Tuesday, 16 September 2025

चारोळी ( स्वावलंबन)

 - स्वावलंबन
 नको अवलंबून दुसऱ्यावर 
काम स्वतःचे स्वतःच करू 
अथक परिश्रमात आनंदाने 
श्रम साफल्याची कास धरू

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Sunday, 14 September 2025

चारोळी (हिंदी भाषा )

 – हिंदी दिवस

हिंदी जनमानसकी भाषा
है हमारी प्यारी राजभाषा 
साहित्य की विधा खूब इसमें
है सारे भारतीयोंकी आशा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Saturday, 13 September 2025

चारोळी ( तूफान)

- तुफान

मनाच्या खोल खोल डोहात 
तुफान घोंगावतयं विचारांच
नाही सापडतं उत्तर सहजी
स्मरण करावे सकारात्मकतेचं

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

चारोळी (नातं मनातलं )

विषय - नातं मैत्रीचं 

फुलत जातं दिवसेंदिवस 
नातं मैत्रीचं एकमेकातलं 
निस्वार्थी प्रेमाची एक निशाणी 
जाणून घेते सहजच मनातलं 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Tuesday, 9 September 2025

कविता (साडी )

पारिजात साहित्य समूह आयोजित उपक्रम शृंखला अस्तित्व आणि महत्त्व 
दिनांक 10/9 / 2025 
विषय -  साडी 

शिर्षक - मोह साडीचा

मोह साडीचा झाला नाही 
शक्यच नाही बाईच्या जातीला 
कितीही कपाट भरले तरी 
साडीच नाही मला नेसायला 

विविध रंगी विविध पोतांच्या 
प्रकार अनेक मोहवणाऱ्या 
साड्या खुलून दिसती ललनांना 
दिसता आवडीने नेसणाऱ्या 

द्योतक भारतीय संस्कृतीची 
हर नारीचे सौंदर्य खुलवते 
सहावारी असो वा नऊवारी
मानसिकता सहज फुलवते 

खानदानी सौंदर्य खुलते 
तलम रेशमी साड्यातून 
भपकेबाज रंगातून 
काही दिसती उभ्या माड्यातून

भाग महत्त्वाचा आहे पदर 
राहतो सदैव मुलांच्या डोईवर 
आली संकटे कितीही समोर
झेलती सहज ती हातावर 

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Monday, 8 September 2025

चारोळी ॰(साक्षरता )

 : साक्षरता 

साक्षरतेचे प्रकार तरी कीती 
ज्ञानार्जन ध्येय सर्वाचे असे
शिक्षणाची गंगोत्री वाहे झरझर
सर्व ज्ञानक्षेत्रांची आहे मनी वसे 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे, कुरुंदवाड

Sunday, 7 September 2025

लेख ( पर्जन्याचा महिमा )

महिमा वर्षाऋतुचा

तप्त ज्वाळांनी काया ही करपून गेली,
  तुषारात पर्जन्याच्या मन मोहून गेले.
गाऊ महिमा किती वर्षा ऋतूचा,
आनंदाच्या शब्दसरि या नाचू लागल्या.

खरंच यावर्षीचा उन्हाळा आपल्याला अजिबात सहन होत नव्हता. शरीराची काहिली तगमग होत होती.  उन्हाचा चटका इतका होता की घरातून बाहेर पडणे अशक्य वाटत होते. चोवीस तास पंख्याची गरज भासत होती. पण शेवटी तो कृत्रिमच ना ?  गरज होती ती पावसाची, पर्जन्याची, मनाला ,शरीराला, वातावरणाला आराम देणाऱ्या गारव्याची !!  पर्जन्याचा महिमा किती सांगितला, किती गाईला तरी तो कमीच आहे ,अपुराच वाटेल.

झाडे ,वेली ,पशुपक्षी, मानव सारे वातावरण  ऊन्हाच्या ज्वाळांनी  तगमगत होते. पावसाच्या प्रतीक्षेत  सर्वजण चिंतातुर होते. पावसाच्या आगमनाची वाट पाहत होते. नदी, नाले,विहिरी ,पाण्याचे साठे या सर्वांतील पाण्याची पातळी अतिशय खालावली होती. काही ठिकाणी तर ते कोरडे पडलेले होते. जलचरांची अवस्था तर अतिशय वाईट झालेली होती. काही भागात प्यायलाही पाणी नव्हते. जिथे माणसाला प्यायला पाणी नाही तिथे जनावरांची काय कथा ?  वनस्पती कोमेजू लागल्या होत्या. सर्वत्र निराशेचे वातावरण झाले होते. आणि या सर्वांची मनीषा, प्रार्थना फळास आली. सर्वत्र आनंदाचे ,हर्षाचे वातावरण झाले

अचानक आकाशात ढग जमू लागले, विजा चमकू लागल्या. वातावरणात अंधार दाटू लागला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. चराचर झोपेतून जागे झाल्यासारखे वाटू लागले. एक गोड शिरशिरी शरीरात पसरली. निराशेची जागा आशेने घेतली. हळूहळू पावसाला सुरुवात झाली. जलधारा पृथ्वीकडे वेगाने धावू लागल्या. धरणीमातेने आपले दोन्ही हात पसरून त्यांना आपल्या कवेत येण्याचे निमंत्रण दिले. आकाशातील जलधारा व धरणीमाता यांची गळाभेट झाली. आहाहा !!!  काय ते दृश्य सुंदर होते !!!  मातीचा सुंदर सुवास सगळीकडे पसरला होता. सारा आसमंत अल्हादित झाला.पावसाचा कण आणि कण धरणीमाता आपल्यात सामावून घेऊ लागली. वनस्पतींनी पर्जन्यवृष्टी झेलण्याकरता आपले दोन्ही हात पसरले. ते आनंदाने डोलू लागले. लहान मुले पावसात भिजण्यासाठी घरातून बाहेर आली व गाणे म्हणत पावसात भिजू लागली. त्या निरागस चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडत होते. शेतकरी राजा इतका खुश झाला की जणू त्याला त्याच्या पोटच्या मुलाचे प्राण परत आल्या सारखा आनंद वाटत होता. काही दिवसांपूर्वीची भेगाळलेली , पाण्यासाठी आ वासून पडलेली जमीन त्याला आठवली व आत्ताची पाण्याने तृप्त झालेली जमीन जेव्हा त्याने पाहिली तेव्हा खरंच त्या समाधानाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. त्याच्या डोळ्यात आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू आले. त्या अश्रूंची किंमत मोत्या पेक्षा जास्त होती. नदी-नाले पाण्याने भरून वाहू लागले. तगमग, तडफड जाऊन समाधानाची लकेर सर्वत्र पसरली. सर्वत्र आनंदाचे चित्र दिसू लागले. वर्षा ऋतु चा महिमा किती सुखावह आहे ,किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना पटले.  पावसाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे. जल म्हणजे जीवन हे सर्वांना पटले. पाऊस जर झाला नसता तर काय झाले असते?  या विचारानेच थरकाप उडाला ! पाऊस न पडण्याच्या पाठीमागची कारणमिमांसा  पाहायला गेले तर  यालाही  मानवच कारणीभूत आहे हे लक्षात आले. स्वतःच्या स्वार्थासाठी, उद्योगधंद्यासाठी, शहरीकरणांसाठी, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मानवाने बेसुमार झाडांची कत्तल केली. जंगले नष्ट केली.हिरव्यागार जंगलांच्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी केली. याचा वाईट  परिणाम झाला. झाडे तोडल्यामुळे जमिनीची धूप थांबली. पावसाने हात आखडता घेतला. याचा वाईट परिणाम मानवा बरोबर निसर्गालाही भोगावा लागला.  यासाठी सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी, वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. चला तर मग झाडे लावूया ,झाडांचे संवर्धन करूया. महिमा वर्षाऋतूचा जाणून घेऊया.

झाडे लावू झाडे जगवू घोष हा न्यारा,
जलधारांनी भरलेला मेघ आम्हा प्यारा.
जाणून महिमा पर्जन्याचा हे मानवा,
पर्यावरण रक्षणाची कास तुम्ही धरा.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
९८८१८६२५३०

चारोळी ( धाक )

 विषय  धाक

लहानांना नेहमी असावा 
मोठ्यांचा आदरयुक्त धाक 
सहज उठून दिसेल मग
आयुष्याचा सुंदर परिपाक 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Saturday, 6 September 2025

बालकाव्य ( सुट्टीतील मजा )

 - सुट्टीतील मजा 

खूप खूप अभ्यास करून 
पेपर लिहिले छान छान 
सुट्टीचा महिना लागला आता 
गाऊया गोड गोड गान 

काय करूया कुठे जाऊया 
बनवूया मस्त मस्त बेत आता 
आनंदाने मारून उड्या गाऊया 
खेळ खेळूया गाणे गाता गाता 

मामाच्या गावाला जाऊया 
अंगत पंगत जम्माडी जम्मत 
सारे मिळून चिंचा बोरे खाऊया 
शिकरण पोळीची जमवू पंगत 

सहल काढू सारे जाऊ गावाला 
बागेत फिरु पळू भरभर सारे
नवनवीन दोस्त बनतील छान 
मिळवूया साऱ्यांची वाहवा रे

गड किल्ले चढून पराक्रम करू 
साक्ष इतिहासाची साठवू मनात 
वीर पुरुषांची माहिती जमवून
महती गाऊ तानात तानात

मजा सुट्टीतील लय लय भारी 
आवडते मजला आवडते सर्वांना 
चला चला सारे जण जमून
करूया साजरा सुट्टीचा महिना 

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

विचार ( शिक्षकाची भूमिका )


*ओटीटी आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये ‌ संस्कारमय समाज निर्मितीसाठी शिक्षकाची भूमिका ‌महत्वपूर्ण आहे का?*

समाजामध्ये कितीही आधुनिक तंत्रज्ञान आले असले व त्यांनी शिक्षकांची भूमिका घेतली तरी सुद्धा शिक्षकाचे महत्व हे कधीही कमी होत नाही व होणारही नाही. इंटरनेटच्या जमान्यामध्ये शैक्षणिक, बौद्धिक व संस्कार देणारे अनेक कार्यक्रम सचित्र पाहायला मिळतात पण त्यामध्ये भावना अजिबात नसतात. संस्कारासाठी, जिवंत समाज निर्मितीसाठी शिक्षकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. कारण विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याकरिता एक निर्जीव वस्तू नाही तर सजीव व्यक्तीची गरज असते. भले इंटरनेटच्या द्वारे अनेक माहितीचा महासागर त्यांच्यासमोर ओसंडून वाहत असला तरी सुद्धा प्रत्यक्ष शिक्षकांनी शिकवलेले ज्ञान हेच लक्षात राहते.

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

चारोळी ( चंद्र आहे साक्षीला )

:-चंद्र आहे साक्षीला 

आठवांचे बांध साचले उरी
मनीचा चंद्र आहे साक्षीला 
आकाशातील तारे चमकती
प्रकाशाने अंधार आहे प्राक्षीला

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

चारोळी ( महालक्ष्मी )

महालक्ष्मी 

महालक्ष्मी स्तोत्र वलय शोभे
सालंकृत सुहास्य वदनी माता
पंकजासनी विराजे पद्मासनी 
कलश संपत्तीचा शुभाशीर्वाद हाता 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

चित्र चारोळी ( चंद्रमौळी झोपडी )

 चित्र चारोळी ( चंद्रमौळी झोपडी ) 

चंद्रमौळी झोपडी आसऱ्याला 
संसार वयोवृद्धांचा साथीने चाले
सजवली रांगोळी निगुतीने दारी
प्रसन्न वाटे मागे हिरवाई डोले

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

चारोळी ( आवाज मनाचा )

 - आवाज मनाचा 

बाकी सारे बोलायलाच असतात
आवाज ऐकावा मनाचा
शेवटी निस्तरनारे आपणच 
विचार नसावा जनांचा

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

चारोळी ( शरदाचं चांदणं )

 - शरदाचं चांदणं

रात्रीच्या चांदण्यात गेलो 
शरदाचं चांदणं बघायला
शुभ्र पांढरा गोलाकार चंद्रमा
डोकावून लागला हसायला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

विचार ( चरण )

 :- चरण

आईच्या चरणावर स्वर्ग भेटतो असे म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. ज्यावेळी आपण आई वडिलांच्या चरणावर डोके ठेवतो व नतमस्तक होतो त्या वेळेला आपण आपल्या मनातील सर्व अहंभाव बाजूला सारून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लहान होऊन लीन होतो. अशावेळी आपले पालक आपल्याला सकारात्मक ऊर्जा असलेला आशीर्वाद देत असतात. कारण माता पिता आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता नेहमीच करत असतात. व आपली मुले नेहमी यशाच्या शिखराकडे जावीत, यशस्वी व्हावीत असेच त्यांना वाटत असते. त्यामुळे जेव्हा आपली मुले चरणावर डोके ठेवतात त्यावेळेला ते नेहमी मुलांच्या भविष्यासाठी चांगला आशीर्वाद देतात. म्हणून आपण नेहमी आपल्या आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक व्हावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, लीन व्हावे.
चरण या शब्दाचा दुसरा अर्थ कवितेचे कडवे किंवा पद असे होते. आपले भाव या कवितेतून कवी व्यक्त करत असतो. कवितेच्या चरणातून कवीला काय म्हणायचे आहे व या कवितेचा अर्थ काय आहे हे वाचणाऱ्याला ते चरण वाचून कळत असते.
त्यामुळे चरण या शब्दाचा अर्थ आपण कोणत्या अर्थाने वापरतो त्या पद्धतीने वाचकाने घ्यावे. 

लेख
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( पश्चाताप )

पश्चाताप 

औषध जालीम पश्चात्ताप 
सुधार मात्र हवा करायला
चुकातूनच अनुभव गाठीशी 
म्हणून नको परत चुकायला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

कविता ( वेग )

 वेग

गतीमानता असावी जरी 
 चुकता कामा नये दिशा
उर्मी मनात सदैव असावी 
जागृत चेतना असावी आशा

वेगावर नियंत्रण,सुखाला आमंत्रण 
ध्यानी ठेवावे वचन भारी
नियम असतात पाळण्यासाठी 
विसरून जाते जनता सारी 

अपघात आहे ठरलेलाच 
अतिवेगामुळे जातो जीव 
रस्त्यावरच्या पाहता कसरती 
वाटते तरुणाईची मनात कीव

जीवन आहे अनमोल गड्या
यशासाठी वेग हवा खरा
देतो संदेश काळ जनाला
अनियंत्रित वेग नाही बरा

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( पतंग )

 - पतंग

पतंग आशेचा उडाला गगणी
निर्धाराचा मांजा हाती धरला 
सुखदुःखावर हेलकावे खात 
यशो शिखर गाठण्या वर निघाला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( ही वाट दूर जाते )

 - ही वाट दूर जाते 

सुखदुःखाची नागमोडी वळणांनी
आयुष्याची अनगढ वाट दूर जाते 
भावभावनांचा होतो आपसूक निचरा 
मन मंदिर माझे सहजी सुखी होते 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( हृदयी जागा तू अनुरागा )

- हृदयी  जागा तू अनुरागा

हृदयी जागा तू अनुरागा 
जोडून बंधना जागवी प्रीत 
नकळत फुलते मनात रुजते 
हीच आहे अनोखी रीत 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( वेड शब्दांचे )

वेड शब्दांचे

वेड शब्दांचे सारस्वतांना 
भावभावनांच्या प्रकटीकरणाला 
शब्दा शब्दांचा हार विचारांचा 
सज्ज होऊया जन जागरणाला 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( आसूसलेले किनारे )

    आसूसलेले किनारे

आयुष्याच्या संध्याकाळी निवांत 
नात्यांची वाट पाहती किनारे आसुसलेले 
भाव भरल्या आसक्त नजरांनी 
लोचने मात्र आसवांनी डबडबलेले

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( जा उडून पाखरा )

 जा उडूनी पाखरा

आयुष्याच्या रंगमंचावर खेळताना 
शोधती सर्वजण आपला आसरा 
बाळगून निस्वार्थी सेवाभाव जीवनी 
जा उडून मानवरुपी पाखरा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चित्र चारोळी ( चूल )

- चूल

चटके सोसून चूल शिजवे अन्नाला
जणू प्रतीकच मानवी जीवनाची 
सुखदुःखाच्या जीवन चुलीवर 
 चवच न्यारी या जेवणाची 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( फुल गुलाबाचे )

 -गुलाबाचे फुल

 फुल गुलाबाचे प्रतीक प्रेमाचे 
प्रेम भावना व्यक्त करण्याचे 
नाना रंगात नाना भाव दडले
काम दोन हृदयांना जोडण्याचे

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चित्र काव्य ( फणसाचे गरे )

 - फणसाचे गरे 

दिसती जरी काटे फणसावरी
मोहवती मनाला मऊ मऊ गरे
सोन पिवळा रंग लेवून विसावले 
खाण्या आसुसले लहान थोर सारे

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( हिरवीगार वसुंधरा )

- हिरवीगार वसुंधरा 

गर्द हिरवाईच्या बाहुपाशात 
हिरवीगार वसुंधरा विसावली
निळ्या आकाशात वरती
मेघांची रांग दिसू लागली

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( प्रेमा काय देऊ तुला )

 - प्रेमा काय देवु तूला 

तुझ्या प्रेमाच्या गावी येऊन 
प्रेमा काय देऊ तुला सांग आता 
हृदय तर तू घेतलेस आधीच
जपून तेवढे ठेव तू जाता जाता 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( मातृदेवो भव )

 मातृदेवो भव

जीवन हे आई तुझ्याचसाठी
तुझ्यामुळेच मी जग पाहीले
नसे दुजा महान कोणी इथे
चरणी तुझ्या मी मला वाहीले

   ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

चारोळी ( अस्तित्व)

  अस्तित्व

 अस्तित्व म्हणजे वावर जीवनातला 
स्वतःचे असणे नसणे जाणवून देणारा 
नसल्यावरही जाणवते अस्तित्व 
तोच खरा जीवनाचा नारा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी कोडं ( आम्ही दोघे)

 आम्ही दोघे

 शेजारी शेजारी आम्ही दोघे 
भेट कधी ना होते आपली 
पाहतो आम्ही सर्वांना सर्वत्र 
स्वतःला पहायची इच्छा राहिली.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( शब्दांच्या या सुगंधी वाटा)

. शब्दांच्या ह्या सुगंधी वाटा.

मन मोकळे करून सोडतात 
शब्दांच्या ह्या सुगंधी वाटा 
अक्षररूपी प्रकट होतात 
जसा धाग्यांना विणतो धोटा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( रविवार माझ्या आवडीचा)

 - रविवार माझ्या आवडीचा 

आठवड्याचा शिण घालवतो
भरपूर मिळते झोपायला 
रविवार माझ्या आवडीचा 
कविता गवसते लिहायला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चित्र काव्य ( प्रेम दिवस)

 - प्रेम दिवस 

संगणक झाले तो आणि ती 
गुलाबी टोपी निळ्या पडद्यावर 
भाव मिश्किल असती डोळ्यात
 फुल गुलाबी साहेबी टोपीवर

प्रेमाचा दिवस चल साजरा करू 
आजचा दिवस विश्रांती घेऊ 
जाणून घेण्या एकमेकाचे मन 
हात एकमेकांचा हाती घेऊ

चौकोनी चेहऱ्यावर गुलाबी ओठ 
कीबोर्ड सांगे गुज मनीचे 
माऊस आहे मदतीला तयार
सी पी यु म्हणजे प्रतिक हृदयाचे

दिवस व्हॅलेंटाईनचा करू साजरा 
संदेश प्रेमाचा एकमेकां देवू
हवाच कशाला खास दिवस? 
रोजच एकमेकांना सहाय्य देऊ 

अणाभाकांनी वचनबद्ध होऊ 
नवीन तंत्रज्ञान जगास कळवू 
झाले पूजन फुलांनी आपले 
प्रेम साऱ्यांचे सहज मिळवू 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चित्र काव्य( मिरची मोर)

काव्यप्रेमी शिक्षक मंच ®️
 राज्यसमूह आयोजित मंगळवारचा साप्ताहिक चित्रकाव्य उपक्रमासाठी 

विषय- चित्रकाव्य

शिर्षक - मिरची मोर

कलाकृती सुंदर साकारली 
मनाला सहज मोहवून गेली 
हिरवा मिरची मोर पाहता 
आजीच्या गाली कळी खुलली 

गोलाकार मोर साकारला 
मिरच्यामधून कौशल्य साकारले 
कल्पना आजीची मना भावली 
मांडणीतून तिच्या ते उतरले 

सुबकता पाहता मन आनंदले 
तिखट मिरची लोचनी सुखावे 
पिसाऱ्यासह अंग चितारले 
पाहताना वाटे बघतच रहावे 

शिल्लक दिसे डालग्यात मिरची
बाजूला ढीग दिसतो कशाचा?
लाल तिखट दिसते वाटीत 
तो कुठे अन् कसा वापरायचा? 

शेजारीच ठेवलयं पाणी प्यायला 
पेरू ठेवलेत तोंडी लावायला 
लवकर लवकर सारे या 
कौतुक आजीचे करायला

संदेश यातून एकच मिळतो 
नकारात्मकता घालवायची
तिखट सौंदर्य साकारून 
सकारात्मकता मिळवायची

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड. जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

कविता ( सुंदर बालपण)

 - सुंदर बालपण

वेळ आणि सुंदर बालपण
हरवल्यावरच छान वाटतात 
गेल्यावर शोधतो आनंदी क्षण
पण ते फार दूर गेलेले असतात 

पावसाळ्यातील धमाल मस्ती 
दारातून वाहती ओहळ छान 
प्रवाहीत जलात कागदी नावा
मार्गस्थ होतात गात गान

उतरती छपरे कौलारू छत
शोभून दिसतो विटकरी रंग
हिरवाईच्या कुशीतला गारवा
समाधानात होती सारे दंग 

पागोळ्यावरुन टपटपते पाणी 
पाट वाहती झुळझुळ दारी
छोटुकल्यांचे खेळ बालपणीचे 
असते त्यांची मौजच न्यारी

आनंदाचे भरते ओसंडते 
भावा-बहिणींचे प्रेम दिसते 
भिजल्या अंगाची ना तमा तयास
प्रसंगाची या आज गरज भासते

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( शोध यशाचा)

शोध यशाचा 

शोध घेणे मानवप्रकृती सदा
यशासाठी प्रयत्नशील रहावे
निकड गरजेची लावते कामा
श्रमातच ईश्वर सर्वांनी पहावे

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड,ता.शिरोळ, जिल्हा.कोल्हापूर

चारोळी ( उब मातृत्वाची)

- उब मातृत्वाची

उब मायेची वात्सल्याची बाळा
कुशीत मातेच्या बाल्य निवांत 
निरागसता बालकाच्या ओठी
सागर मातृत्वाचा असे सुशांत 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर.

कविता ( कोजागिरी पौर्णिमा)

 कोजागिरी पौर्णिमा
 शीर्षक-पौर्णिमेचा चंद्र 

उजळतो सहर्ष वदनी नभात
पौर्णिमेचा चंद्र कोजागिरीला
सात्विक, पौष्टिक दुग्ध प्राशन 
तोटा न या आनंदी समाधानाला 

रात्रीच्या चांदण्यात गेलो 
शरदाचं चांदणं बघायला
शुभ्र पांढरा गोलगोल चंद्रमा
डोकावून लागला हसायला

उजळतो सहर्ष वदनी नभात
पौर्णिमेचा चंद्र कोजागिरीला
सात्विक, पौष्टिक दुग्ध प्राशन 
तोटा न या आनंदी समाधानाला 

चंद्र आहे साक्षीला आज रात्री
केशरी दुधाची लयलूट करुया
एकमेकांच्या साथीने आपसूक 
बंध रेशमी अलवार वाढवूया

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( आनंद आश्रू)

: आनंदाश्रू

मनाच्या गाभाऱ्यात येते उधाण 
वाट मोकळी आनंदाश्रू वाहती 
जणू वाटे मिलाफ सुखदुःखाचा
आकांक्षा मनाच्या पुर्ण होती 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

आठोळी ( निसर्ग माझा सखा)

 - सखा माझा निसर्ग 

सृष्टी सजली नाना रंगाने
फुलवण्या सज्ज सकल जना 
रुप मनोहर पाहून हर्षली उरी
समाधान सात्विक लाभते मना

सखा माझा निसर्ग सभोवताली 
सुख दुःखाची देतो संभावना 
उपकृत सदैव रहावे जगती
हिच खरी ठरते जगी उपासना

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

आठोळी ( आशा)

:- आशा

सहनीय जीवन होते 
ज्यांच्या मनी आशा असते
संकटांच्या मालिकांत सहजी
निराशा फशी पडताना दिसते 
सकारात्मक विचारांनी मनी
यश आले जवळी भासते 
जीवावर आशेच्या सरीजण
मोहर यशाची आपसूक ठसते

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड तालुका शिरूर जिल्हा कोल्हापूर.

चारोळी ( अक्षय राहो प्रीत)

 - अक्षय राहो प्रीत

टिकवण्या नाते नात्यामधले 
अक्षय राहो प्रीत आपल्यात
नको दुरावा,नको संशय कोणता 
फुलत जाते सहजी विश्वासात

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( जीवन चक्र)

:-जीवन चक्र 

गरजेचे कर्तव्य करत राहणे
जीवनचक्र तरच पुढे जाईल 
सुखदुःखाची झोळी भरता
आपोआप समाधान होईल

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( देहाचे चंदन व्हावे)

.. देहाचे चंदन व्हावे.

असे झीजावे कर्माने जगी
देहाचे या चंदन व्हावे 
गंधाळतील मग चहुदिशा 
नश्वर शरीर हे मागे उरावे. 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( लाल जास्वंद)

लाल जास्वंद 

 फुलला मोहक लाल जास्वंद 
भासते मना जणू गणेशमूर्ती
गुण औषधी आयुर्वेदी असती
पसरे चहुबाजू याचीच कीर्ती 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( गरुड झेप)

 - गरुड झेप 

यशाची असो वा महत्त्वाकांक्षेची
गरुड झेप घेणे असते महत्त्वाची
तयारी कष्टाची व श्रमाची हवी 
उभा राहील गुढी स्व कर्तृत्वाची 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( मतभेद)

- मतभेद

नाही होत एकमत एका गोष्टीवर 
होतात सुरु मतभेद अन् वाद
मनोमिलन की मन दुरावा ?
असावा त्यासाठी सुसंवाद.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( बाल संस्कार)

 बाल संस्कार 

नकळत रुजतात बालसंस्कार
बालमन संवेदनशीलतेचा कळस 
अनुकरणातून घडत जातात 
त्यांना नसतो कधीच आळस

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( झुला)

 - झुला 

झुल्यावर झुलते ललना हसरी 
तरंगतो हवेवर मुक्त केस संभार 
अलंकार शोभती वसनावरती
उजळून निघाले हे नील अंबर 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( पाऊस धारा)

... पाऊसधारा....

 अंगणी बरसल्या पाऊस धारा 
 शांत झाली जिवाची काहिली 
 तप्त भास्कर तप्त धरणी झाली 
 त्यावर वळीवाची सर वाहिली.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( खंत मनाची)

 खंत मनाची 

जाळते जीवाला खंत मनाची 
व्यक्त होण्या धडपडत असते 
तमा नसावी कशाचीच कुणाला
नाहीतर जाळ्यात अलगद फसते

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

कविता ( मनाची घुसमट)

-- मनाची घुसमट

काय चाललयं सगळीकडे ,
मला समजेनासचं झालय .
घुसमट मनाची पाहून ,
मन अस्वस्थ झालय .

समजवायचं कुणी कुणाला ,
वाजलाय बाजा संस्काराचा.
नाती विसरलीत आता ,
झाला बाजार अनैतिकतेचा.

कुपमंडुकी वृत्तीने सगळे ,
वागतायत हो घरोघरी .
संस्कृती भारताची महान,
विस्कटली आहे दारोदारी .

सुरक्षिततेची नाही हमी ,
इथे कुणाच्या जीवाची .
रोजच होतात अत्याचार ,
दाद कुणाकडे मागायची ?

बोलेल त्याला गोळी आहे ,
विचार आता बंदी झालेत .
व्यक्त होण्या धडपडतयं मन
कित्येक जायबंदी झालेत .

विचार करुन थकलयं मन ,
विसावा शोधतयं सगळीकडे अराजकता माजलीय खूप ,
धावतंय अशांत मन चहुकडे

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

चारोळी ( मेघमाला)

.. मेघमाला
काळ्या करड्या रंगा मधुनी
पळू लागल्या त्या मेघमाला 
बरसत धावत नाचू लागल्या 
आसमंती धुंद सुवास आला 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( श्रम साफल्य)

:- श्रमसाफल्य 

यश सापडे अथक परिश्रमात 
श्रम साफल्याची मिळे अनुभूती 
घर्मबिंदू असती साक्ष तयाला 
समाधानाची अनुभूती ते देती

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर 
9881862530

चारोळी ( गोड )कंद

 - चित्र काव्य 

चारोळी लेखन 

गोड कंद जोडीने उगवला
हास्यवदने प्रेमालिंगन देती 
पाहुन किमया निसर्गाची 
जन सारे अचंबित होती.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी (उत्सव सणांचा)

: उत्सव सणाचा

आनंदाने आज साजरा करू 
उत्सव सणांचा आला पहा दारी
रूढी परंपरा समजून घेऊ 
गणपती बाप्पाची आली वारी 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( मोरया)

 - मोरया

भालचंद्र मोरया नाव शोभते
माळावरी अन् शिरी विराजती
अर्धचंद्र हा विलसत राहतो
भक्तगण सारी भक्तीने गर्जती

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( बाप्पा निघाले घरी)

 बाप्पा निघाले घरी

 सेवा पाहून भक्तजनांची 
आनंदी गणेश अन मुषक स्वारी 
भक्ती भावाच्या प्रेमात रंगून 
नाचत बाप्पा निघाले घरी 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( गौरी येता घरी)

 : गौरी येता घरी..

 गौरी येता घरी मोद मनाला
पार्वती नंदन आनंदीत झाला
फळा फुलांच्या देठांनी सजली 
भाजी भाकर खाऊन तृप्त झाली

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी ( शिक्षक समाजाचा आरसा)

विषय- शिक्षक समाजाचा आरसा

भविष्यातील नागरिकाचा आहे 
शिक्षक समाजाचा आरसा 
 दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा 
चालवायला हवा आपल्याला वारसा 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

चारोळी (नव पिढी)

विषय -नव पिढी

 नवतंत्रज्ञानाची कास धरून
भरारी यशाची घेते नव पिढी 
ज्ञानमहासागरातून यशाकडे
उभारली जाईल कर्तृत्वाची गुढी

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड

Thursday, 4 September 2025

हायकू

हायकू 

फुल/फुले

सुगंधालय 
भ्रमराचे गुंजन 
फुल पुजन 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड