बदलते कौटुंबिक नातेसंबंध
कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक हसरं,खेळतं प्रेमाने ओसंडून वाहणारं एक घर. कुटुंब व्यवस्था ही मानवी इतिहासाच्या सुरुवातीलाच दिसून येते. अनेक वर्षांपासून मानव जेव्हा समूहामध्ये राहू लागला तेव्हापासून कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली. एकत्र कुटुंब पद्धती ही भारतीय संस्कृतीची ओळखच आहे. पूर्वीच्या काळी अनेक कुटुंब एकत्र व गुण्यागोविंदाने राहत. त्यावेळी एकच करता पुरुष व त्यावर अवलंबून असणारे सर्वजण त्याचा आदर करत व त्याच्या सांगण्याप्रमाणे गुण्यागोविंदाने एकत्र राहत. पूर्वीच्या काळी फारशा सुख- सुविधा नव्हत्या.लाईट, पाणी, अन्नपदार्थ व इतर भौतिक सुविधांची वाणवा होती. तरीसुद्धा सर्वजण एकाच छताखाली अत्यंत सुखी समाधानाने राहत होते. सकाळी लवकर उठणे,सडा संमार्जन करणे,एकत्रित बसून सर्वजण जेवण घेणे, संध्याकाळी परत लहान मुलांच्या कडून हातपाय धुवून झाल्यावर शुभं करोति व देवाचे नामस्मरण करून घेतले जायचे व संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून जेवत व गप्पा मारून झाल्यानंतर लवकर झोपी जात. व सकाळी लवकर उठत.सर्वांमध्ये प्रेम,जिव्हाळा होता. कुणाच्याही मनामध्ये कुणाच्याबद्दल अनास्था नव्हती. पण काळ बदलला. आधुनिकतेची हवा सर्वत्र खेळू लागली. संगणकाचे युग आले, आणि अशा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टीव्ही, मोबाईल यासारख्या चैनीच्या वस्तुंनी प्रवेश केला. नोकरीसाठी लोक बाहेरगावी जाऊ लागले आणि ही एकत्र कुटुंब पद्धती व कौटुंबिक नात्यांमध्ये बदल घडून येऊ लागले. पूर्वी एकत्र येणारे लोक आता मोबाईल मुळे लांब जाऊ लागले.प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये डोकावू लागला व एकाच घरात असून सुद्धा एकमेकांच्यातला संवाद कमी झाला. त्याचबरोबर प्रेम आपुलकी जीव्हाळाही कमी झाला. शिक्षणाने माणूस सुशिक्षित झाला पण कुटुंबापासून बाजूला झाला.
भारतीय समाज हा त्यातील कुटुंब व्यवस्थेमुळे संपूर्ण जगात ओळखला जातो. कारण भारतातील कुटुंब व्यवस्था ही त्यामध्ये असलेल्या व्यक्तींच्या नात्यामधून, त्यांच्या प्रेमामधून,त्यांनी एकमेकांना केलेल्या सहकार्यातून पुढे जात असतो. कुटुंब पद्धती म्हणजे त्यातील असलेल्या व्यक्ती ज्यामध्ये आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा, आत्या, मावशी , माम- मामी व घरातील सर्व मुले-मुली होय. हे सर्वजण गुण्यागोविंदाने एकाच घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब पद्धती. घरामध्ये असलेले आजी आजोबा संस्कार केंद्र म्हणून ओळखले जातात.आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींच्यावर त्याचबरोबर घरातील लहान मुलांच्यावर संस्कार करण्याचे काम त्यांच्या हातून आपसूकच होत असते. यासाठी कुठल्या शिकवणीची गरज नसते. घरातील वातावरण, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते पाहून आपोआपच घरातील लहान मुले शिकत असतात.याचाच परिपाक म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती गुण्यागोविंदाने नांदत असे.
आज शिक्षणाची गंगा दारोदारी वाहत आहे त्याचाच फायदा घेऊन घरातील सर्व व्यक्ती सुशिक्षित झाल्या व नोकरीला लागल्या. नोकरी करत असताना बऱ्याच वेळेला परगावी जावे लागते. येण्या जाण्याचा त्रास होतो त्या वेळेला नोकरीच्या गावीच राहू लागतात. आई वडील व त्यांची मुले एवढं छोटं कुटुंब तयार होतं. त्यांचं जग स्वतःभोवतीच फिरत राहतं. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिल्यामुळे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, एकमेकांच्या अडीअडचणी सोडवणं, एकमेकाला समजून घेणे, स्वतःपेक्षा दुसऱ्याचाच विचार करणं हे घडत असतं. पण आता या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील नातेसंबंधात सुद्धा फार मोठा बदल होत आहे. यामध्ये नातेसंबंधातील प्रेमाची व्यापकता कमी होत आहे.सुट्टीच्या कालावधीमध्ये, सण समारंभाला ते आपल्या घरी परत येतात. व थोड्या कालावधीसाठी राहून परत आपल्या गावी निघून जातात. पण यामध्ये तो जिव्हाळा दिसत नाही जो खूप वर्ष एकत्र एकाच कुटुंबात राहून मनामध्ये तयार झालेला असतो. शहराची ओढ लागलेल्या मुलांना ग्रामीण भागात राहायला नकोसे वाटते. त्याचबरोबर शहरात मन रमवण्यासाठी,मनोरंजनासाठी अनेक सुख-सुविधांची साधने तयार असतात ते त्यांना ग्रामीण भागामध्ये मिळत नसल्यामुळे घरातील व्यक्तींच्या पेक्षा त्यांना या साधनांचीच ओढ लागलेली असते. पण या साधनांच्या मध्ये प्रेम, जिव्हाळा,भावना यांचा लवलेशही नसतो.त्यामुळे ही मुले कृत्रिम साधनांच्यामध्ये गुरफटून जातात. कारण त्यांच्यावर संस्कार करणारे आजी-आजोबा त्यांच्याजवळ नसतात. नोकरी निमित्त आई व बाबा दोघेही बाहेर जात असतात अशा वेळेला या मुलांना घरामधील व्यक्तींचा आधार असतो त्या वेळेला आजी-आजोबा किंवा घरातील इतर व्यक्ती त्यांचा सांभाळ करतात. या व्यक्तींचा मुलांना आधार वाटत असतो व सुरक्षित तिची भावना त्यांच्या मनामध्ये असते. परंतु ही नाती आता आजी आजोबांच्या बरोबर दुरापास्त होत चाललेली दिसतात.
नाती हरवलेली आजची पिढी मोबाईलच्या,संगणकाच्या आभासी दुनियेत रमत आहेत. मुलांच्या मनामध्ये असलेली प्रेमाची, स्नेहाची,सहानुभूतीची भूक पालक भागवू शकत नाहीत त्यामुळे मुले आभासी जगातील मित्र- मैत्रिणीच्या मध्ये नातेसंबंध शोधत आहेत. व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम यावरील मित्र-मैत्रिणी हेच त्यांचे जग झालेले आहे. त्यातच ते रमत आहेत. इंटरनेटमुळे सारे जग जरी जवळ आले तरी जवळच्या व्यक्ती दूर जात आहेत. कुटुंबातील एकमेकांच्या बरोबर असलेले नातेसंबंध यामध्ये फार मोठी तफावत होत आहे. कुटुंबातील व्यक्तींच्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे त्यांच्यामधील असलेला जिवंत प्रेमाचा झरा हा कुठेतरी आटताना दिसत आहे. घरामध्ये शेजारी असलेल्या व्यक्तींशी बोलायला सवड नसते पण सोशल मीडियावर तासंतास घालवून मनाला समाधान मिळवणारेच आता जास्त दिसत आहेत. आता तर असे चित्र दिसत आहे की मुलांना आपले आई-वडील भाऊ-बहीण यांचाही त्रास होत आहे कारण ते सोशल मीडिया वापरत करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गेममध्ये मुले अडकत आहेत व त्यांना यापासून दूर करणारे,नकार देणारे त्यांचे पालक त्यांची भावंडही त्यांना नको आहेत. प्रसंगी आपल्या आई-वडिलांचा, नातेवाईकांचा खून करण्यास ही मागेपुढे बघत नाहीत.यासाठी सर्वांनी वेळीच सावध झाले पाहिजे. कृत्रिम साधनांच्या आहारी आपल्या मुलांना घालवण्याऐवजी जिवंत माणसांना एकत्र आणणारी कुटुंब व्यवस्था व त्यातील नातेसंबंध अतिशय मौल्यवान आहेत. त्याचे जतन करायला हवे.
कौटुंबिक व्यवस्था एक दिसत असली तरी त्यांच्यातील नातेसंबंधांमध्ये आता थोडी फार तफावत दिसून येत आहे. यामध्ये स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वी स्त्रिया नोकरी न करता घरात राहून घरच्यांचे नातेसंबंध सांभाळायच्या पण यात एक चूक होती की तिला सर्वात गृहीत धरले जायचे.कोणत्याही प्रकारचा मानसन्मान दिला जात नसे. त्यामुळे जस जसा समाज सुधारत गेला, वैचारिक क्रांती होत गेली तस तशा स्त्रिया शिकून नोकरी करू लागल्या. नोकरी करत असताना बहुत करून स्त्रिया या घरचे काम करून नोकरी सुद्धा व्यवस्थित सांभाळत असतात. त्यावेळेला घरच्यांचे नातेसंबंध जोडताना, टिकवताना त्यांना नाकी नऊ येतात पण त्या यशस्वीरित्या हे सर्व पार करत असतात. पण त्यातही अशा काही स्त्रिया आहेत ज्या केवळ अर्थाजनासाठी बाहेर पडलेल्या असतात. त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवायचे असते. त्यांच्या मनामध्ये स्वत्वाची भावना उदयास आलेली असते आणि अशा वेळेला मग त्या मी नोकरी करते म्हणजे मी कुणीतरी वेगळी आहे असे समजल्यामुळे घरातील लोकांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची अढी निर्माण झालेली असते किंवा एक अहंगंड निर्माण झालेला असतो त्यामुळे मी घरातील सर्व कामे का करू? अशा प्रकारचा एक दुजाभाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो आणि अशा वेळेला मी व माझे कुटुंब या संकुचित वृत्तीचे विचार मनामध्ये पेरले जातात. घरातील इतर लोक, त्यांच्याबद्दलचे नातेसंबंध याबद्दल तिच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची ओढ राहत नाही. त्यामुळे अशा काही स्त्रियांच्या मुळे नोकरी करणाऱ्या सर्वच स्त्रियांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा गैरसमज निर्माण झालेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. मला संकुचित विचार करणाऱ्या व नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सांगायचे आहे. पैसा हा सर्वस्व नाही कारण शेवटी आपण संकटामध्ये सापडतो त्यावेळेला पैशाबरोबर नातेसंबंधातील व्यक्ती, घरातील व्यक्तीच आपल्याला मदत करतात. आपल्याला त्यांचीच गरज भासते. नुसता पैसा असून चालत नाही.
अलीकडे अशिक्षित लोकांच्या मानाने सुशिक्षित लोकांच्या मधील घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. एकमेकाला समजून घेण्याची भावना सध्या कोणामध्ये दिसत नाही. घरातील इतर व्यक्ती बाहेरून आलेल्या मुलीला समजून घेण्यास कमी पडत आहेत. काही ठिकाणी हे चित्र जरी उलटे दिसत असले तरी हे प्रमाण कमी आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा फार आहेत. तिने नोकरीही करावी व घरातील कामेही करावीत अशा अवाजवी अपेक्षा उंचावल्यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतो. यातून एकमेकांच्या बरोबरची भांडणे विकोपाला जातात व शेवटी याचा परिणाम घटस्फोटामध्ये होतो. पाच- पाच वर्षे संसार करून काही सुशिक्षित महाभागांना पाच वर्षे खाऊन पिऊन सुद्धा असा साक्षात्कार होतो की बायको ,सून स्वयंपाक करत नाही एवढ्या छोट्या कारणाने घटस्फोट घेणारे सुशिक्षित व त्यांच्या घरचे अडाणी सासू-सासरे समाजामध्ये दिसतात. हे कुठले सुशिक्षितपणाचे लक्षण आहे? का पैसे मिळवण्यासाठी दुसरी बायको करून आणणे असा प्रकार असावा? कायदा हा स्त्रीच्या बाजूने आहे असे कितीही म्हटले तरी सहजासहजी कोणत्याही स्त्रीला न्याय मिळत नाही असे चित्र दिसत आहे. त्याचप्रमाणे आजची विभक्त कुटुंब पद्धती याला कारणीभूत आहे .कारण छोटे कुटुंब असल्यामुळे मी व माझ्या स्वतःभोवती सर्वांचे जग फिरत आहे त्यामुळे एकमेकांना समजून घेणे दिसत नाही. काहींचा एगो इतका मोठा असतो की समोरच्याची खरी बाजू दिसत असून सुद्धा माघार घेण्यास ते तयार नसतात. अशावेळी कुटुंबांमधील नातेसंबंधातील भावनिक दुरावा वाढतच जातो. यामध्ये वेळ,पैसा, नातेसंबंधातील प्रेम हे सगळेच खर्ची पडते. नोकरीसाठी बाहेर पडत असताना घरामधील कामाची आवराआवर करून बाहेर पडल्यानंतर समाजामधील लोकांशी टक्कर देत नोकरीच्या ठिकाणी जाण्यापर्यंतची धावपळ, नोकरीच्या ठिकाणी असलेले कामाचा ताण यामुळे ताण-तणाव वाढतो व मानसिक स्थिती बिघडली जाते. अशावेळी सर्वांनीच एकमेकाला समजावून घेतले पाहिजे. एकमेकांचा नाव कमी केला पाहिजे.अशावेळी हुकूमशाही काही कामाची नाही.
तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात वावरत असताना नव्या पिढीचे विचार व जुन्या पिढीचे विचार यामध्ये तफावत दिसून येत आहे. नवी पिढी नव्या विचारांप्रमाणे वागत असते पण ते जुन्या पिढीला पटत नसते. हळू हळू नातेसंबंधात तडे जायला सुरुवात होते. अशावेळी जुन्या व नव्या पिढीतील व्यक्तींनी एकमेकाला समजावून घेऊन कुठेतरी सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे. अशावेळी सर्वांनी आपला अहंभाव व माझेच सर्वांनी ऐकले पाहिजे, मीच बरोबर आहे ही भावना थोडीशी बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाला, कुटुंबातील नातेसंबंधाला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शेवटी बाहेरच्या लोकांच्या पेक्षा आपल्या घरातील जवळचे लोकच आपल्याला मदत करत असतात याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे मोबाईलचा अतिवापर हा सुद्धा कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करणारा, कुटुंबातील व्यक्तींना एकमेकापासून दूर करणारा घटक बनत चाललेला आहे. ज्यावेळी मोबाईल नव्हता त्या वेळेला सर्वजण एकमेकांबरोबर समोरासमोर बसून बोलत होते. एकमेकांच्या भावभावना समजून घेत होते. एकमेकाच्या दुःखांचा विचार करत होते. ते दुःख कमी करण्याचा सक्रिय प्रयत्न करत होते. एकमेकांबद्दलचे प्रेम एकमेकांच्या मनामध्ये होतं.पण आज सर्वजण या व्हर्च्यूअल जगातच वावरत आहेत त्यामुळे भावनांना आता कुठेच स्थान दिसत नाही.अगदी लहान मुलांच्या पासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वजण मोबाईल मध्ये गुंग आहेत. याचा एक दुष्परिणाम असा होतो की आपला मेंदू विचार करणे थांबवतो. त्यामुळे मनातील भावना गोठल्या जातात. भावनांचा निचरा कुठेही न झाल्यामुळे मग व्यक्ती चिडचिड होते. दुसरे कोणीही जवळ नको असे वाटते.ह्या मोबाईलच्या लहरी पासून मेंदूवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या मोबाईलच्या आहारी किती जायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. या आभासी जगात लाखो मित्र-मैत्रिणी असले तरीसुद्धा प्रत्यक्ष जेव्हा एखादी व्यक्ती संकटात सापडते त्यावेळेला घरातील जवळच्या व्यक्तीशिवाय पर्यायच नसतो. आपल्यातील नातेसंबंध हेच आपले खरे संबंधित आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
नातेसंबंधातील दुराव्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे सुसंवादाचा अभाव होय. एकमेकाबद्दल एकमेकांच्या भावना समजून घेऊन बोलण्याचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे. सर्वांनी एकमेकांच्या भावना, विचार ऐकून घेणे व एकमेकांच्या भावनांची कदर करणे गरजेचे आहे. एकमेकांच्या अनुभवांचा विचार करणे गरजेचे आहे. काहीजणांना स्वतःचा हक्क गाजवण्यासाठी दुसऱ्याचे काय म्हणणे आहे ते ऐकून न घेता स्वतःचेच म्हणणे सर्वांनी ऐकले पाहिजे असे वाटत असते.अशामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. जर घर टिकवायचे असेल, घरातील नातेसंबंध टिकवायचे असतील, दुरावा दूर करायचा असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे व योग्य तो आदर प्रत्येकाला दिला पाहिजे. एकमेकाला भावनिक आधार देणे,त्यांच्या चुका समजून घेऊन चर्चा करणे गरजेचे आहे. मुले मोठी झाली की त्यांच्या अशा अपेक्षा वाढत असतात अशावेळी त्यांना त्यांच्या पुढील परिणामाला तेच जबाबदार आहेत याची जाणीव देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवणे गरजेचे असते. त्यांच्यावर अधिकार न गाजवता त्यांचे सोबती बनून त्यांना योग्य तो सल्ला देणे गरजेचे असते. अशाने त्यांच्या मनावरचा ताण कमी होतो व ते रिलॅक्स होतात. कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या बरोबर ओळख व नातेसंबंध दृढ करण्यासाठी महिन्यातून, वर्षातून एखादा कार्यक्रम ठेवणे गरजेचे असते ज्यामुळे दूर राहिलेले आपले नातेवाईक हे जवळ येतील व एकमेकांना समजून घेण्याची एक संधी मिळेल व नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याच्या ऐवजी त्यामध्ये एकसंधता निर्माण होण्यास मदत होते.
आधुनिकतेचा स्वीकार करत असताना चालत आलेल्या संस्काराच्या परंपरा आपण कधीही विसरता कामा नये. बदललेली कुटुंब पद्धती व त्यातील बदलत चाललेले नातेसंबंध याचा विचार केला असता, सर्वांच्यात सुसंवाद होणे गरजेचे आहे.यासाठी सोशल मीडियाचा कायम वापर न करता प्रत्यक्ष एकमेकांच्या भावना एकमेकांना भेटून सांगितल्या पाहिजेत.यामध्ये जो जिव्हाळा आपुलकी असणार आहे ती सोशल मीडियाचा वापर करून देण्यात येणाऱ्या कृत्रिम निरोपामध्ये नाही. कुटुंबातील सर्व व्यक्ती जर एकत्र राहत असतील तर येणाऱ्या पिढीला त्यांच्यामधील असलेले नातेसंबंध लक्षात येतील अन्यथा येणाऱ्या पिढीला एकत्र कुटुंब पद्धती व एकमेकांमधील नातीसुद्धा समजावून सांगणे अवघड होऊन जाईल. यासाठी आई-वडिलांना एक आदर्श पिता व एक आदर्श माता बनने आवश्यक आहे. संस्काराचे केंद्र असलेल्या आजी- आजोबा यांच्या सहवासात आपल्या मुलांना ठेवले पाहिजे. आधुनिकतेचा वापर स्वैराचारासाठी न करता स्वयं विकासासाठी केला पाहिजे. पाश्चात्य संस्कृती व भारतीय संस्कृती यामधील फरक ओळखता आले पाहिजे. सोशल मीडियावर चालत आलेला चंगळवादाचा,माणुसकीला विसरायला लावणारा व कुटुंब संस्थेला सुरुंग लावून उद्ध्वस्त करणारा दृष्टिकोन पूर्णपणे दुर्लक्षित केला पाहिजे.
संस्काराच्या अभावामुळे संकुचित व आपमतलबीवृत्ती वाढत आहे त्याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. तरच बदलते नातेसंबंध त्यातील दुरावा कमी होईल.
लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०
No comments:
Post a Comment