Wednesday, 4 November 2020

कविता ( ताटवा फुलांचा )

उपक्रम
अष्टाक्षरी
विषय- पाहू चला फुलबाग

शिर्षक- ताटवा फुलांचा

नजरेला सुखावतो 
मस्त ताटवा फुलांचा
हर्ष होतो मनोमनी
मोद वाटे सकलांना 

मोहवते नयनांना 
सुंदरता सुमनांची
विविधता आकाराची
सुंदरशा प्रकारांची

फुलपाखरांची शाळा
फुलाफुलांवर  भरे
भिरभिरताना दिसे
आनंदाचा झरा झरे

कोमलता पाकळ्यांची
स्पर्शताना जाणवते
सुगंधाने तनमन
पुलकित धुंद  होते

नाना रंगी नाना ढंगी
बाग कुसुमांनी फुले
पुष्प दिसे भ्रमराला 
मधु संतोषे प्राशिले

आबालवृद्धांना मिळे
बागेमध्ये विसावून
जीवनात सुखशांती
जाती सारे हसवून

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment