Saturday, 16 November 2024

चारोळी (सडा शिंपण)


विषय:-सडा शिंपण

सडा शिंपण करता दारी
पहाट वेळ ही मना सुखावे 
लक्ष्मीच्या पावलांनी मग
स्वच्छता अन् सौंदर्य डोकावे.

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चारोळी (जीवनचक्र)


विषय:-जीवन चक्र 

गरजेचे कर्तव्य करत राहणे
जीवनचक्र तरच पुढे जाईल 
सुखदुःखाची झोळी भरता
आपोआप समाधान होईल

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Friday, 8 November 2024

चारोळी (संत संगती )

विषय - संत संगती

सार ओळखण्या जीवनाचे
संत संगती सोबत असावी
सन्मार्गाची धरून कास 
स्वकर्तृत्वाची भीती नसावी. 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Wednesday, 6 November 2024

चारोळी (सत्य)

चारोळी ( सत्य)

सत्य मार्ग खडतर जरी
सरळ ,सहज पार होऊन जातो
अवलंबावा तोच मार्ग सदैव जीवनी
निर्भयपणे, यशाची वाट दाखवतो

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर 

चित्र काव्य (आईची माया)


शीर्षक - आईची माया

प्रेमळ नजर आईची 
कौतुकाने न्याहाळते लेकरांना
प्रेम मिठी मारून कन्या 
पाहते आईच्या कलागुणांना 

जुने बांधीव घर जरी बाजूला 
दिसे भारी नीटनेटकेपणा 
तव्यामधली आंबोळी छान 
जाणवतो लांबून कुरकुरीतपणा 

शेगडी मधली धग पेटते 
खाण्याला एक पदार्थ बनवते 
आग पोटाची शांत करण्या
अशी ती मदत करते 

नजरेच्या त्या भाषेमध्ये 
मायलेकरात संवाद झाले 
शब्दा वाचून प्रेम माया 
ओसंडून ते असे वाहिले 

घालून साधी वस्त्रे अंगावरी
स्वच्छता चमकते भांड्यावरी
कुटुंब असावे असे समाधानी 
सुख झळकते वदनावरी

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
 कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Monday, 4 November 2024

चारोळी - अक्षय राहो प्रीत


विषय - अक्षय राहो प्रीत

टिकवण्या नाते नात्यामधले 
अक्षय राहो प्रीत आपल्यामध्ये 
नको दुरावा,नको संशय कोणता 
फुलत जाते सहजी विश्वासामध्ये

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Sunday, 27 October 2024

आठोळी आशा


विषय:- आशा

सहनीय जीवन होते 
ज्यांच्या मनी आशा असते
संकटांच्या मालिकांत सहजी
निराशा फशी पडताना दिसते 
सकारात्मक विचारांनी मनी
यश आले जवळी भासते 
जीवावर आशेच्या सरीजण
मोहर यशाची आपसूक ठसते

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड तालुका शिरूर जिल्हा कोल्हापूर.

Thursday, 24 October 2024

लेख/विचार (चरण )


विषय :- चरण

आईच्या चरणावर स्वर्ग भेटतो असे म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. ज्यावेळी आपण आई वडिलांच्या चरणावर डोके ठेवतो व नतमस्तक होतो त्या वेळेला आपण आपल्या मनातील सर्व अहंभाव बाजूला सारून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लहान होऊन लीन होतो. अशावेळी आपले पालक आपल्याला सकारात्मक ऊर्जा असलेला आशीर्वाद देत असतात. कारण माता पिता आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता नेहमीच करत असतात. व आपली मुले नेहमी यशाच्या शिखराकडे जावीत, यशस्वी व्हावीत असेच त्यांना वाटत असते. त्यामुळे जेव्हा आपली मुले चरणावर डोके ठेवतात त्यावेळेला ते नेहमी मुलांच्या भविष्यासाठी चांगला आशीर्वाद देतात. म्हणून आपण नेहमी आपल्या आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक व्हावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, लीन व्हावे.
चरण या शब्दाचा दुसरा अर्थ कवितेचे कडवे किंवा पद असे होते. आपले भाव या कवितेतून कवी व्यक्त करत असतो. कवितेच्या चरणातून कवीला काय म्हणायचे आहे व या कवितेचा अर्थ काय आहे हे वाचणाऱ्याला ते चरण वाचून कळत असते.
त्यामुळे चरण या शब्दाचा अर्थ आपण कोणत्या अर्थाने वापरतो त्या पद्धतीने वाचकाने घ्यावे. 

लेख
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Wednesday, 23 October 2024

आठोळी (सखा माझा निसर्ग )


विषय : सृष्टी

शीर्षक - सखा माझा निसर्ग 

सृष्टी सजली नाना रंगाने
फुलवण्या सज्ज सकल जना 
रुप मनोहर पाहून हर्षली उरी
समाधान सात्विक लाभते मना
सखा माझा निसर्ग सभोवताली 
सुख दुःखाची देतो संभावना 
उपकृत सदैव रहावे जगती
हिच खरी ठरते जगी उपासना

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

Tuesday, 22 October 2024

चारोळी (आनंदाश्रू )


विषय: आनंदाश्रू

मनाच्या गाभाऱ्यात येते उधाण 
वाट मोकळी आनंदाश्रू वाहती 
जणू वाटे मिलाफ सुखदुःखाचा
आकांक्षा मनाच्या पुर्ण होती 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

चित्र चारोळी


विषय चित्र चारोळी

 रुप लाभले लोभसवाणे जरी
 देठी लाल हिरवी मिर्ची सिमला
श्वान पिल्लू आकारे फळभाजी
निरागसता मोहवते मनाला 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

Monday, 21 October 2024

आठोळी आईच्या नजरेतून दिवाळी


 विषय - आईच्या नजरेतून दिवाळी

विषय- आनंददायी दिवाळी

आनंददायी, समाधानाची छान 
आईच्या नजरेतून दिवाळी पहा 
त्रास न वाटे अथक कामाची 
भाव चेहऱ्यावर मुलांच्या अहा 

फराळाच्या जिन्नसात प्रेम पाक
जिभेला गोडवा मायेचा येतो
चकली चिवडा तिखट स्वभाव 
साजरी दिवाळी एकी टिकवतो 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Sunday, 20 October 2024

कविता


विषय:  माझे आजोळ 

गेले बालपण सारे आजोळी
परसबाग सदा फुललेली असे
सडा सारवणाचे अंगण सुंदर 
नक्षी रांगोळीची मनात वसे 

आजी-आजोबांची माया उरी
मामा मामी सांभाळती नाती
प्रेम जिव्हाळा वाहतो दारी
जशा पेटती निरांजनी वाती 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Wednesday, 16 October 2024

कोजागिरी पौर्णिमा कविता


विषय कोजागिरी पौर्णिमा
 शीर्षक-पौर्णिमेचा चंद्र 

उजळतो सहर्ष वदनी नभात
पौर्णिमेचा चंद्र कोजागिरीला
सात्विक, पौष्टिक दुग्ध प्राशन 
तोटा न या आनंदी समाधानाला 

रात्रीच्या चांदण्यात गेलो 
शरदाचं चांदणं बघायला
शुभ्र पांढरा गोलगोल चंद्रमा
डोकावून लागला हसायला

उजळतो सहर्ष वदनी नभात
पौर्णिमेचा चंद्र कोजागिरीला
सात्विक, पौष्टिक दुग्ध प्राशन 
तोटा न या आनंदी समाधानाला 

चंद्र आहे साक्षीला आज रात्री
केशरी दुधाची लयलूट करुया
एकमेकांच्या साथीने आपसूक 
बंध रेशमी अलवार वाढवूया

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Friday, 11 October 2024

कविता मदर तेरेसा

शिर्षक - समाजसेविका मदर टेरेसा 

पंथ कॅथेलिक नागरिकत्व भारतीय 
प्रण अनाथ, असहाय गरिबांची सेवा 
निस्वार्थ भावनेने केली सुश्रुषा
सहजतेने केली महारोग्यांची सेवा 

भारतात आगमन धर्म प्रसारासाठी 
विरोध जनमानसांचा साहिला
धाडसाच्या मुर्तिमंत उदाहरण
बंडखोर सैनिकांत समझोता घडविला 

दिला आधार भुकेलेल्यांना 
युद्धभूमीवर धैर्याने फिरल्या 
शांततेचे नोबेल पुरस्कार प्राप्त 
संत पदवीस लायक ठरल्या

दंतकथेतून चमत्कार पसरला
विज्ञान कसोटीवर न उतरला
साहित्यातून अमर जाहल्या
नावलौकिक सर्वत्र पसरला

संवेदनशील मन सुंदर आवाज
गीत गायनाने मंत्रमुग्ध सारे
जगप्रवासाला निघाली माता
धर्म ख्रिस्ती स्वेच्छेने स्विकारे

नन बनून रुग्णसेवा मनापासून 
मदर तेरेसा बनल्या भारतात
अखेरपर्यंत कार्यरत समाजसेवेत
श्वास अखेरचा घेतला कलकत्त्यात

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Thursday, 10 October 2024

कविता सुनीता नारायण



विषय- सुनिता नारायण 
शिर्षक - पर्यावरण रक्षक

थोर पर्यावरणवादी लेखिका
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित 
कल्पवृक्ष संस्था निसर्ग प्रेमी 
चिपको आंदोलकांच्या भेटीत

बागकाम रक्षण पर्यावरणाचे
बाळकडू आई आजोबांनी दिला
सहभागी ग्रामीण वनीकरणात 
अभ्यास हवामान प्रश्नांचा केला

हवा शुद्ध केली दिल्ली क्षेत्री
सिएनजीचा वापर सुरु वाहनांत
बाटलीबंद पाणी अयोग्य आरोग्यास
व्याघ्र प्रकल्पात कृती संवर्धनाची


योगदान गंगा नदी शुद्धीकरणात
लिखाणाला निसर्ग रक्षणाची धार
दखल सरकारने घेतली खास
सन्मानित केले दिले पुरस्कार 

पद्मश्री, डॉक्टरेट मानाच्या पदव्या
पोहोचपावती कामाची बहाल केले
वंदन करण्या आनंदाने तिजला
आपसूकच कर मी जोडले 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Wednesday, 9 October 2024

कविता

मेधा पाटकर 

राष्ट्र सेवा दलाच्या प्रेरणास्रोत 
मेधा पाटकर थोर महिला नेत्या 
देशसेवेचे बाळकडू घरातून मिळे
स्वातंत्र्य सेनानी पिता,आदर्श होते

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 
कार्ये सर्वांसाठी जोरदार केली 
नर्मदा खोऱ्यातील बांधवांसाठी 
शिक्षणाची होळी आपसूक झाली 

आंदोलन, संघर्षमय जीवन 
आदिवासींच्या जीवनासाठी 
उपोषणे,आंदोलने,गाठीला
दिनदलितांच्या उद्धारासाठी 

नर्मदा बचाव आंदोलन सुरू 
सरदार सरोवर कार्य महत्त्वाचे 
विशाल धरण जागा व्यापली
प्रश्न उभे जटिल अस्तित्वाचे

हक्क झोपडपट्टीवासियांचे
पुनर्विकास ठसले मनी विचार
लढा निकराचा न थकता दिला
न्याय हक्कासाठी नव आचार

हत्यार उपोषणाचे वापरून खास
लढा अनुप्रकल्पाविरोधी दिला
विनाश नव्हे गरज विकासाची 
भारत जोडो नारा गरजेचा झाला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Tuesday, 8 October 2024

चारोळी


विषय वाचाल तर वाचाल
        चारोळी

ग्रंथ मित्र देतो अफाट ज्ञान 
त्यांना वाचले तर आपण वाचू
घेऊन अगाध ज्ञान जगाचे सारे
बेभान अभिमान आनंदाने नाचू

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

कविता अरुणा रॉय

काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर जिल्हा आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा २०२४
"करूया स्त्रीशक्तीचा जागर"


शिर्षक -अरुणा रॉय 

घेऊन वारसा समाजसेवेचा
आधुनिक विचारांच्या समुदायात
अरुणा रॉय जन्मली चेन्नईत 
ज्योत पेटती परोपकाराची मनात

ना बंधन जातीचे मानले कधी 
ब्राह्मण असून सेवा कुष्ठरोग्यांची
गरिबांना वाटप पाठ्यपुस्तकांचे
जाण तामिळ हिंदी इंग्रजी भाषांची

प्रभावित नारीवाद,गांधीवादाने
जीवनसाथी संजीत रॉय झाले 
पादाक्रांत केली विविध शिखरे
अरुणा नांव जगासमोर आले 

ग्रामीण विकासाचा रचला पाया
गेले सामोरे धैर्याने संकटांच्या
सौर ऊर्जा गरज पाण्याची 
सोय केली मान गावकऱ्यांचा 

माध्यम बेअरफूट कॉलेजमचे
भागवल्या गरजा गरजवंताच्या
रेमन मॅगसेसे व लाल बहादूर पुरस्कार 
पुरस्कार साथीला विचारवंतांच्या 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागवे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Monday, 7 October 2024

चारोळी


  विषय : मुरली मनोहर
  दिनांक :  ७/१०/२४

गोपिकांचा कान्हा मुरली मनोहर 
वाजवी बासरी हरपते भान
राधा झाली वेडी प्रीत ज्वराने 
कृष्ण सखा माठ फोडी बेभान 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

कविता वसंती देवी


शिर्षक.  वसंती देवी

पर्यावरणवादी ओळख मातेची
लक्ष्मी आश्रम कौसानी जन्मस्थान 
आश्रयास ती तिथेच रमली
 वृक्षाप्रती मनी सन्मान 

बालविधवा जरी जाहली
निकराने पुर्ण शिक्षण केले
जंगल जमीन सुसंबध ठसविला 
कोसी नदीसाठी आंदोलन केले

वनसंपत्तीचे महत्त्व जनमानसात
पटू लागले सहकार्य वसंती देवीना
जैवविविधता दिसून आली 
निवड योग्य नारीशक्ती सन्माना

चित्तरंजन दास पती सेनानी
असहकार आंदोलन सहभागी 
देशहितासाठी लढण्या तयार
तुरुंगवास हिमतीने भोगी

नमन तयाला हे वृक्षमाता
राष्ट्रकार्याला वाहिले जीवन 
देह ठेवला या भुमीवर अंती
सदैव येईल आपली आठवण

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Sunday, 6 October 2024

कविता भगिनी निवेदिता

 - भगिनी निवेदिता

शिर्षक - विदुषी निवेदिता

मानस कन्या विवेकानंदांची
भगिनी निवेदिता नांव विदुषिचे
स्त्री शिक्षणाची आस मनाला 
साहिले दु:ख,यातना अमानुषीचे

बाळकडू देशप्रेमाचे घरातूनच
धर्मोपदेशन तात,आजोबांनी द्यावे 
नवप्रयोग शिक्षणाचा शोधीला
हसतखेळत बालशिक्षण घ्यावे 

प्रगती शिक्षणातील ध्यास असे
विवेकानंदांचे विचार मनी ठसे
प्रभावीत भाषणे ऐकून मग्न
तत्ववादाने मनोविकास वसे

भगिनी संबोधन सद्दगुरुंनी दिले
समर्पण ईश्वर कार्याला मनाने
घडवून चारित्र्य मानवामध्ये 
साथ दिली कार्याला मनाने

ग्रहण चालीरीती हिंदू धर्माच्या
साधना अवघड लिलया पेलली 
महत्प्रयासाने,मनोभावे सहजी
हिंदूस्थान कार्यक्षेत्र सहजी बनली

कार्य सामाजिक, राजकीय केले
स्वदेशीचा प्रसार घरोघरी केला
एकरुप भारतीय संस्कृतीत
अंती समाधानाने देह त्यागला

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर

Saturday, 5 October 2024

कविता रमाबाई रानडे



    शिर्षक
स्त्री उद्धारक रमाबाई 

स्त्री उद्धारक , समाजसुधारक 
रमाबाई रानडे म्हणती तयाला 
चळवळ समान अधिकाराची
स्त्री मुक्तीसाठी तयार लढायला

पती महादेव नवविचारांचे
शिक्षित केले सहचारिणीला 
पत्करला विरोध समाजाचा 
साथ सामाजिक चळवळीला

व्यस्त आयुष्य समाजसुधारण्या
फोडली वाचा स्त्री मुक्तीसाठी 
हुजुरपागा जागा स्त्री शिक्षणाची
अर्पण जीवन देशसेवेसाठी 

भेट मनोरुग्णांची घेतली
बालसुधारगृही मन रमले
मतपरिवर्तन स्त्री कैद्यांचे
समवेत सण साजरे केले

छेदून सीमा भौगोलिक 
सर्वत्र पोहचली करण्या सेवा
केंद्र प्रशिक्षणाचे उदया आले
वाटे कार्याचा सर्वास हेवा

आधारस्तंभ सदा विधवांच्या 
गौरवार्थ पोस्ट तिकीट निर्मिले
वसा समाजसुधारणेचा हाती
त्यांना मी मानाने वंदिले 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड

Thursday, 3 October 2024

कविता फातिमा शेख

काळ घोर निराशाजनक 
न स्वातंत्र्य स्त्री जातीला 
शिक्षणाची तर बातच सोडा
ना महत्त्व तिच्या विचाराला

जन्म मुस्लिम घराण्यातील 
मोठेपणा मनाचा आचारातून
साथ लाभली घरातून छान 
ज्ञानगंगा वाहिली विचारातून 

सावित्री मातेचे कार्य महान 
भेट घडली प्रशिक्षण स्थळी
जमली गट्टी घेतला वसा
शिक्षणासाठी सज्ज जोडगोळी

बहिष्कृत ज्योतिबा सावित्री 
ज्ञानार्जनाचे समाजाविरुद्ध काम
दिला आसरा ती थोर फातिमा 
मदतीसाठी सदैव तयार विना दाम

प्रसिद्धीपरान्मुख फातिमा शेख 
दखल गुगलची डुडलद्वारे खास
समाजातील दलितांसाठी श्रमली 
सदैव स्त्री शिक्षणाची आस

प्रथम स्त्री शिक्षिका मुस्लिम 
सामोरी समाजरोषाला धैर्याने 
महान, अलौकिकेतेचे उदाहरण 
अविस्मरणीय तिच्या शौर्याने 

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Monday, 5 August 2024

चित्र चारोळी


विषय :चित्र चारोळी

अलंकृत माता बसली स्तनपाना
वात्सल्याचे हास्य वदनी विलसते
बालसुलभ चाळ्यांसह दुग्ध प्राशन
वसने,स्वर्ग अप्सरा धरेवर भासते

रचना 
श्रीमती माणिक नागावे 
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Sunday, 7 July 2024

२१ व्या शतकातील स्त्री

21 व्या शतकातील स्त्री

घे तुझ्या कर्तुत्वाची भरारी
अष्टपैलू तू दुर्गाभारी
सरस्वतीच्या आशीर्वादाने
पावले लक्ष्मीची आली दारी

हे सुवचन सार्थ करणारी आजची स्त्री आज सर्वत्र सर्व क्षेत्रात दैदिप्यमान यश शिखर गाठत असताना आपल्याला दिसत आहे. आपल्या सहनशीलता आणि सोशिकता या गुणांच्या आधारावर ती येणाऱ्या सर्व संघर्षावर सर्व समस्यावर उपाय शोधत आगेकूच करत आहे.आजचे यशाचे बोर्ड सर्वत्र आपण पाहतो त्यामध्ये मुलांच्या पेक्षा मुलींच्या फोटोंचे दर्शन जास्त घडते. टक्केवारी मध्ये सुद्धा मुलीच पुढे दिसतात. याचा अर्थ आपण काय घ्यायचा? काय मुले अभ्यास करत नाहीत ? अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत ? का त्यांना कशाचीच भीती नाही? शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करत असताना हा फरक मला नेहमी दिसून येतो. शिकवत असताना तर आम्ही सर्वांना सारखेच शिकवत असतो पण मुलांचे शिकण्याकडे लक्ष कमी व दंगा करण्याकडे लक्ष जास्त असते. पण हल्ली मुलींचेही दंगा करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. तरीही त्यांची अभ्यासातील गुणवत्ता ही टिकून आहे. यावरूनच स्त्री किती चतुरस्त्र आहे हे दिसून येते.

21 व्या शतकातील स्त्री ही लक्ष्मी, सरस्वती व दुर्गा या सर्वांचे रूप धारण करत समाजात वावरत असताना दिसते. आदिकालापासून आत्ताच्या विज्ञान युगापर्यंत स्त्री शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच गेले आहे व त्याचा उपयोग स्त्रीने पुरेपूर करून घेतलेला आहे. ज्ञानसागरातील विचार मोत्यांचा वापर करून आजची लक्ष्मी अर्थार्जनासाठी बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यापासून संध्याकाळी परत घरात येईपर्यंत तिला अनेक संघर्षाला सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्श,विचित्र व अर्थपूर्ण नजरांचा सामना करत तिला आपल्या कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत नाकी नऊ येतात. हा अनुभव निम्म्या स्त्री जातीला तर येतोच. आजच्या वाढत्या महागाईमुळे घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही काम करत असतील तर घरातील सर्व लोकांच्या गरजा,मुलांचे शिक्षण हे सहजी पूर्ण होते अन्यथा आर्थिक ओढाताण निर्माण होते. त्यासाठी तिला नोकरी ही करावीच लागते. नोकरी करत असतानाच बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळत, घरच्या जबाबदाऱ्यांच्या बरोबर मुलांची, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही तिच्यावरच येते. आपल्या मुलांची जडणघडण चांगल्या दृष्टीने व्हावी यासाठी स्त्री अथक  प्रयत्न करत असते. पण तिच्या या कष्टाची जाणीव किती जणांना असते? हल्ली सुशिक्षितता व सुधारणा झाल्यामुळे बऱ्याच कुटुंबामध्ये स्त्रीला मानाचे स्थान मिळत आहे. पण हे बोटावर मोजण्यापुरतेच आहे.

आज कित्येक घरकाम करणाऱ्या मजदूर महिला कष्टाची कामे करत असतात व स्वतःचे घर चालवत असतात. त्यांच्या घरी त्यांचा नवरा आरामात बसून बायकोचे पैसे खर्च करत असतो. तिला पैसे नाही दिले तर मारहाण करतो व जबरदस्तीने तिच्याकडून पैसे काढून घेतो असे चित्रही आपल्याला दिसून येते. पण अन्याय ,अत्याचार सहन करण्यालाही सीमा असते प्रसंगी हा त्रास सहन न होऊन शेवटी स्त्री  दुर्गा,काली चे रूप धारण करते व स्वयं शासनाने तिच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करते. स्त्रियांच्या साठी अनेक कायदेही आहेत पण त्याचा उपयोग प्रत्येक स्त्रीने योग्य रीतीने केला पाहिजे.

एवढे असून सुद्धा आज समाजामधली परिस्थिती पाहता संस्कारात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत का असे वाटत आहे कारण अनेक तरुण मुली वाईट मार्गाला लागत आहेत तर काही आपल्या आई-वडिलांना सोडून नुकताच ओळख झालेल्या मुलाबरोबर पळून जात आहेत. त्यांना आपल्या आई वडिलांच्या मानसन्मानाबद्दल  कुठल्याही प्रकारची भावना मनामध्ये येत नाही. तसेच अनेक स्त्रियांच्या बद्दल आपण वर्तमानपत्रकामध्ये बातम्या वाचत असतो की आपल्या लहान मुलांना सोडून आपल्या प्रियकराबरोबर त्या पळून गेलेल्या आहेत. अशी कशी परिस्थिती बदलत गेली ? हा एक मोठा प्रश्नच आहे. माझ्या मते असे होणे हे अत्यंत चुकीचे आहे,लाजिरवाणे आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीने मनापासून याचा विचार करून योग्य रीतीने राहिले पाहिजे तरच आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार होतील.परवाच सोशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला.त्यामध्ये नशेत चूर असणाऱ्या मुली पाहिल्या व मनात चर्र झाले.कुठे चाललाय आपला समाज? 

हे सर्व कुठेतरी थांबले पाहिजे.यासाठी सर्वांनी एकमेकांना दोष देण्याऐवजी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.आपल्या लाडक्या मुला-मुलींचे फालतू लाड न करता प्रसंगी कठोर झाले पाहिजे.आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणे सोडले पाहिजे.नाहीतर येणारा भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही.गेलेली वेळ परत येणार नाही.तेंव्हा सर्वांनी वेळीच सावध व्हावे. २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या पाल्याला खासकरून मुलींना सक्षम बनवा.समाजाची मानसिकता बदलायला हवी.तरच स्त्री बिनधास्त फिरु शकेल.

लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
हेरवाड हायस्कूल हेरवाड
९८८१८६२५३०

माहेर

अष्टाक्षरी
विषय- माहेर

असे सुरेख माहेर
मना फार सुखावते
आठवण हर घडी
लोचनात ओलावते

आईबाबा पांघरूण 
दु:खावर पांघरती 
सुख पदरी घालती
माया नेहमी करती

माहेरची नातीगोती 
घट्ट मिठी ‌स्नेहधागा
साठवण आयुष्यात 
जशी शोभे चंद्रभागा 

बंधू माझा पाठीराखा 
लाज राखीची राखतो
निरांजने लोचनांची
सदा तेवत ठेवतो

माया सागर प्रेमाचा
नाही आटत कधीही 
वाहे मनात सर्वांच्या
व्यथा खूपल्या तरीही 

रचना 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड,ता.शिरोळ
जिल्हा.कोल्हापूर
९८८१८६२५३०

Monday, 26 February 2024

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०NEP

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP  )

दररोजच्या जीवनात बदल अत्यंत गरजेचा आहे.ज्याप्रमाणे साचलेले पाणी पुढे न जाता एकाच ठिकाणी साचून राहते तेंव्हा ते अस्वच्छ होते. व ते वापरण्यायोग्य रहात नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीत नवनवीन बदल होत राहिले पाहिजेत.व प्रत्येकाने ते येणारे बदल सकारात्मकतेने स्विकारलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही बदल होत आलेले आहेत व हे बदल काळाची गरज असल्यामुळे ते झालेच पाहिजेत. सध्याचा शिक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 होय.1968,1986 नंतर 34 वर्षानंतर आता 2020 ला हा बदल केलेला आहे.यामध्ये शिक्षणपद्धतीत अमुलाग्र बदल केलेला आहे. तो सहजासहजी सर्वांच्या पचनी पडणे सुरवातीला अवघड आहे.दोन वर्षापूर्वी  कोरोना महामारीच्या काळातील शिक्षणपद्धती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरु होती. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी शिक्षण चालू राहू शकते,हे अधोरेखित झाले आहे. यामध्ये सरकारने विविध योजना, शैक्षणिक आभासी केंद्रे तयार केली होती.ज्याद्वारे शिक्षण दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहचवले जात होते.
सध्याचे येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण हे एक प्रकारचे आधुनिक बदललेल्या शैक्षणिक पद्धतीचा नमुना आहे.काय आहे हे धोरण? या धोरणाचे उद्देश पुढीलप्रमाणे- १) 2030 पर्यंत शालेय शिक्षण 100% सर्वांपर्यंत पोहचवण्याचा आहे.
२) पूर्वप्राथमिक विद्यालयापासून माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व सार्वभौमिकीकरण करणे.
३) वयवर्षे 3 ते 18 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणने.
डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हे धोरण आखले गेले.याद्वारे शिक्षणक्षेत्रात महत्वपूर्ण बदल केले गेले.मोठा बदल केला गेला तो म्हणजे सर्वात प्रथम MHRD मिनीस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजेच मानव संसाधन विकास मंत्रालय हे नांव बदलून शिक्षा मंत्रालय (मिनीस्ट्रीऑफ एज्युकेशन)असे करण्यात आले.तसेच पूर्वीचा शिक्षणाचा 10 + 2 हा स्तर बदलून आता 5 + 3 + 3 + 4 असा करण्यात आला आहे. पहिला टप्पा वयवर्षे 3 पासून वयवर्षे 5 पर्यंत असणार आहे. आनंददायी शिक्षण या टप्प्यात दिले जाणार आहे. मुलांनी गाणी, गोष्टी, गप्पा या माध्यमातून शिकायचे आहे. या टप्प्यावर कोणत्याही प्रकारची परीक्षा असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तणाव येणार नाही. ती सहजपणे शिकतील.यानंतरचा दुसरा टप्पा 3 मध्ये इयत्ता 3री,4थी,5वी असा असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या टप्प्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्येच शिकता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकताना कोणतीही अडचण येणार नाही पण इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.या टप्प्यावर परीक्षेची सुरवात होणार म्हणजे परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे हळूहळू विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी होईल.पुढील टप्पा 3 मध्ये 6वी, 7वी, 8वी असा आहे. या मधल्या स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच विविध कोर्सेस शिकवले जाणार जसे की,कंप्यूटर, छोटे छोटे कोर्सेस उदा.शिलाई,जेवण बनवणे,माळीकाम इ.कोर्सेस.हे कोर्सेस विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे निवडता व शिकता येतील.त्यामुळे शिकताना विद्यार्थ्यांना आंनद मिळेल.गणित, विज्ञान, कला या विषयांबरोबरच विद्यार्थ्यांना एक भारतीय भाषाही शिकता येणार आहे. यानंतरचा टप्पा 4 .यामध्ये इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी असा स्तर असणार आहे.ही सेकंडरी स्टेज आहे.या टप्प्यावर परीक्षा पद्धती ही सेमिस्टर पद्धतीने घेतली जाणार आहे.टप्या-टप्याने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण येणार नाही.तसेच वेगवेगळे शिक्षणाचे प्रवाह नसणार तर कला,विज्ञान,वाणिज्य या तीनही शाखेतील आपल्याला आवडेल तो विषय विद्यार्थी घेऊ शकतात.त्याचबरोबर पूर्वीची पाठांतर पद्धती बंद करून वैचारिक पद्धती आणली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही परदेषी भाषा शिकता येणार आहे.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे बी.ए,बी.कॉम,बी.एस.सी. अशी असणारी डिग्री पद्धत बंद होणार व त्याऐवजी चार वर्षाचे चार शैक्षणिक वर्षाचे भाग पाडले जाणार. त्यामध्ये बारावीनंतर एक वर्ष शिक्षण पूर्ण झाले की,विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जाणार. दुसऱ्या वर्षानंतर डिप्लोमा पदवी,तिसऱ्या वर्षानंतर डीग्री प्रमाणपत्र तर चौथ्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना रिसर्च म्हणजेच संशोधन प्रमाणपत्र दिले जाणार. यामुळे फायदा असा होणार की, पूर्वी बी.ए.,बी.एस.सी.,बी.कॉम ची पदवी पूर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना कुठे नोकरी करता येत नव्हती. शिवाय शिक्षण पूर्ण नसल्याने अर्धवट शिक्षणाचा काही उपयोग होत नव्हता. पण आता एक वर्ष शिक्षण झाले तरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. व त्याआधारे तो नोकरी किंवा व्यवसाय करु शकतो.तसेच भविष्यात त्याला शिकायचे असेल तर तो पुन्हा प्रवेशित होऊन जिथून शिक्षण थांबले आहे तिथून पुढील शिक्षण घेऊ शकतो. त्यानंतर दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतो.त्याचप्रमाणे एम.फील.बंद करून पीएचडी. चे शिक्षण चार वर्षे करण्यात आले आहे.त्याचबरोबर
सर्वांना समान शिक्षण मिळण्यासाठी शालेय फी सर्वत्र एकसमान असणार आहे.जेणेकरून सर्वांना एकाच छताखाली शिक्षण घेता येणार आहे.आनंदाची गोष्ट म्हणजे प्रात्यक्षिक ज्ञानावर भर दिला जाणार आहे.कारण ऐकून व डोळ्याने पाहून घेतलेल्या शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष कृती करुन घेतलेले शिक्षण,ज्ञान हे विद्यार्थ्यांना परीपूर्ण व सक्षम बनवते.तसेच भविष्यात परदेशातील नामांकित 50 युनिव्हर्सिटी भारतात आपल्या शाखा चालू करु शकतात.त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच राहून शिक्षण घेणे शक्य होणार आहे. विविध विभागासाठी वेगवेगळ्या शाखा चालू करण्यात येतील.शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी चार वर्षांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाप्रती रुची व अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी नक्कीच होईल.मूल्यमापन पद्धतीत स्वयंमूल्यमापन व दुसऱ्या व्यक्तींच्याकडून मूल्यमापन केले जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांनासुद्धा नेहमी अपडेट रहावे लागणार आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रस्नेही बणून संगणकीय युगातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक भागवावी लागणार आहे. तरच शिक्षक या स्पर्धेत टिकून राहू शकतो.
यासाठी येणाऱ्या आव्हानात्मक काळासाठी म्हणजेच येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वतःला सिद्ध करुन सक्षम बनण्यासाठी सर्वांनी सकारात्मकता अंगी बाणवली पाहिजे.नवनवीन ज्ञानाचा उपयोग करून तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करून येणाऱ्या तंत्रस्नेही पिढीच्या प्रत्येक समस्येवर उपाय करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे.

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
मुख्याध्यापिका, हेरवाड हायस्कूल, हेरवाड
9881862530

शिरोळ तालुक्यातील साहित्यिकांची साहित्यातून समाजसेवा

शिरोळ तालुक्यातील साहित्यिकांची साहित्यातून समाजसेवा

एखाद्या देशाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्या देशातील साहित्य आपल्याला सर्व काही सांगून जाते कारण साहित्य समाजमनाचा आरसा असते.साहित्य म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात पुस्तके, त्यातील लेख,कथा,कविता, कादंबरी.यालाच वाड:मय असेही म्हणतात. साहित्य का उदयास आले? तत्कालीन समाजातील चालणाऱ्या प्रथा या काही चांगल्या तर काही वाईट,या सर्वांच्याबद्दल आपल्या मनातील विचार प्रकट करून लोकांपर्यंत ते पोहचवणे.त्यांच्या मनावर राज्य करणे.त्यांना परिस्थितीशी अवगत करणे हे या गरजेपोटी साहित्य निर्मिती झाली. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले ते सारस्वत असेही साहित्य लिहणाऱ्या साहित्यिकांना म्हटले जाते. ज्यावेळी आपण खूप वाचतो व त्यानंतर आपल्या मनात विचारांचे काहूर माजते.कींवा समाजातील अनेक घटना पाहताना, सोसताना मनाची घालमेल होते,व ती शब्दरुपाने कागदावर उतरते.ते साहित्य असते.माझ्याबाबतीत तर ते खरे आहे. कारण अशा मानसिक स्थितीतूनच माझे साहित्य तयार झाले आहे. फक्त लिखाण करुन चालत नाही. तर ते प्रकाशित करून लोकापर्यंत पोहचले पाहिजे.सर्वत्र असे प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे शिरोळ तालुक्यातील साहित्यिक साहित्य क्षेत्रात भरारी मारत आहे.

जयसिंगपूर शहर म्हटले की जेष्ठ साहित्यिका निलम माणगावे यांचे नांव घेतले जाते. गेली अनेक वर्षे त्या साहित्य सेवा करत आहेत. त्यांनी लिहलेल्या पुस्तकांचा, लेख,कवितांचा विविध विद्यापिठामार्फत अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर श्री.मोहन पाटील, बाळ बाबर,डॉ. महावीर अक्कोळे या जेष्ठ साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून कधी जहाल तर कधी मवाळ भाषेतून समाजप्रवृत्तीवर लिखाण केले आहे. जयसिंगपूर कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. राजेंद्र कुंभार यांनी शाहू महाराज, महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपल्या लेखणीतून व वाणीतून सर्वत्र केला व करत आहेत. शिरोळ तालुक्यातील साहित्य संमेलनाची जबाबदारी त्यांनी स्विकारली व आपल्या कॉलेजच्या सहाय्याने विविध शाळांमध्ये साहित्य संमेलने घेतली व तेथील विद्यार्थ्यांना साहित्य व साहित्य संमेलनाची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना लिहते करण्यासाठी त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद होता. या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील अनेक साहित्यिक एकत्र आले. एकमेकांच्या ओळखी झाल्या.

साहित्य लेखनाबरोबर साहित्य प्रकाशन क्षेत्रातही शिरोळ तालुका मागे नाही.कवितासागर प्रकाशन व प्रकाशक श्री. सुनील पाटील हे नाव साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना माहीत नाही असे नाही, कारण डॉ. सुनील पाटील यांच्या रोमारोमात साहित्य आहे. त्यांनी माझ्यासह अनेक साहित्यिकांनी प्रकाशात आणले. त्यांचे घर हे मोठे पुस्तकालयच आहे. घराच्या भिंती न दिसता सर्वत्र पुस्तकेच पुस्तके दिसतात.त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सध्या त्यांच्या नावाची चर्चा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी झाली आहे ही अभिमानाची बाब आहे.गझल क्षेत्रातही शिरोळ तालुका मागे नाही. कुरुंदवाडचे धन्वंतरी डॉ. दिलीप कुलकर्णी, जयसिंगपूर कॉलेजच्या प्राध्यापिका प्रा सुनंदा शेळके यांच्या गझला वाचनीय व संदेश देणाऱ्या असतात.डॉ. कुलकर्णी हे  पेशाने डॉक्टर असूनदेखील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत,त्याचबरोबर त्यांना अनेक साहित्यिक पुरस्कार मिळाले आहेत. मुक्तेश्वर प्रतिष्ठाणच्या माध्यमातून ते वाचन चळवळीला प्रेरणा देतात व विविध साहित्यिकांचा कार्यक्रम आयोजित करून समाजमनावर योग्य विचारांचा ठसा उमटवतात.कुरुंदवाड येथील दिलीप सुतार, श्री. सच्चिदानंद आवटी, साहिल शेख यांनी आपल्या लेखणीतून समाजातील प्रश्नावर आवाज उठवला आहे.साहिल शेख आपल्या बंडखोर अशा विशिष्ट लेखणीतून आपले विचार मांडतो आहे.  श्री.मनोहर भोसले गुरुदत्त कारखान्यात लाईनमन म्हणून कार्यरत असताना साहित्य क्षेत्रात घोडदौड करत आहेत.त्यांनी केलेल्या लिखानाला पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जाताजाता रोजच्या घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचे लिखाण असते.आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सौ.मनिषा वराळे यांनी आपल्या लिखानातून स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. आरोग्य सेविकेचे काम करत त्यांची साहित्य सेवा अविरतपणे चालू आहे.ज्योतिष शास्त्रातही श्री ब्रम्हविलास पाटील यांनी भरपूर लेखन केले आहे. रिटायर्ड शिक्षक श्री. प्रविण वैद्य यांनी वैचारिक लेख प्रसिद्ध केले आहेत. धार्मिक लेखणातही शिरोळ तालुक्यातील साहित्यिक कमी नाहीत यामध्ये प्रामुख्याने धर्मानुरागी श्री विजय आवटी, विजय बेळंकी सर यांचे नांव येते.प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील डॉ. ज्युबेदा तांबोळी यांनी आपल्या लेखणीतून समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. लेखणीला वयाची मर्यादा नसते हे त्यांनी दाखवून दिले आहे. गृहीणीचे काम करत असताना सुद्धा आपल्या लेखणीतून आपले विचार व्यक्त केले जाऊ शकतात.हे लेखिका मेघा उळागड्डे यांनी दाखवून दिले आहे.डॉ. राजश्री पाटील या आपला दवाखाना सांभाळत येणाऱ्या आजारी व्यक्तींच्यावर उपचार करत असताना येणारे अनुभव आपल्या साहित्यातून मांडले आहेत.त्यांच्या पुस्तकांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.चिपरी सारख्या खेडेगावातील नीवृत्त शिक्षक श्री.रामगोंड पाटील यांनीही रोजच्या जीवनावर व अध्यात्मिक विषयावर लेखन केले आहे.

शिरोळ तालुक्यातील जवळपास सर्वच क्षेत्रातील साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या जोरावर समाजातील लोकांचे आपल्या लेखणीतून समाजातील लोकांचे उद्बोधन केले आहे.चांगले लेखक समाजातील विविध प्रकारच्या परिस्थितींचे ,समस्यांचे,चांगल्या वाईट प्रसंगाचे आपापल्या कल्पनेनुसार ते प्रसंगांचे शब्दांकन करतात. कोणतेही पुस्तक कींवा लेखन असू दे त्यामध्ये समाजाचे प्रतिबिंब असते."जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हटले जाते ते यामुळेच.साहित्त्यिकांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या साहित्यात कल्पनेचा वापर जरूर करावा पण त्या साहित्यातून वाचकांना एक चांगला संदेश दिला पाहिजे. पुस्तके मानवाचे चांगले मित्र आहेत असे म्हणतात ते यासाठीच.समाजाला भरकटवणारे, अनितीकडे नेणारे गलिच्छ लेखन कधीच करु नये.तसा वाचकवर्ग थोडा जरी असला तरी.तशाप्रकारचे लेखन शिरोळ तालुक्यात  माझ्या नजरेत आतापर्यंत तरी आले नाही.हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या शिरोळ तालुक्यातील सर्व साहित्यिक शब्दांच्या माणिक-मोत्यांच्या आधारे जनमानसात संस्काराचे लेणे लिलया देण्यासाठी सदैव तत्पर आहेत.

लेखिका
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
मुख्याध्यापिका
हेरवाड हायस्कूल, हेरवाड
9881862530