राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP )
दररोजच्या जीवनात बदल अत्यंत गरजेचा आहे.ज्याप्रमाणे साचलेले पाणी पुढे न जाता एकाच ठिकाणी साचून राहते तेंव्हा ते अस्वच्छ होते. व ते वापरण्यायोग्य रहात नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीत नवनवीन बदल होत राहिले पाहिजेत.व प्रत्येकाने ते येणारे बदल सकारात्मकतेने स्विकारलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही बदल होत आलेले आहेत व हे बदल काळाची गरज असल्यामुळे ते झालेच पाहिजेत. सध्याचा शिक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 होय.1968,1986 नंतर 34 वर्षानंतर आता 2020 ला हा बदल केलेला आहे.यामध्ये शिक्षणपद्धतीत अमुलाग्र बदल केलेला आहे. तो सहजासहजी सर्वांच्या पचनी पडणे सुरवातीला अवघड आहे.दोन वर्षापूर्वी कोरोना महामारीच्या काळातील शिक्षणपद्धती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरु होती. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी शिक्षण चालू राहू शकते,हे अधोरेखित झाले आहे. यामध्ये सरकारने विविध योजना, शैक्षणिक आभासी केंद्रे तयार केली होती.ज्याद्वारे शिक्षण दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहचवले जात होते.
सध्याचे येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण हे एक प्रकारचे आधुनिक बदललेल्या शैक्षणिक पद्धतीचा नमुना आहे.काय आहे हे धोरण? या धोरणाचे उद्देश पुढीलप्रमाणे- १) 2030 पर्यंत शालेय शिक्षण 100% सर्वांपर्यंत पोहचवण्याचा आहे.
२) पूर्वप्राथमिक विद्यालयापासून माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व सार्वभौमिकीकरण करणे.
३) वयवर्षे 3 ते 18 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणने.
डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हे धोरण आखले गेले.याद्वारे शिक्षणक्षेत्रात महत्वपूर्ण बदल केले गेले.मोठा बदल केला गेला तो म्हणजे सर्वात प्रथम MHRD मिनीस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजेच मानव संसाधन विकास मंत्रालय हे नांव बदलून शिक्षा मंत्रालय (मिनीस्ट्रीऑफ एज्युकेशन)असे करण्यात आले.तसेच पूर्वीचा शिक्षणाचा 10 + 2 हा स्तर बदलून आता 5 + 3 + 3 + 4 असा करण्यात आला आहे. पहिला टप्पा वयवर्षे 3 पासून वयवर्षे 5 पर्यंत असणार आहे. आनंददायी शिक्षण या टप्प्यात दिले जाणार आहे. मुलांनी गाणी, गोष्टी, गप्पा या माध्यमातून शिकायचे आहे. या टप्प्यावर कोणत्याही प्रकारची परीक्षा असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तणाव येणार नाही. ती सहजपणे शिकतील.यानंतरचा दुसरा टप्पा 3 मध्ये इयत्ता 3री,4थी,5वी असा असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या टप्प्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्येच शिकता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकताना कोणतीही अडचण येणार नाही पण इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.या टप्प्यावर परीक्षेची सुरवात होणार म्हणजे परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे हळूहळू विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी होईल.पुढील टप्पा 3 मध्ये 6वी, 7वी, 8वी असा आहे. या मधल्या स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच विविध कोर्सेस शिकवले जाणार जसे की,कंप्यूटर, छोटे छोटे कोर्सेस उदा.शिलाई,जेवण बनवणे,माळीकाम इ.कोर्सेस.हे कोर्सेस विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे निवडता व शिकता येतील.त्यामुळे शिकताना विद्यार्थ्यांना आंनद मिळेल.गणित, विज्ञान, कला या विषयांबरोबरच विद्यार्थ्यांना एक भारतीय भाषाही शिकता येणार आहे. यानंतरचा टप्पा 4 .यामध्ये इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी असा स्तर असणार आहे.ही सेकंडरी स्टेज आहे.या टप्प्यावर परीक्षा पद्धती ही सेमिस्टर पद्धतीने घेतली जाणार आहे.टप्या-टप्याने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण येणार नाही.तसेच वेगवेगळे शिक्षणाचे प्रवाह नसणार तर कला,विज्ञान,वाणिज्य या तीनही शाखेतील आपल्याला आवडेल तो विषय विद्यार्थी घेऊ शकतात.त्याचबरोबर पूर्वीची पाठांतर पद्धती बंद करून वैचारिक पद्धती आणली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही परदेषी भाषा शिकता येणार आहे.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे बी.ए,बी.कॉम,बी.एस.सी. अशी असणारी डिग्री पद्धत बंद होणार व त्याऐवजी चार वर्षाचे चार शैक्षणिक वर्षाचे भाग पाडले जाणार. त्यामध्ये बारावीनंतर एक वर्ष शिक्षण पूर्ण झाले की,विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जाणार. दुसऱ्या वर्षानंतर डिप्लोमा पदवी,तिसऱ्या वर्षानंतर डीग्री प्रमाणपत्र तर चौथ्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना रिसर्च म्हणजेच संशोधन प्रमाणपत्र दिले जाणार. यामुळे फायदा असा होणार की, पूर्वी बी.ए.,बी.एस.सी.,बी.कॉम ची पदवी पूर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना कुठे नोकरी करता येत नव्हती. शिवाय शिक्षण पूर्ण नसल्याने अर्धवट शिक्षणाचा काही उपयोग होत नव्हता. पण आता एक वर्ष शिक्षण झाले तरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. व त्याआधारे तो नोकरी किंवा व्यवसाय करु शकतो.तसेच भविष्यात त्याला शिकायचे असेल तर तो पुन्हा प्रवेशित होऊन जिथून शिक्षण थांबले आहे तिथून पुढील शिक्षण घेऊ शकतो. त्यानंतर दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतो.त्याचप्रमाणे एम.फील.बंद करून पीएचडी. चे शिक्षण चार वर्षे करण्यात आले आहे.त्याचबरोबर
सर्वांना समान शिक्षण मिळण्यासाठी शालेय फी सर्वत्र एकसमान असणार आहे.जेणेकरून सर्वांना एकाच छताखाली शिक्षण घेता येणार आहे.आनंदाची गोष्ट म्हणजे प्रात्यक्षिक ज्ञानावर भर दिला जाणार आहे.कारण ऐकून व डोळ्याने पाहून घेतलेल्या शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष कृती करुन घेतलेले शिक्षण,ज्ञान हे विद्यार्थ्यांना परीपूर्ण व सक्षम बनवते.तसेच भविष्यात परदेशातील नामांकित 50 युनिव्हर्सिटी भारतात आपल्या शाखा चालू करु शकतात.त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच राहून शिक्षण घेणे शक्य होणार आहे. विविध विभागासाठी वेगवेगळ्या शाखा चालू करण्यात येतील.शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी चार वर्षांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाप्रती रुची व अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी नक्कीच होईल.मूल्यमापन पद्धतीत स्वयंमूल्यमापन व दुसऱ्या व्यक्तींच्याकडून मूल्यमापन केले जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांनासुद्धा नेहमी अपडेट रहावे लागणार आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रस्नेही बणून संगणकीय युगातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक भागवावी लागणार आहे. तरच शिक्षक या स्पर्धेत टिकून राहू शकतो.
यासाठी येणाऱ्या आव्हानात्मक काळासाठी म्हणजेच येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वतःला सिद्ध करुन सक्षम बनण्यासाठी सर्वांनी सकारात्मकता अंगी बाणवली पाहिजे.नवनवीन ज्ञानाचा उपयोग करून तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करून येणाऱ्या तंत्रस्नेही पिढीच्या प्रत्येक समस्येवर उपाय करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे.
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
मुख्याध्यापिका, हेरवाड हायस्कूल, हेरवाड
9881862530
No comments:
Post a Comment