Monday, 22 March 2021

कविता( वनवास )

उपक्रम

विषय - चित्रकाव्य

शिर्षक-- वनवास

जागतिक महामारी काय आली
सारे जीवनच कोलमडून गेले
बंद वाटा,बंद दारे,बंद गावोगावी
पोटापाण्याचे हाल झाले.

उदरभरणासाठी आगतिक मानव
चहुदिशांना असहाय्यपणे पांगला.
पाय अनवाणी, दिशाहीन भटके
कुठे,गांव,कुठे घर नी कुठे बंगला? 

संसार डोईवरती लादुनी 
बायका पोरे फरफटत नेई
रक्ताळले पाय, निघाली पोपडे
दिशाहीन तारु कुठे जाई? 

स्वकीयच झाले परके येथे
दुरदेशीचे सदन हाक घालते
नको बघणे वळुनी मागे 
रक्ताळलेली वाटच हात देते

तमा न मजला पोळलेल्या पायांची
चालून चालून थकले कीती ते
कठीण कातडी तरी सोलवली
अंतरंग लालसर वेदना देते

वनवास भयंकर पदरीं आला
लहानगीला का बरे शिक्षा? 
काय गुन्हा अर्धांगिनेने केला ?
कोण करणार याची समिक्षा? 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( खाऊचे झाड )

कविता
खाऊचे झाड

चला चला जाऊ सारे
पहायला झाड खाऊचे 
सारी लागली पळायला 
वाटेत घर छान माऊचे

म्याऊ म्याऊ कुठे चाललात
तोंड पुसत मनीमाऊ बोलली
खाऊचे झाड ऐकताच तीपण  
साऱ्यांच्या मागे पळू लागली

पाहून झाड हरकली सारे 
मुलं उड्या मारु लागली 
खाऊच खाऊ झाडावर 
खुळ्यासारखी सारे वागली

चॉकलेट,गोळ्या, बिस्किटे
मिठाई गोड गोड आवडीची
पानापानावर फुलले फुलबाजे
भाजी पानांची नावडीची

पोटभर खाऊन झाले
ढेकर देऊन हसू लागले
शहाणपणाच कामाला आला
एकमेकांशी प्रेमाने वागू लागले

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( तुळशी वृंदावन )

चारोळी
तुळशी वृंदावन
 
लिंपून छान तुळशी वृंदावन
पहाट प्रहरी पाणी घालती
मनोभावे नमन शांतचित्ताने
सूवासिनी फेऱ्या मारती 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( काटकसर )

उपक्रम

चारोळी

काटकसर

साठा जलाचा संपत चाललाय
गरज काटकसरीने वापरायची
रोखून प्रदूषण, ठेवून स्वच्छता
निसर्गरक्षा आहे अंगीकारायची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 18 March 2021

चारोळी (आरंभ )

चारोळी

आरंभ

आरंभ चारोळीने आज केला
समुहात प्रवेश केल्यानंतर 
उपक्रमाच्या हिंदोळ्यावर 
शब्दांची सुमने झाल्यावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 4 March 2021

अष्टाक्षरी ( मायबाप )

उपक्रम

अष्टाक्षरी

मायबाप

असतात नेहमीच
 हृदयात माता पिता
मुलांच्याच आनंदात
नाही होत कधी रिता

सकलांना दे आधार
मानस्तंभ घरातील
आज्ञा त्यांच्या मानाव्यात
मनातून फुलतील

प्रेरणाच देती सदा
आपल्याच लेकरांना
यशोगाथा लिहण्यास
प्रोत्साहन पाखरांना

मायबाप छायावृक्ष
सदा उभे शिरावर 
जसा देतो सावलीच
वट गोल पारावर

बोल अनुभवी देती
 संकटात सावरती
लक्ष देऊन ऐकावे
सुखी क्षण जागवती

लेक लाडकी लाडाची
पाठवणी करतात
रडताना डोळ्यांनाच
उगीचच पुसतात

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

षडाक्षरी( दूर पायवाट )

उपक्रम

दूर पायवाट


मज आठवते
सदा सर्वकाळ
दूर पायवाट
गावाचा तो माळ

गावरान दृश्य
मोहवते मना
नागमोडी वाट
दिसे सर्व जना

खडकाळ रस्ता
डांबराची आस 
सरकारी गोष्टी
होतो फक्त भास

मातीने भरली
म्हणती फुफाटा
चालताना पायी
रुते रुक्ष काटा

तरीही आवडे
पायवाट फार
आठवते सदा
मायेचा आधार

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

चारोळी (म्हातारपण )

चित्रचारोळी

संपत चालली वेळ म्हातारपणी
समय मापदंड भरला तरुणपणी
वर्तमानाचा धरून हात दाखवतो
शिदोरी अनुभवाची चरणोचरणी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता(प्राण्यांची शाळा )

स्पर्धेसाठी

कविता

विषय-प्राण्यांची शाळा

शिर्षक- जंगलातील शाळा

चला चला पाहू या सारे,
आनंदाने प्राण्यांची शाळा.
भेटायला आली सगळे ,
पडती एकमेकांच्या गळा.

सिंह आला गुरुजी बनून,
ओळीत बसून घ्या बरे.
ससा,माकड,वाघ अन् कोल्हा,
आंघोळीसाठी शेजारी झरे.

हरण आले उड्या मारत,
हत्ती आला झुलत झुलत.
झेब्र्याची तर उंचच मान,
अस्वल आले डुलत डुलत.

गमभन ,बाराखडी काढली,
नाही काढली तर हातावर छडी.
माकडांनी कवायत केली.
वरुन मारली खाली उडी.

गाणी गप्पा गोष्टी झाल्या,
शाळा सुटायची वेळ झाली.
घणघण घंटा वाजली जोरात,
सारी प्राणीमुले पळत गेली.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

षडाक्षरी(पळस फुलला )

उपक्रम

षडाक्षरी

विषय-पळस फुलला

वसंत ऋतूत
पळस फुलला
गडद केशरी
लाल रंग आला

औषधी गुणांचा
आयुर्वेदातील
समुह पानांचा
तीन दिसतील

रुंद जाड पर्ण
पत्रावळीसाठी
बिया फार कडू
रोग जाण्यासाठी

पळस पापडी
संस्कृत पलाश
थबके प्रवासी
थकवा खलास

भुरळ पडते
अनोख्या रंगांची
विस्तवासारखे
शांतता डोळ्यांची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी( स्वाभिमानी माता )

राज्यस्तरीय अष्टाक्षरी चारोळी स्पर्धेसाठी

शिर्षक- स्वाभिमानी माता

स्वाभिमानी असे माता
बाळ घेई अंगावर
डोईवर खलबत्ते
लक्ष तिचे ध्येयावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (वसंत ऋतू )

साप्ताहिक लेखन स्पर्धेसाठी

विषय- वसंतोत्सव करू साजरा

काव्यप्रकार- दशाक्षरी

शिर्षक- वसंत ऋतू

आला ऋतू वसंत हा आला.
वर्षावत सुंदर फुलांना.
सोनपिवळी पालवी आली,
हलकेच निष्पर्ण झाडांना.

बरसात रंगाची न्यारीच,
रंगीबेरंगी सुमने भारी.
सुगंधित आसमंत वाटे,
तन सहजच दु:खहारी.

सजली धरा हिरवाईने,
सर्वां भासे नववधूसम.
भास्कराच्या भेटीने लाजली,
आहे तिचाच तो प्रियतम.

आम्रतरूवर  बोले मैना,
मंजूळ ताल भुलवी मना.
चैत्राचे चैतन्य बहरले,
चराचर मोदे घेई ताना.

लोचनी सौंदर्य प्रसवले,
कलिकांची पुष्पे फुलारली.
वातावरणी मोद पसरे,
अवनी सारी धुंदच झाली.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर