Tuesday, 5 May 2026

कविता (निसर्ग किमया)

काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित 
साप्ताहिक उपक्रम 
दिनांक -७/५/२०२७
विषय - चित्रकाव्य 
शिर्षक - निसर्ग किमया

सोनेरी प्रकाशात सर्वत्र पसरला 
सोनेरी निळसर ढग जमले 
पिवळसर पोपटी रंगाने
आकाश गोलाकार दिसू लागले 

वृक्षद्वय उभे ठाकले भूवरी
जणू दोन मार्ग जीवनाचे 
एक वेडावाकडा अनिर्बंधतेचा 
एक उभे दृश्य स्वाभिमानाचे 

छाया दोघांची वेगवेगळी
एक विखरली गटागटातून 
दुसरी एकसंध दाट सावली 
पसरली भुवरी सुंदर छटांतून 

मार्ग जीवनाचा सरळ असावा 
नसावा त्यात कोणता छुपेपणा
असावा सर्वांसाठी समान न्याय 
आपोआपच निसटे खोटेपणा 

वेडेवाकडे कंगोरे जीवनाचे 
सुखदुःख,अन्याय,अत्याचाराचे
पार करून सर्वांना निश्चयाने 
गाडून टाकू जीवन भ्रष्टाचाराचे 

सरळ मार्गाची उंचीच भारी 
वक्रता आपोआपच होते छोटी 
निसर्ग किमया कधी न कळली
मोहवी दुनिया खरी असो वा खोटी

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड जिल्हा - -कोल्हापूर

आला उन्हाळा

शब्दगंध साहित्य मंडळ आयोजित काव्य लेखन उपक्रम 
उपक्रम क्रमांक २०
 दिनांक ५/५/२०२६
 विषय - आला उन्हाळा 

जीवाची काहीली करत 
आला आला उन्हाळा आला 
धारा घामाच्या लागल्या 
कासविस जीव झाला 

भास्कर हा तापला तापला 
आला उन्हाळा सांगू लागला 
झाले मलूल चराचर सारे
लागे वृक्ष छाया शोधायला 

रणरणत्या उन्हातून जाती
कारागीर स्वत:च्या पोटासाठी 
पाय पोळते अनवाणी आता
भांडती लेकरे ताटासाठी

घर्मबिंदू पुसायाचे किती 
पदर ओला चिंब झाला 
लेकराच्या जीवापुढे मायेने
सूर्य सारा डोक्यावर घेतला 

काय करावे काय सूचना झाले 
वृक्षराईची महती पटू लागली 
सज्ज होऊ सारे पेरु बीजाला
वृक्षवल्लीची महती पटली 

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा 
 नागावे कुरुंदवाड 
जिल्हा, कोल्हापूर 
९८८१८६२५३०