मुक्तछंद काव्य
विषय- क्रांतिज्योती सावित्री
मनुवादाच्या काळ्याकुट्ट अंधारात
चाचपडत,रडत,खुरडत होती नारी
अंगवळणी पडले होते जन्मोजन्मी
नव्हते वाटत होते ते अघोरी
गांजलेल्या, पिचलेल्या स्त्री- शक्तीला
करण्या जागे अवतरली ज्योती
मिणमिणत्या प्रकाशात धडपडत
मशाल क्रांतिकारी पेटवली.
धगधगत्या अग्निकुंडातली ज्वाला
लवलवतच पसरली दाही दिशा
जनमानसात उमटवला ठसा भारी
विरोधकांचा करुन बिमोड विचाराने
कृतीतून शिक्षणगंगा दारी आणली.
बहुजनांच्या मुलींना दारी खुली शिक्षणाची
अडथळे बहु पण निर्धार प्राणपणाचा
साथ ज्योतीला क्रांतीज्योतीची
धुरा हाती सत्यशोधक समाजाची
भाव मनीचे उमटले साहित्य संपदेत
पुत्र मानस यशवंत महान
आदेश मातेचा केली सेवा प्लेगरुग्णांची
झेलला काळाचा घाला हसतमुखाने
निघाली थोर माता अंताच्या सफरीवर
थोर उपकार मातेचे नारीजातीवर
वंदनीय, पूजनीय, वात्सल्यमूर्ती
वंदन तुजला करते मनोभावे
आठव तू,तू प्रेरणा सबलतेची
जाण ठेवून कृतीची माते
जातील पुढेपुढे या आजच्या नारी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर