Wednesday, 4 November 2020

लेख ( महिमा वर्षाऋतुचा )

विषय - महिमा वर्षाऋतुचा

तप्त ज्वाळात काया ही करपून गेली,
  तुषारात या पर्जन्याच्या मन मोहून गेले.
गाऊ महिमा किती वर्षा ऋतूचा,
आनंदाच्या शब्दसरि या नाचू लागल्या.

खरंच यावर्षीचा उन्हाळा आपल्याला अजिबात सहन होत नव्हता. शरीराची काहिली तगमग होत होती.  उन्हाचा चटका इतका होता की घरातून बाहेर पडणे अशक्य वाटत होते. चोवीस तास पंख्याची गरज भासत होती. पण शेवटी तो कृत्रिमच ना ?  गरज होती ती पावसाची, पर्जन्याची, मनाला ,शरीराला, वातावरणाला आराम देणाऱ्या गारव्याची !!  पर्जन्याचा महिमा किती सांगितला, किती गाईला तरी तो कमीच आहे ,अपुराच वाटेल.

झाडे ,वेली ,पशुपक्षी, मानव सारे वातावरण  ऊन्हाच्या ज्वाळांनी  तगमगत होते. पावसाच्या प्रतीक्षेत  सर्वजण चिंतातुर होते. पावसाच्या आगमनाची वाट पाहत होते. नदी, नाले,विहिरी ,पाण्याचे साठे या सर्वांतील पाण्याची पातळी अतिशय खालावली होती. काही ठिकाणी तर ते कोरडे पडलेले होते. जलचरांची अवस्था तर अतिशय वाईट झालेली होती. काही भागात प्यायलाही पाणी नव्हते. जिथे माणसाला प्यायला पाणी नाही तिथे जनावरांची काय कथा ?  वनस्पती कोमेजू लागल्या होत्या. सर्वत्र निराशेचे वातावरण झाले होते. आणि या सर्वांची मनीषा, प्रार्थना फळास आली. सर्वत्र आनंदाचे ,हर्षाचे वातावरण झाले

अचानक आकाशात ढग जमू लागले, विजा चमकू लागल्या. वातावरणात अंधार दाटू लागला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. चराचर झोपेतून जागे झाल्यासारखे वाटू लागले. एक गोड शिरशिरी शरीरात पसरली. निराशेची जागा आशेने घेतली. हळूहळू पावसाला सुरुवात झाली. जलधारा पृथ्वीकडे वेगाने धावू लागल्या. धरणीमातेने आपले दोन्ही हात पसरून त्यांना आपल्या कवेत येण्याचे निमंत्रण दिले. आकाशातील जलधारा व धरणीमाता यांची गळाभेट झाली. आहाहा !!!  काय ते दृश्य सुंदर होते !!!  मातीचा सुंदर सुवास सगळीकडे पसरला होता. सारा आसमंत अल्हादित झाला.पावसाचा कण आणि कण धरणीमाता आपल्यात सामावून घेऊ लागली. वनस्पतींनी पर्जन्यवृष्टी झेलण्याकरता आपले दोन्ही हात पसरले. ते आनंदाने डोलू लागले. लहान मुले पावसात भिजण्यासाठी घरातून बाहेर आली व गाणे म्हणत पावसात भिजू लागली. त्या निरागस चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडत होते. शेतकरी राजा इतका खुश झाला की जणू त्याला त्याच्या पोटच्या मुलाचे प्राण परत आल्या सारखा आनंद वाटत होता. काही दिवसांपूर्वीची भेगाळलेली , पाण्यासाठी आ वासून पडलेली जमीन त्याला आठवली व आत्ताची पाण्याने तृप्त झालेली जमीन जेव्हा त्याने पाहिली तेव्हा खरंच त्या समाधानाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. त्याच्या डोळ्यात आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू आले. त्या अश्रूंची किंमत मोत्या पेक्षा जास्त होती. नदी-नाले पाण्याने भरून वाहू लागले. तगमग, तडफड जाऊन समाधानाची लकेर सर्वत्र पसरली. सर्वत्र आनंदाचे चित्र दिसू लागले. वर्षा ऋतु चा महिमा किती आनंदी आहे ,किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना पटले.  पावसाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे. जल म्हणजे जीवन हे सर्वांना पटले. पाऊस जर झाला नसता तर काय झाले असते?  या विचारानेच थरकाप उडला ! पाऊस न पडण्याच्या पाठीमागची कारणमिमांसा  पाहायला गेले तर  यालाही  मानवच कारणीभूत आहे हे लक्षात आले. स्वतःच्या स्वार्थासाठी, उद्योगधंद्यासाठी, शहरीकरणांसाठी, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मानवाने बेसुमार झाडांची कत्तल केली. जंगले नष्ट केली.हिरव्यागार जंगलांच्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी केली. याचा वाईट  परिणाम झाला. झाडे तोडल्यामुळे जमिनीची धूप थांबली. पावसाने हात आखडता घेतला. याचा वाईट परिणाम मानवा बरोबर निसर्गालाही भोगावा लागला.  यासाठी सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी, वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. झाडे लावूया ,झाडांचे संवर्धन करूया. महिमा वर्षाऋतूचा जाणून घेऊया.

झाडे लावू झाडे जगवू घोष हा न्यारा,
जलधारांनी भरलेला मेघ आम्हा प्यारा.
जाणून महिमा पर्जन्याचा हे मानवा,
पर्यावरण रक्षणाची कास तुम्ही धरा.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

No comments:

Post a Comment