शिरोळ तालुक्यातील साहित्यिकांची साहित्यातून समाजसेवा
एखाद्या देशाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्या देशातील साहित्य आपल्याला सर्व काही सांगून जाते कारण साहित्य समाजमनाचा आरसा असते.साहित्य म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात पुस्तके, त्यातील लेख,कथा,कविता, कादंबरी.यालाच वाड:मय असेही म्हणतात. साहित्य का उदयास आले? तत्कालीन समाजातील चालणाऱ्या प्रथा या काही चांगल्या तर काही वाईट,या सर्वांच्याबद्दल आपल्या मनातील विचार प्रकट करून लोकांपर्यंत ते पोहचवणे.त्यांच्या मनावर राज्य करणे.त्यांना परिस्थितीशी अवगत करणे हे या गरजेपोटी साहित्य निर्मिती झाली. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले ते सारस्वत असेही साहित्य लिहणाऱ्या साहित्यिकांना म्हटले जाते. ज्यावेळी आपण खूप वाचतो व त्यानंतर आपल्या मनात विचारांचे काहूर माजते.कींवा समाजातील अनेक घटना पाहताना, सोसताना मनाची घालमेल होते,व ती शब्दरुपाने कागदावर उतरते.ते साहित्य असते.माझ्याबाबतीत तर ते खरे आहे. कारण अशा मानसिक स्थितीतूनच माझे साहित्य तयार झाले आहे. फक्त लिखाण करुन चालत नाही. तर ते प्रकाशित करून लोकापर्यंत पोहचले पाहिजे.सर्वत्र असे प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे शिरोळ तालुक्यातील साहित्यिक साहित्य क्षेत्रात भरारी मारत आहे.
जयसिंगपूर शहर म्हटले की जेष्ठ साहित्यिका निलम माणगावे यांचे नांव घेतले जाते. गेली अनेक वर्षे त्या साहित्य सेवा करत आहेत. त्यांनी लिहलेल्या पुस्तकांचा, लेख,कवितांचा विविध विद्यापिठामार्फत अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर श्री.मोहन पाटील, बाळ बाबर,डॉ. महावीर अक्कोळे या जेष्ठ साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून कधी जहाल तर कधी मवाळ भाषेतून समाजप्रवृत्तीवर लिखाण केले आहे. जयसिंगपूर कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. राजेंद्र कुंभार यांनी शाहू महाराज, महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपल्या लेखणीतून व वाणीतून सर्वत्र केला व करत आहेत. शिरोळ तालुक्यातील साहित्य संमेलनाची जबाबदारी त्यांनी स्विकारली व आपल्या कॉलेजच्या सहाय्याने विविध शाळांमध्ये साहित्य संमेलने घेतली व तेथील विद्यार्थ्यांना साहित्य व साहित्य संमेलनाची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना लिहते करण्यासाठी त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद होता. या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील अनेक साहित्यिक एकत्र आले. एकमेकांच्या ओळखी झाल्या.
साहित्य लेखनाबरोबर साहित्य प्रकाशन क्षेत्रातही शिरोळ तालुका मागे नाही.कवितासागर प्रकाशन व प्रकाशक श्री. सुनील पाटील हे नाव साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना माहीत नाही असे नाही, कारण डॉ. सुनील पाटील यांच्या रोमारोमात साहित्य आहे. त्यांनी माझ्यासह अनेक साहित्यिकांनी प्रकाशात आणले. त्यांचे घर हे मोठे पुस्तकालयच आहे. घराच्या भिंती न दिसता सर्वत्र पुस्तकेच पुस्तके दिसतात.त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सध्या त्यांच्या नावाची चर्चा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी झाली आहे ही अभिमानाची बाब आहे.गझल क्षेत्रातही शिरोळ तालुका मागे नाही. कुरुंदवाडचे धन्वंतरी डॉ. दिलीप कुलकर्णी, जयसिंगपूर कॉलेजच्या प्राध्यापिका प्रा सुनंदा शेळके यांच्या गझला वाचनीय व संदेश देणाऱ्या असतात.डॉ. कुलकर्णी हे पेशाने डॉक्टर असूनदेखील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत,त्याचबरोबर त्यांना अनेक साहित्यिक पुरस्कार मिळाले आहेत. मुक्तेश्वर प्रतिष्ठाणच्या माध्यमातून ते वाचन चळवळीला प्रेरणा देतात व विविध साहित्यिकांचा कार्यक्रम आयोजित करून समाजमनावर योग्य विचारांचा ठसा उमटवतात.कुरुंदवाड येथील दिलीप सुतार, श्री. सच्चिदानंद आवटी, साहिल शेख यांनी आपल्या लेखणीतून समाजातील प्रश्नावर आवाज उठवला आहे.साहिल शेख आपल्या बंडखोर अशा विशिष्ट लेखणीतून आपले विचार मांडतो आहे. श्री.मनोहर भोसले गुरुदत्त कारखान्यात लाईनमन म्हणून कार्यरत असताना साहित्य क्षेत्रात घोडदौड करत आहेत.त्यांनी केलेल्या लिखानाला पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जाताजाता रोजच्या घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचे लिखाण असते.आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सौ.मनिषा वराळे यांनी आपल्या लिखानातून स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. आरोग्य सेविकेचे काम करत त्यांची साहित्य सेवा अविरतपणे चालू आहे.ज्योतिष शास्त्रातही श्री ब्रम्हविलास पाटील यांनी भरपूर लेखन केले आहे. रिटायर्ड शिक्षक श्री. प्रविण वैद्य यांनी वैचारिक लेख प्रसिद्ध केले आहेत. धार्मिक लेखणातही शिरोळ तालुक्यातील साहित्यिक कमी नाहीत यामध्ये प्रामुख्याने धर्मानुरागी श्री विजय आवटी, विजय बेळंकी सर यांचे नांव येते.प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील डॉ. ज्युबेदा तांबोळी यांनी आपल्या लेखणीतून समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. लेखणीला वयाची मर्यादा नसते हे त्यांनी दाखवून दिले आहे. गृहीणीचे काम करत असताना सुद्धा आपल्या लेखणीतून आपले विचार व्यक्त केले जाऊ शकतात.हे लेखिका मेघा उळागड्डे यांनी दाखवून दिले आहे.डॉ. राजश्री पाटील या आपला दवाखाना सांभाळत येणाऱ्या आजारी व्यक्तींच्यावर उपचार करत असताना येणारे अनुभव आपल्या साहित्यातून मांडले आहेत.त्यांच्या पुस्तकांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.चिपरी सारख्या खेडेगावातील नीवृत्त शिक्षक श्री.रामगोंड पाटील यांनीही रोजच्या जीवनावर व अध्यात्मिक विषयावर लेखन केले आहे.
शिरोळ तालुक्यातील जवळपास सर्वच क्षेत्रातील साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या जोरावर समाजातील लोकांचे आपल्या लेखणीतून समाजातील लोकांचे उद्बोधन केले आहे.चांगले लेखक समाजातील विविध प्रकारच्या परिस्थितींचे ,समस्यांचे,चांगल्या वाईट प्रसंगाचे आपापल्या कल्पनेनुसार ते प्रसंगांचे शब्दांकन करतात. कोणतेही पुस्तक कींवा लेखन असू दे त्यामध्ये समाजाचे प्रतिबिंब असते."जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हटले जाते ते यामुळेच.साहित्त्यिकांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या साहित्यात कल्पनेचा वापर जरूर करावा पण त्या साहित्यातून वाचकांना एक चांगला संदेश दिला पाहिजे. पुस्तके मानवाचे चांगले मित्र आहेत असे म्हणतात ते यासाठीच.समाजाला भरकटवणारे, अनितीकडे नेणारे गलिच्छ लेखन कधीच करु नये.तसा वाचकवर्ग थोडा जरी असला तरी.तशाप्रकारचे लेखन शिरोळ तालुक्यात माझ्या नजरेत आतापर्यंत तरी आले नाही.हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या शिरोळ तालुक्यातील सर्व साहित्यिक शब्दांच्या माणिक-मोत्यांच्या आधारे जनमानसात संस्काराचे लेणे लिलया देण्यासाठी सदैव तत्पर आहेत.
लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
मुख्याध्यापिका
हेरवाड हायस्कूल, हेरवाड
9881862530
No comments:
Post a Comment