 
माळ साखरेची राखते गोडवा 
वस्त्र भरजरी सांगे समृद्धी 
कलश शिरी शोभे हा पाडवा 

वेळू काठी देते मराठी बाणा 
असावा नेहमी स्वाभिमान
पुष्पमाला देते सुगंधित विचार 
संस्कृती भारताची जगी महान 

होळीत संपले वाईट विचार 
रंगात रंगला सारा संसार 
गुढीपाडवा सण भाग्याचा
महती याची असे अपार

कवयित्री 
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड या. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर
मोबाईल ९८८१८६२५३०

Tuesday, 20 January 2026

परिचय

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड , 
ता. शिरोळ , जिल्हा. कोल्हापूर.
फों नंबर 9881862530

मुख्याध्यापिका- हेरवाड हायस्कूल, हेरवाड, कार्यरत

माजी पर्यवेक्षिका- साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाड.
विषय - ईंग्रजी ,हिंदी, स्वविकास व कलारसास्वाद.

विद्यार्थीप्रिय शिक्षिका.

सदस्य - महिला दक्षता समिती , कुरुंदवाड पोलिस स्टेशन

अध्यक्ष ,सल्लागार मंडळ- जानकी वृद्धाश्रम, घोसरवाड.

" भावतरंग " कवितासंग्रह प्रकाशित.

लेखिका - " समतेचे पुजारी - एस.एम.जोशी 

लेखिका- " चारित्र्य चक्रवर्ती शांतिसागर महाराज

चारोळीकार:  " शब्दचारोळी  " चारोळीसंग्रह 

कवयित्री: " अवनी- निसर्गातील माणिक मोती " कवितासंग्रह

प्रकृती-- हायकू संग्रह

आकाशवाणी सांगली केंद्रावरुन विविध विषयांवरील माहिती प्रसारण .

" साम टिव्ही " वर "सकाळ "       " तनिष्का " समन्वयक या नात्याने मुलाखत संपन्न.

विविध विषयांवर विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून दिवाळी अंकातून लेखांचे, कवितांचे प्रकाशन .

माजी लायनेस अध्यक्षा व सचिव -कुरुंदवाड लायनेस क्लब तसेच रिजन कोऑर्डीनेटर , म्हणून कार्यरत व पुरस्कार प्राप्त.

सदस्य- लायन्स क्लब ऑफ,कुरुंदवाड.

विविध संस्थाकडून राज्यस्तरीय , जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त

सुबक साहित्य कलामंच,कोल्हापूर यांचा " आम्ही कवयित्री" पुरस्कार प्राप्त

काव्यप्रेमी शिक्षक मंच तर्फे 3/2/2019 चा     "काव्यप्रेमी आदर्श पुरस्कार " प्राप्त,नवापूर, नंदुरबार

स्टोरी मिरर डॉट कॉम तर्फे घेण्यात आलेल्या वूमन रायटर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त 2019

चैतन्य शिक्षण समुह,अब्दुललाट चा साहित्य क्षेत्रातील " चैतन्य प्रेरणा पुरस्कार " प्राप्त.8 डिसेंबर 2019

काव्यस्पंदन साहित्य समुहातर्फे " काव्यस्पंदनी काव्योत्कर्ष पुरस्कार " प्राप्त.2020

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला,क्रीडा मंच,शाखा कोल्हापूर आयोजित विविध लेखन प्रकारात सहभागी होउन क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सन्मानपत्र प्राप्त.

काव्यस्पंदन काव्यमंच तर्फे काव्यभूषण पुरस्कार प्राप्त.31/12/2020

श्रीमती माणिक कल्लाप्पा
नागावे छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान 2020 ने सन्मानित

लिखित,ध्वनिमुद्रित, चलचित्र व थेट प्रक्षेपण सादरीकरण रूपात साजरा झालेल्या अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेमधील कथेसाठी छंदोगामात्य संमेलन साहित्यविष्कार,कविता सादरीकरणासाठी छंदोगामात्य संमेलन मनस्पर्शी मानकरी,अभंग सादरीकरणासाठी छंदोगामात्य संमेलन भक्तीलंकार मानकरी असे तीन पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.
 
न्युजपेपर गंगाधर साहित्य परिषदेमार्फत अवनी- निसर्गातील माणिक मोती या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार प्राप्त.27/2/2021

शिक्षण प्रसारक मंडळ,कुरुंदवाड यांच्या मार्फत महिला दिनानिमित्त  " कर्तबगार महिला " पुरस्कार प्राप्त 10/3/2021

निसर्गराजा ग्रुप,माणकापूर चा साहित्य रत्न प्रेरणा पुरस्कार प्राप्त.11/3/2021

शब्दसेतू साहित्य मंच तर्फे "शब्दसेतू साहित्य प्रवण" पुरस्कार प्राप्त 20/5/2021

राष्ट्रसेवादल सैनिक

विविध ठिकाणी जाऊन विविध विषयांवर व्याख्यान देणे .

ऑनलाईन विविध साहित्य प्रकारच्या स्पर्धेत स्पर्धक, सहभागी व क्रमांक प्राप्त.तसेच परीक्षणही केले आहे., प्रमाणपत्रे प्राप्त

पाचवे संवाद साहित्य संमेलनामध्ये सलग दोन वर्षे निमंत्रीत कवयित्री म्हणून सहभाग.2018/19

ग्रामीण साहित्य संमेलन निमशिरगांव येथे काव्यवाचन 2018

आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील.  साहित्य संमेलनात काव्यवाचन 2018

शब्दगंध साहित्य मंच ,शिरोळ व दीनबंधू दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन, शिरोळ येथे काव्यवाचन. 1/2/2019

काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई जिल्हा आयोजित कांदिवली येथील कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित 3/6/2019

24 वे मराठी जैन साहित्य संमेलन, शिरढोण येथे काव्यसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग व काव्यवाचन.8/6/2019 

अभिजात मराठी साहित्य परीषदेमार्फत माय मराठी या विषयावर घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत 1076 कवितांमधून 101 कवितांची निवड महासंग्रहासाठी करण्यात आली त्यात माय मराठी या कवितेचा समावेश.त्यानिमित्ताने11/12/2018 ला अमरावती येथे सत्कार करण्यात आला. 

14 फेब्रुवारी2019 रोजी भाग्यलक्ष्मी ग्रामीण महिला पतसंस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित- व्यक्तीमत्व विकास व संस्कार या विषयावर व्याख्यान दिले.

शुक्रवार 3 जानेवारी 2020 माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुमार विद्यामंदिर, बुबनाळ आयोजित माता पालक मेळाव्यात  मार्गदर्शन 

शनिवार 4/1/2020 रोजी काव्यकट्टा महिला समुह,महाराष्ट्र आयोजित साऊ मानवंदना संमेलन, निगडी,पुणे येथे निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग

विद्यार्थी विकास प्रबोधिनी अब्दुल लाट संचलित बालोद्यान येथे ज्ञानदीप प्रकल्प अंतर्गत घेण्यात आलेल्या " साहित्य लेखन कार्यशाळेत " " लेखक आपल्या भेटीला " उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.रविवार दि.12/1/2020

 गौरवाड येथे श्री.दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड च्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरात संस्कार व व्यक्तीमत्व या विषयावर मार्गदर्शन.रविवार दि.19/1/2020

कलाश्री.डॉ.बा.ग.पवार आलास-बुबनाळ विद्यालय,आलास येथे अश्मी इंडिया संस्थेमार्फत सॅनिटरी नॅपकिन वाटप,मासिक पाळी व्यवस्थापन मार्गदर्शन, हळदी-कुंकू समारंभ, व माता-पालक मेळाव्यात मार्गदर्शन .मंगळवार4/2/2020

कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय,इंगळी.व अटल प्रतिष्ठाण,हुपरी आयोजित पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दि.23/2/2020 रोजी श्री.अंबाबाई मंदिर हॉल ,हुपरी येथे संपन्न झाले. यावेळी कवयित्री ऋतुजा माने,मिरज यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. त्यावेळी  " राजे पुन्हा याल का ? " ही स्वरचित कविता सादर केली.

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज , इचलकरंजी येथे 27 फेब्रुवारी 2020 रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी " मराठी दिन " कार्यक्रमात मराठी भाषेबद्दल व्याख्यान देण्याकरीता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित.

माई साहित्य कला अकादमी जयसिंगपूर, येथे नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या  काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपस्थित.गुरुवार दि. 27/2/2020

कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय,इंगळी तर्फे भरवलेल्या साहित्य संमेलनात काव्यवाचन सत्रात अध्यक्ष नोव्हेंबर 2020 

सातवे संवाद ग्रामीण साहित्य संमेलन, शिरढोण येथील काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.7/3/2021

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मजरेवाडी येथे महिलांना मार्गदर्शन - महिला सबलीकरण.8/3/2021 

इंद्रधनुष्य मासिक फेब्रुवारी 2019 मध्ये 
" मनोनिग्रहाची भरारी " ही कथा प्रकशित
व सप्टेंबरच्या अंकात " कोप निसर्गाचा " कविता प्रकाशित.जुलै,ऑगस्ट च्या अंकात "  महिमा वर्षाऋतुचा " लेख प्रकाशित.जानेवारी 2021 च्या अंकात " संवाद झाला मुका " लेख प्रकाशित.

संपादक चंद्रकांत कोकीतकर यांच्या ताम्रकाठ दिवाळी अंक 2019 मध्ये " तिच्या घरी सुखी राहूदे " कथा प्रकाशित.

कृषी उत्कर्ष दर्पण मासिक ,नोव्हेंबर2020 च्या अंकात 
" आजची युवापिढी व कृषी व्यवसाय " लेख प्रकाशित.

साहित्य दर्पण दिवाळी विशेषांक 10 नोव्हेंबर 2020 च्या अंकात " सण आनंदाचा " कविता प्रकाशित.

शब्दशिवार दिवाळी अंक 2020 मध्ये " देव नाही देवालयी " अष्टाक्षरी कविता प्रकाशित.

नवरत्न दिवाळी अंक 2020 मध्ये " अंत एका ध्यासपर्वाचा " लेख प्रकाशित.

फंटुश दिपावली बाल विशेषांक 2020 मध्ये  
" प्राण्यांची सभा " बालकविता प्रकाशित.

सडेतोड दिपावली विशेषांकात लेख प्रसिद्ध 

    आनंदवन व हेमलकसा येथे भेट. सप्टेंबर 2005

Monday, 29 December 2025

मन चंचल पाखरु

भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम -७५०
दिनांक: २९/१२/२०२५

अष्टाक्षरी कार्यशाळा 

विषय- मन चंचल पाखरु

शिर्षक -चंचल मन

मन चंचल पाखरु 
आले फिरुन फिरुन 
कीती पाहता पाहता 
वाटे दिसे ते दूरन

वेग वाऱ्याचा सदैव 
नाही स्थिरता जिवाला 
कीती पाहते बांधाया
पुढे न लागे हाताला

शोध मनाचा घेतसे
काय म्हणावे तयाला 
सापडेना अजूनही 
म्हणू कळेना कशाला

रंग कोणता असेल 
धुंदी चढते यशाची
विसावते कधी कुठे?
भ्रांत नसते कशाची

तरी चंचल मनाची
सारी आहारी गेलेली
विण न सुटे कधीच 
सदोदित सांडलेली 

बंध मनाचे मनाशी
नाही तुटता तुटतं
नाते माय लेकराचे
कधी नाहीच आटतं

कवयित्री 
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड जिल्हा.कोल्हापूर

Sunday, 23 November 2025

कविता (सप्तपदी)

ArLiEn KA मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेसाठी 

राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा 

विषय --  सप्तपदी 

दिनांक २३/११/२५

क्रमांक - ३७

शीर्षक - बंधन विवाहाचे 

मिलन दोन जीवांचे घडते
बंधन विवाहाचे जुळते जेंव्हा
थोरामोठ्यांच्या साक्षीने
वधू वर सप्तपदी घेती तेंव्हा

अन्न अन् पोषणाची पहीली
 सप्तपदी मनोभावे घेतली
ताकद अन् आरोग्याची दुसरी
दोघांच्या मनात रुजली

संपत्ती, समृद्धीची फेरी तिसरी
चौथी आनंद अन् सुखासाठी 
सुपारी ती सरकवती पुढती 
वधू वरांच्या भावी सुखासाठी 

संतती अन् सुखी कुटुंबासाठी 
सप्तपदी मांगल्याची पाचवी
फेरी नव दांपत्याची सहावी
सहकार्य अन् स्नेह दाखवी

सातवी मित्रता, नवविश्वासाची
पुर्ण सप्तपदी भावी जीवनाची
सार सारे संसारातील दाखवी
जोड तयास मंगल कवनाची 

बंध विवाहाचे जुळती येथे
आशिर्वचने ऐकू येती जना
दोन जीवांचा संसार फुलवी 
सार्थकता सकलांच्या मना

कवयित्री 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड 
९८८१८६२५३०

Monday, 17 November 2025

शिक्षणाचे महत्व( लेख)

विषय -- शिक्षणाचे महत्व

जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला योग्य अयोग्य याचा सारासार विचार करताआला पाहिजे. मनाचा निग्रह महत्वाचा आहे . पण हे सर्व शिक्षणाने सहज साध्य होते .शिक्षण म्हणजे फक्त साक्षरता नव्हे.
       लिहायला वाचायला आले तर तो व्यक्ती साक्षर होईल , पण संस्कारी होईल की नाही हे सांगता येणार नाही.त्यासाठी चांगले , कसदार ,प्रभावी वाचन होणे गरजेचे आहे .शिक्षणाने हे सर्व सहज शक्य आहे .

      शिक्षणाची आवड मनापासून असली पाहिजे. तरच कीतीही अडचणी आल्या तरी त्या पार करुन लिलया त्यातून बाहेर पडता येते . शिक्षणाने मनाची मशागत होते.संस्कारक्षम मन बनते व आपल्या आचरणाने समाजात ती व्यक्ती आदरणीय बनते . 

   सर्व थोर व्यक्ती शिक्षणामुळेच महान होऊ शकल्या .मग ते शिक्षण घरचे असूदे नाहीतर शाळेतील असूदे.शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण घेणे व त्यात पारंगत होणे नव्हे तर त्या शिक्षणाचा व्यवहार ज्ञानात कीती ऊपयोग करुन घेतो कींवा ते ज्ञान कीती ऊपयोगी पडते हे महत्वाचे आहे .शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रीया आहे.

    शिक्षकांच्या पैशावर ठेऊन त्यांना नांवे ठेवणे चुकीचे आहे.चला तर मग आपण शिकूया , शिकवूया , शिकायला मदत करुया.

  धन्यवाद .

श्रीमती माणिक नागावे 

Friday, 14 November 2025

कविता (साडी)

शिर्षक - मोह साडीचा

मोह साडीचा झाला नाही 
शक्यच नाही बाईच्या जातीला 
कितीही कपाट भरले तरी 
साडीच नसते तिला नेसायला 

विविध रंग अन् पोतांच्या 
प्रकार अनेक मोहवणाऱ्या 
साड्या खुलून दिसती अंगी
दिसती आवडीने नेसणाऱ्या 

द्योतक भारतीय संस्कृतीची 
साडी सौंदर्य नारीचे खुलवते 
सहावारी असो वा नऊवारी
मानसिकता सहज फुलवते 

खानदानी सौंदर्य खुलते 
तलम रेशमी साड्यातून 
भपकेबाज रंग लक्ष वेधतो
 दिसती काही उभ्या माड्यांतून

भाग महत्त्वाचा आहे पदर 
आधाराला सदैव मुलांच्या डोईवर 
आली संकटे कितीही समोर
झेलती सहज ती पदरावर 

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Tuesday, 16 September 2025

चारोळी ( स्वावलंबन)

 - स्वावलंबन
 नको अवलंबून दुसऱ्यावर 
काम स्वतःचे स्वतःच करू 
अथक परिश्रमात आनंदाने 
श्रम साफल्याची कास धरू

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Sunday, 14 September 2025

चारोळी (हिंदी भाषा )

 – हिंदी दिवस

हिंदी जनमानसकी भाषा
है हमारी प्यारी राजभाषा 
साहित्य की विधा खूब इसमें
है सारे भारतीयोंकी आशा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Saturday, 13 September 2025

चारोळी ( तूफान)

- तुफान

मनाच्या खोल खोल डोहात 
तुफान घोंगावतयं विचारांच
नाही सापडतं उत्तर सहजी
स्मरण करावे सकारात्मकतेचं

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

चारोळी (नातं मनातलं )

विषय - नातं मैत्रीचं 

फुलत जातं दिवसेंदिवस 
नातं मैत्रीचं एकमेकातलं 
निस्वार्थी प्रेमाची एक निशाणी 
जाणून घेते सहजच मनातलं 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Tuesday, 9 September 2025

कविता (साडी )

पारिजात साहित्य समूह आयोजित उपक्रम शृंखला अस्तित्व आणि महत्त्व 
दिनांक 10/9 / 2025 
विषय -  साडी 

शिर्षक - मोह साडीचा

मोह साडीचा झाला नाही 
शक्यच नाही बाईच्या जातीला 
कितीही कपाट भरले तरी 
साडीच नाही मला नेसायला 

विविध रंगी विविध पोतांच्या 
प्रकार अनेक मोहवणाऱ्या 
साड्या खुलून दिसती ललनांना 
दिसता आवडीने नेसणाऱ्या 

द्योतक भारतीय संस्कृतीची 
हर नारीचे सौंदर्य खुलवते 
सहावारी असो वा नऊवारी
मानसिकता सहज फुलवते 

खानदानी सौंदर्य खुलते 
तलम रेशमी साड्यातून 
भपकेबाज रंगातून 
काही दिसती उभ्या माड्यातून

भाग महत्त्वाचा आहे पदर 
राहतो सदैव मुलांच्या डोईवर 
आली संकटे कितीही समोर
झेलती सहज ती हातावर 

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Monday, 8 September 2025

चारोळी ॰(साक्षरता )

 : साक्षरता 

साक्षरतेचे प्रकार तरी कीती 
ज्ञानार्जन ध्येय सर्वाचे असे
शिक्षणाची गंगोत्री वाहे झरझर
सर्व ज्ञानक्षेत्रांची आहे मनी वसे 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे, कुरुंदवाड

Sunday, 7 September 2025

लेख ( पर्जन्याचा महिमा )

महिमा वर्षाऋतुचा

तप्त ज्वाळांनी काया ही करपून गेली,
  तुषारात पर्जन्याच्या मन मोहून गेले.
गाऊ महिमा किती वर्षा ऋतूचा,
आनंदाच्या शब्दसरि या नाचू लागल्या.

खरंच यावर्षीचा उन्हाळा आपल्याला अजिबात सहन होत नव्हता. शरीराची काहिली तगमग होत होती.  उन्हाचा चटका इतका होता की घरातून बाहेर पडणे अशक्य वाटत होते. चोवीस तास पंख्याची गरज भासत होती. पण शेवटी तो कृत्रिमच ना ?  गरज होती ती पावसाची, पर्जन्याची, मनाला ,शरीराला, वातावरणाला आराम देणाऱ्या गारव्याची !!  पर्जन्याचा महिमा किती सांगितला, किती गाईला तरी तो कमीच आहे ,अपुराच वाटेल.

झाडे ,वेली ,पशुपक्षी, मानव सारे वातावरण  ऊन्हाच्या ज्वाळांनी  तगमगत होते. पावसाच्या प्रतीक्षेत  सर्वजण चिंतातुर होते. पावसाच्या आगमनाची वाट पाहत होते. नदी, नाले,विहिरी ,पाण्याचे साठे या सर्वांतील पाण्याची पातळी अतिशय खालावली होती. काही ठिकाणी तर ते कोरडे पडलेले होते. जलचरांची अवस्था तर अतिशय वाईट झालेली होती. काही भागात प्यायलाही पाणी नव्हते. जिथे माणसाला प्यायला पाणी नाही तिथे जनावरांची काय कथा ?  वनस्पती कोमेजू लागल्या होत्या. सर्वत्र निराशेचे वातावरण झाले होते. आणि या सर्वांची मनीषा, प्रार्थना फळास आली. सर्वत्र आनंदाचे ,हर्षाचे वातावरण झाले

अचानक आकाशात ढग जमू लागले, विजा चमकू लागल्या. वातावरणात अंधार दाटू लागला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. चराचर झोपेतून जागे झाल्यासारखे वाटू लागले. एक गोड शिरशिरी शरीरात पसरली. निराशेची जागा आशेने घेतली. हळूहळू पावसाला सुरुवात झाली. जलधारा पृथ्वीकडे वेगाने धावू लागल्या. धरणीमातेने आपले दोन्ही हात पसरून त्यांना आपल्या कवेत येण्याचे निमंत्रण दिले. आकाशातील जलधारा व धरणीमाता यांची गळाभेट झाली. आहाहा !!!  काय ते दृश्य सुंदर होते !!!  मातीचा सुंदर सुवास सगळीकडे पसरला होता. सारा आसमंत अल्हादित झाला.पावसाचा कण आणि कण धरणीमाता आपल्यात सामावून घेऊ लागली. वनस्पतींनी पर्जन्यवृष्टी झेलण्याकरता आपले दोन्ही हात पसरले. ते आनंदाने डोलू लागले. लहान मुले पावसात भिजण्यासाठी घरातून बाहेर आली व गाणे म्हणत पावसात भिजू लागली. त्या निरागस चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडत होते. शेतकरी राजा इतका खुश झाला की जणू त्याला त्याच्या पोटच्या मुलाचे प्राण परत आल्या सारखा आनंद वाटत होता. काही दिवसांपूर्वीची भेगाळलेली , पाण्यासाठी आ वासून पडलेली जमीन त्याला आठवली व आत्ताची पाण्याने तृप्त झालेली जमीन जेव्हा त्याने पाहिली तेव्हा खरंच त्या समाधानाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. त्याच्या डोळ्यात आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू आले. त्या अश्रूंची किंमत मोत्या पेक्षा जास्त होती. नदी-नाले पाण्याने भरून वाहू लागले. तगमग, तडफड जाऊन समाधानाची लकेर सर्वत्र पसरली. सर्वत्र आनंदाचे चित्र दिसू लागले. वर्षा ऋतु चा महिमा किती सुखावह आहे ,किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना पटले.  पावसाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे. जल म्हणजे जीवन हे सर्वांना पटले. पाऊस जर झाला नसता तर काय झाले असते?  या विचारानेच थरकाप उडाला ! पाऊस न पडण्याच्या पाठीमागची कारणमिमांसा  पाहायला गेले तर  यालाही  मानवच कारणीभूत आहे हे लक्षात आले. स्वतःच्या स्वार्थासाठी, उद्योगधंद्यासाठी, शहरीकरणांसाठी, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मानवाने बेसुमार झाडांची कत्तल केली. जंगले नष्ट केली.हिरव्यागार जंगलांच्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी केली. याचा वाईट  परिणाम झाला. झाडे तोडल्यामुळे जमिनीची धूप थांबली. पावसाने हात आखडता घेतला. याचा वाईट परिणाम मानवा बरोबर निसर्गालाही भोगावा लागला.  यासाठी सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी, वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. चला तर मग झाडे लावूया ,झाडांचे संवर्धन करूया. महिमा वर्षाऋतूचा जाणून घेऊया.

झाडे लावू झाडे जगवू घोष हा न्यारा,
जलधारांनी भरलेला मेघ आम्हा प्यारा.
जाणून महिमा पर्जन्याचा हे मानवा,
पर्यावरण रक्षणाची कास तुम्ही धरा.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
९८८१८६२५३०