Saturday, 7 October 2017

आरसा

महाकाव्य स्पर्धेसाठी

            फेरी क्रं. 10

     कोड क्रं. 1028

          अष्टाक्षरी

          आरसा

बिंब पाहता स्वतःचे
हरकून मन गेले
बोलू लागला आरसा
क्षणभर स्तब्ध झाले

बोल आरशाचे होते
छान सजलीस बाई
रहा अशीच आनंदी
नको रुसण्याची घाई

जशी दिसतेस तशी
दाखवणे माझे काम
दोष नको देऊ मला
यात काहीं नाही राम

आचरण ठेवा स्वच्छ
मुखावर दिसे स्पष्ट
सांगे खरेच आरसा
नका मानू त्याला दुष्ट

वागा नेहमी नेकीने
देतो संदेश आरसा
हृदयास शांती लाभे
ठेवा तुम्ही भरवसा

कोड क्रं. 1028

Thursday, 5 October 2017

शरदाचे चांदणे

स्पर्धेसाठी

     शब्दचारोळी

विषय -- शरदाचे चांदणे

शुभ्र चंदेरी आकाशातील
सुंदर शरदाचे चांदणे
मोहवते मनाला सर्वांच्या
हेच आहे सुखाचे मागणे.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Wednesday, 4 October 2017

डोळ्यांची भाषा

स्पर्धेसाठी

    फेरी क्र.09

कोड क्र. 1028

विषय -- प्रेमकविता

       डोळ्यांची भाषा

काळ्या डोळ्यातील ,
फुले दोन बोलली .
पसरली गालावर ,
लाल गुलाबी लाली .

अधर हलले , शब्द फुटले ,
ऐकण्यास मन अधीर झाले.
हृदयात भावकारंजा फुलला
रोमरोम न्हाऊन निघाले .

लोचनांची भाषा नकळत ,
समजे दुजा लोचनाला .
अर्थ न त्याचा दुजा कळे ,
समजे ते फक्त प्रेमहृदयाला.

वदनी पसरल्या पहा आज ,
रेषा मनातील भावनांच्या .
सहज बसल्या जाऊन ,
कोंदणात नयनांच्या .

कळले एकमेकांचे इशारे ,
केले अनेक नव बहाणे .
आपसुकच आले मग जाणे,
स्फुरले गाणे , प्रिततराणे .

कोड क्र.  1028

Tuesday, 3 October 2017

जलाशय

स्पर्धेसाठी

      चित्रचारोळी

काळ्या पांढऱ्या बदकांनी
सजला आनंदी जलाशय
हिरवाईच्या पार्श्वभूमीवर
प्रसन्नतेचे आनंदालय .

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

Monday, 2 October 2017

बापू तुमच्या देशात

स्पर्धेसाठी

       काव्यस्पर्धा

   बापू तुमच्या देशात

सुवर्णाक्षरांनी लिहलाय ,
इतिहास जगाच्या नकाशात.
सगळं अलबेल असावं ,
खरचं ,बापू तुमच्या देशात.

सत्यवचनांचा नियम तुमचा,
मोडीत काढलाय सर्वांनी .
अहिंसा तत्वाची होळी आज
केलीय ईथे आंदोलकांनी .

शरीर उघडे टाकलात तुम्ही,
गरीब या देशबांधवांसाठी .
आज पैसेवालेच फीरतात ,
उघडे , अंधानुकरणासाठी.

आधी केले मग सांगीतले ,
उपदेश तुमचा खास होता .
फक्त सांगणे न आचरता ,
परंपराच झालीय आता .

बापू तुमच्या देशात ,
माजलीय आज अराजकता.
या परतूनी , गरज तुमची ,
निकालात निघाली मानवता

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

प्रेरकशक्ती

स्पर्धेसाठी

      प्रेरक शक्ती

एक बापू एक लाल ,
इतिहास भारताचा रचला छान .
मितभाषी म्हणून ओळख यांची ,
सदैव लीनतेने झुकते मान.

शस्त्रविरहीत क्रांती यांची ,
अहिंसा हेच प्रभावी साधन.
सत्य वचनांच्या बाणातून ,
घायाळ ते परकीयजन .

प्रेरकशक्ती भारतभूमीची ,
आशास्थान जनमानसांचे .
हाक देताच जनतेला तयार ,
जत्थे स्वातंत्र्यसैनिकांचे .

मूर्ती लहान , कीर्ती महान ,
त्यागाची ती महीमा अपार .
देशप्रेमाची ज्योत पेटवून ,
केले स्वातंत्र्यस्वप्न साकार .

राष्ट्रपिता बापू महान झाले ,
लाल ,दुसरे पंतप्रधान बनले.
वंदन तया करु विनम्रभावे  ,
तनमन हे नतमस्तक झाले .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.

Sunday, 1 October 2017

गंध फुलांचा

स्पर्धेसाठी

       चारोळी

विषय -- गंध फुलांचा

वेडावून मन गेले आज
हुंगुन ते गंध सुमनांचे
पाहुनच सौंदर्य फुलांचे
नयनी भाव समाधानाचे .

     रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.