Monday, 31 December 2018

लेख (सरत्या वर्षाला निरोप )

स्पर्धेसाठी

लेख

विषय- सरत्या वर्षाला निरोप

आज तूझा या वर्षातला शेवटचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर २०१८.गेलेले वर्ष म्हणजे तू आणि तूझ्याबद्दलच्या माझ्या भावना मी व्यक्त करत आहे. गतवर्ष म्हणजेच सरते वर्ष माझ्यासाठी खूप छान गेले. सरत्या वर्षात माझ्या साहित्यिक प्रवासाला चांगलीच गती मिळाली आहे. विविध प्रकारच्या स्पर्धांत मी भाग घेतला.विविध साहित्यिक समुहात सामिल झाले. त्यांनी अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या .त्या स्पर्धेत मी हिरिरीने सहभाग नोंदवला. अनेक स्पर्धेत मी यशस्वी झाले. मनाला खूप आनंद झाला. लिखाणाला गती व विविध विषय मिळाले. विविध वृत्तपत्रांत विविध विषयांवर माझे लेख छापून आले.वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मी खूप खूष झाले.

विविध सामाजिक प्रश्नांवर बोलता आले. मार्गदर्शन करता आले. साहित्य संमेलनामध्ये सहभाग नोंदवता आला.मनापासून मनातले विचार प्रकट करण्याची संधी मिळाली. खरचं हे वर्षा तू माझ्यासाठी चांगला गेलास.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी तब्येत छान राहिली. मी स्वतःसाठी वेळ काढला.रोज पंचेचाळीस मिनीटे मी. चालणे चालू केले.त्यामुळे तब्येतीला थोडे बरे वाटले.मी तरतरीत राहिले. माझ्यामुळे कुणाला त्रास होईल असे मी वागले नाही. कींवा कुणीही माझ्यासोबत वाईट वागले नाही ही एक जमेची बाजू आहे.  "एकमेकां सहाय्य करु अवघे धरु सुपंथ " या ऊक्तीप्रमाणे आपण जर दुसऱ्याला वेळोवेळी मदत केली तर तेही वेळप्रसंगी आपल्याला मदत करतात हे खरेच आहे. शेजारधर्म पाळल्यामुळे एकमेकांना समजावून घेतल्यामुळे वाद निर्माण न होता सुसंवाद घडला. एकमेकांच्या सुखद:खात सामील झाले.

आज आपण पहात आहोत की चांगल्याबरोबर वाईट गोष्टीही घडतात.पण जसे सुख व दु:ख , अंधार व प्रकाश , जय व पराजय या सर्वांना एकमेकांशिवाय शोभा नाही तसेच वाईट गोष्टी घडल्याशिवाय चांगल्या गोष्टींची कींमत कळत नाही. तसेच आयुष्यातील चढ ऊतार हे गेले वर्षभर होत गेले , पण यातून नवीन काहीतरी शिकत गेले.अनुभव हा मोठा गुरु असतो. अनुभवाने मानव शहाणा बनतो.  " पुढच्यास ठेच मागचा शहाणा " याप्रमाणे सारासार विचार करुन जीवनात पावले टाकली.बरीचशी योग्य पडली .काही चुकली पण लगेच दुरुस्ती ही केली .त्यामुळे पूर्वानुभव पुढच्या गोष्टीत महत्त्वाचा ठरला. अधिकार वाणीने दुसऱ्यांना सांगता येऊ लागले. कारण कोणतीही गोष्ट स्वतः अनुभवतो तेंव्हाच ती पूर्णपणे समजते,ऊमगते.

कौटुंबिक स्वास्थ ही ऊत्तम असल्यामुळे निराश,नाराज अशी परिस्थिती उत्पन्न झाली नाही. नाही म्हणण्यापेक्षा जेंव्हा असा प्रसंग आला त्याला धीराने, सकारात्मकतेने स्विकारले त्यामुळे त्याचा बाऊ झाला नाही. जीवनात हे असे प्रसंग येतच राहणार, अशी मनाची धारणा करुन घेतली होती.

कोणत्याही गोष्टींचा गवगवा केला अकारण त्याला अवास्तव महत्त्व दिले तर त्यापासून अपेक्षा पूर्ती झाली नाही तर मनाला दु:ख होते म्हणून जे आहे ते स्विकारत गेले. जेवढे जमेल तेवढे करत गेले. जे बरोबर आले ते माझे,नाही आले ते माझे नव्हतेच ही भावना ठेवली व मी निवांत आहे.

हे सरत्या ,गतवर्षा तू मला खूप अनुभव दिलास. मी खूप खुष आहे.येणाऱ्या वर्षात तुझ्या अनुभवाची जी शिदोरी मला मिळाली त्याच्या आधारावर मी माझी स्वप्ने, आशा-आकांक्षा, ईच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार.मला यामध्ये तुझी खूप चांगली मदत मिळणार आहे.तूला निरोप देताना मन जडावतं.कारण मागील,सरत्या वर्षातील अनेक अनुभव हे मनाला सुखावणारे होते.त्यामुळे मन नेहमी प्रफुल्लीत रहात होते.पण काळ कोणासाठी थांबत नाही. गेलेला वेळही परत येत नाही. म्हणून वेळ ही संपत्ती मानून तीचा योग्य वापर केला पाहिजे. कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा हे मागील अनुभवांवरून लक्षात येत असते.येणाऱ्या भविष्यात तुझ्यामुळे मी योग्य पावले टाकीन.तूझा अनुभव खासच आहे.तुझे मनापासून धन्यवाद. तूला मी आनंदाने निरोप देते.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

बालकविता ( बालवाडी )

स्पर्धेसाठी

महास्पर्धा पर्व २ रे

फेरी क्र.३

विषय- किलबिल बालवाडी

प्रकार - बालकविता

शिर्षक- बालवाडी

किलबिल किलबिल ऐकू आली,
बंटी बबली आले आले.
नाही पाटी नाही पुस्तक,
ईकडे तिकडे धावू लागले.

बालवाडीतील बालचमूंचा ,
गलका ,दंगा चालू झाला.
कोणी लागले जोरात रडू,
कोणी मोठ्याने हसायला.

आठवण काढून आईबाबांची,
ईवली ईवली झाली चेहरे.
बाईंनी म्हटली गाणी सुंदर,
बालचमू झाले नाचरे.

गमभण एक दोन तीन चार,
एकसुरात सारी म्हणती.
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक,
नाचत नाचत गाणे गाती.

डबा छोटा ऊघडला,
खाऊ खायला सुरु केले.
चिऊकाऊच्या घासांनी,
सगळेच मग फस्त झाले.

कोड क्रमांक LMD@215

Sunday, 30 December 2018

चारोळी ( सूर्यास्त )

चारोळी

सूर्यास्त

अस्तांचलगामी भास्कर सांगे
येऊ ऊदयास नवस्वप्नांसवे
गतसालातील टाळून ऊणिवा
नवअपेक्षांच्या संकल्पनेकडे जावे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Tuesday, 25 December 2018

कविता मुक्तछंद ( प्रेम )

स्पर्धेसाठी

मुक्तछंद

विषय- प्रेम

प्रेमाच्या या जगात,परीवारात,
आज बांधले ईमले उंच उंच
हवेतच चढले मजल्यावर मजले,
प्रत्यक्षात कारवाई शून्यचं .
मातापित्यांच्या पदरी निराशा,
सुपुत्रच ठरलायं कुपुत्र आज.
धाडून वृद्धाश्रमात आईबाबांना ,
खोटी सहानुभूती दाखवी जगी.

शोधतो जगी जो तो प्रेम,
संस्काराच्या तिजोऱ्याच आता,
पडल्यात ओस अन् भकास .
अनुकरणप्रीय येणारी संतती,
बोध घेईल खास खरा,
हेण असते जीवन समजून,
धाडतील आपल्याला वृद्धाश्रमी.

नातीगोती विस्कटून गेली,
या स्वार्थांध, वासनांध दुनियेत.
नाही सापडणार प्रेम इथे,
भेटतील फक्त जिवंत प्रेते.
विषण्ण मनाची समजूत ,
काढेल का कोणी अलवार ?

सांभाळायची आहे भावी पिढी,
नका मारु तुम्ही ऊडी या खाईत.
सांभाळून ठेवूया प्रेम अन् नाती,
भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी.
पेरालं तसचं उगवणार येथे,
कलियुगाचा हाच संदेश.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( सण नाताळचा )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- सण नाताळचा

सण नाताळचा हा आला
प्रभू येशू भूवरी जन्मला
झाला मोद चहूकडे जगी
प्रेषित जगी अवतरला 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता अष्टाक्षरी ( उघड्यावरचं जीणं )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

अष्टाक्षरी

शीर्षक - उघड्यावरचं जीणं

मांडलाय संसार मी
असा हा उघड्यावर
नाही तमा नाही चिंता
चाललय पूर्वापार

रानी घेतला आसरा
आकाशाचं पांघरुन
संसाराच्या गोधडीला
घेतलयं आंथरुन

सर्जा-राजा बैलजोडी
देते साथ जन्मभर
घेती विश्रांती रानात
कापायचं ते अंतर

बाळ माझा मांडीवर
पितो पाणी मायहाती
खुशी पाहून दोघांची
आसमंत साथ देती

विखुरली भांडीकुंडी
आग पोटाची शमली
तान्हा झाला समाधानी
लेक ऊभी ती सानुली

बाजेवर विसावला
संसाराचा अर्धा भार
तिकोट्याने हो पेलला
पांघरुन नी चादर

उघड्यावरचं जीणं
नशिबाचा असा भोग
समाधानी तरी जगी
नाही मिळाला तो योग

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( नववर्षाचे स्वागत ).

नववर्षाची चारोळी

नववर्षाच्या स्वागताची
तयारी करु नवसंकल्पाने
संघर्षमय या दुनियेचे
स्वागत करु आनंदाने

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर