Saturday, 28 November 2020

हायकू (वढाळ मन )

हायकू
वढाळ मन

वढाळ मन
वाऱ्यासवे धावते
कवने गाते

अधीर होते
गुणगुणत जाते
आनंद देते

व्याख्या मनाची
नाही कुणा कळाली
शर्थच झाली

नाही स्थिरता
वेगवान पळते
सदा जळते

मिळे कौतुक
हुरळून हे जाते
सुखच देते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 23 November 2020

चारोळी ( उगवतीचा सूर्य )

चारोळी

विषय- उगवतीचा सूर्य

जीवनातील नवनिर्मितीचा संदेश
देतो सूर्य उगवतीचा प्रकटून आकाशी
प्राचीवरी लाल केसरी आभा पसरे
रुप निखरे असा तो स्वयंप्रकाशी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 22 November 2020

हायकू (सदाफुली )

हायकू

सदाफुली

सुंदर दिसे
सदाफुली हसरी
मन बावरी

विविध रंगी
दिसते फुललेली
मना भावली

औषधी गुण
उपयोगी सर्वांना
सर्व लोकांना

जांभळा रंग
शितलता प्रकटे 
प्रसन्न वाटे

पांढरे फुल
मधुमेहींना देती
सहज खाती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Friday, 20 November 2020

चारोळी ( असेच होते बालपण )

चारोळी (पसारा)

पसारा

सावरण्यात पसारा जीवनाचा
अनुभवाचा डोलारा आला कामी
कधी डळमळला,कधी स्थीरावला 
सहनशीलता होती युक्ती नामी

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

Thursday, 19 November 2020

कविता (दिवाळीचा फराळ )

काव्यस्पंदनी दीपोत्सव 2020
स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - दिवाळी फराळ

शिर्षक - दीपावली

                1

आली आली दीपावली
 दिवाळी फराळ करु चला
विविध प्रकारांनी सजले ताट 
ताव यथेच्छ मारु या चला 

               2

लाडू,चिवडा, चकली,करंज्या
खुसखुशीत शंकरपाळे गोड
दिवाळी फराळाची लज्जत न्यारी 
अनारशाची अनोखी जोड 

              3 

स्नेहभावाची नाती कळती 
सुखदुःख वाटून घेती 
तसाच वाटू दिवाळीचा फराळ 
गरजवंत आवडीने खाती

               4 

पर्व दीपोत्सवाचा सुंदर
लखलखाट सर्वत्र दिसे 
दिवाळीच्या फराळांनी 
समाधान मनी वसे 

            5 

नवनवीन वसने लेवून अंगी 
दिवाळीत फराळ आस्वादती 
येणाऱ्या थंडीपासून संरक्षण 
स्निग्धांश सहजच करती 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रहायकू (संध्या समय )

चित्रहायकू

संध्या समय

संध्या समय
मोहवतो मनाला
आनंद झाला

केसरी नभ
प्रभावळ पसरे
मन हसरे

पक्षी दिसती
विहरती आकाशी
छानच नक्षी 

सुर्य बिंबची
किरणे विखुरली
पसरे लाली

धीरगंभीर
रत्नाकर दिसतो
एकरुपतो 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी (जबाबदारी )

चारोळी

जबाबदारी

बाबाचे पितृऋण नाही फिटायचे
जबाबदारी त्याची कुणा न कळली 
निशब्द, निश्चल बजावतो कर्तव्य 
वंदण्यास दोन्ही करे पहा जुळली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 18 November 2020

चारोळी (प्रवास )

चारोळी

प्रवास

झाला प्रवास अपेक्षेप्रमाणे
धोरणात्मक विचार घेऊन
नियोजनबद्ध प्रयत्नातून 
संयमाचे लेणे लेऊन 

रचना
श्रीमती माणिक नागावे

Tuesday, 17 November 2020

हायकू (वनौषधी )

काव्यस्पंदन राज्यस्तरीय समुह आयोजित स्पर्धेसाठी

बालगीत

विषय- आली दिवाळी

शिर्षक- सण आनंदाचा 

सण आनंदाचा साजरा करु या
मिळून सारेजण गाणी गाऊया
 ।।धृ।।

दारी प्रकाशल्या पणत्या तेजाने
सजली रांगोळी अंगणी रंगाने 
झाली वेळ आता फटाके फोडूया 
।।१।।

अंगावर घालू नवीन कपडे 
डबे फराळाचे करुनी उघडे 
मित्रांच्या संगती या फस्त करुया 
।।२।।

नाचू बागडूया उड्याही मारुया 
गोलगोल फिरु फेरही धरुया 
मनामध्ये आता प्रेमच पेरुया 
।।३ ।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

बालगीत (सण आनंदाचा )

काव्यस्पंदन राज्यस्तरीय समुह आयोजित स्पर्धेसाठी

बालगीत

विषय- आली दिवाळी

शिर्षक- सण आनंदाचा 

सण आनंदाचा साजरा करु या
मिळून सारेजण गाणी गाऊया
 ।।धृ।।

दारी प्रकाशल्या पणत्या तेजाने
सजली रांगोळी अंगणी रंगाने 
झाली वेळ आता फटाके फोडूया 
।।१।।

अंगावर घालू नवीन कपडे 
डबे फराळाचे करुनी उघडे 
मित्रांच्या संगती या फस्त करुया 
।।२।।

नाचू बागडूया उड्याही मारुया 
गोलगोल फिरु फेरही धरुया 
मनामध्ये आता प्रेमच पेरुया 
।।३ ।।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 13 November 2020

काव्यांजली (दिवाळी )

स्पर्धेसाठी

काव्यांजली

विषय-सण आनंदाचा

शिर्षक- दिवाळी

सण आनंदाचा
दिवाळी साजरी करण्याचा
सुख समृद्धीचा
दिपोत्सव

वसुवारस साजरा
केला प्रथम दिनी 
गोवत्स पुजूनी 
आनंदाने

धन त्रयोदशीला
पूजा धन धान्याची 
करु सोन्याची 
स्नेहभावे

आली लक्ष्मीमाता 
दारी आरास करु 
सन्मार्ग धरु
कायमच

मुहूर्त पाडव्याचा 
नववर्षाची सुरवात छान
जेष्ठांना मान 

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर

Tuesday, 10 November 2020

चारोळी ( सहज )

चारोळी
सहज

सहजच पाहिले त्याने तिच्याकडे 
नजरेची भाषा नकळत कळली 
पुढे जाता जाता सहेतूकपणे 
मान तीची मागे हळुवार वळली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर

Monday, 9 November 2020

चारोळी( बहाणा )

उपक्रम
चारोळी

विषय- दिनचर्या

प्रात:काळी सुरु दिनचर्या झाली
नियोजन दिवसभरातील छान
उरक कामाचा मनी समाधान 
सहजच मिळाला सर्वांचा मान 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी(दिनचर्या )

उपक्रम
चारोळी

विषय- दिनचर्या

प्रात:काळी सुरु दिनचर्या झाली
नियोजन दिवसभरातील छान
उरक कामाचा मनी समाधान 
सहजच मिळाला सर्वांचा मान 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 4 November 2020

चारोळी ( योग-वियोग )

चारोळी

योग-वियोग

योग येतो तेंव्हा वियोग नसतो 
योग-वियोग लक्षणे प्राक्तनाची 
स्वकर्तृत्वाने सिद्ध करावे जीवन 
हवी जिद्द मनगटातील ताकदीची 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

लेख ( महिमा वर्षाऋतुचा )

विषय - महिमा वर्षाऋतुचा

तप्त ज्वाळात काया ही करपून गेली,
  तुषारात या पर्जन्याच्या मन मोहून गेले.
गाऊ महिमा किती वर्षा ऋतूचा,
आनंदाच्या शब्दसरि या नाचू लागल्या.

खरंच यावर्षीचा उन्हाळा आपल्याला अजिबात सहन होत नव्हता. शरीराची काहिली तगमग होत होती.  उन्हाचा चटका इतका होता की घरातून बाहेर पडणे अशक्य वाटत होते. चोवीस तास पंख्याची गरज भासत होती. पण शेवटी तो कृत्रिमच ना ?  गरज होती ती पावसाची, पर्जन्याची, मनाला ,शरीराला, वातावरणाला आराम देणाऱ्या गारव्याची !!  पर्जन्याचा महिमा किती सांगितला, किती गाईला तरी तो कमीच आहे ,अपुराच वाटेल.

झाडे ,वेली ,पशुपक्षी, मानव सारे वातावरण  ऊन्हाच्या ज्वाळांनी  तगमगत होते. पावसाच्या प्रतीक्षेत  सर्वजण चिंतातुर होते. पावसाच्या आगमनाची वाट पाहत होते. नदी, नाले,विहिरी ,पाण्याचे साठे या सर्वांतील पाण्याची पातळी अतिशय खालावली होती. काही ठिकाणी तर ते कोरडे पडलेले होते. जलचरांची अवस्था तर अतिशय वाईट झालेली होती. काही भागात प्यायलाही पाणी नव्हते. जिथे माणसाला प्यायला पाणी नाही तिथे जनावरांची काय कथा ?  वनस्पती कोमेजू लागल्या होत्या. सर्वत्र निराशेचे वातावरण झाले होते. आणि या सर्वांची मनीषा, प्रार्थना फळास आली. सर्वत्र आनंदाचे ,हर्षाचे वातावरण झाले

अचानक आकाशात ढग जमू लागले, विजा चमकू लागल्या. वातावरणात अंधार दाटू लागला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. चराचर झोपेतून जागे झाल्यासारखे वाटू लागले. एक गोड शिरशिरी शरीरात पसरली. निराशेची जागा आशेने घेतली. हळूहळू पावसाला सुरुवात झाली. जलधारा पृथ्वीकडे वेगाने धावू लागल्या. धरणीमातेने आपले दोन्ही हात पसरून त्यांना आपल्या कवेत येण्याचे निमंत्रण दिले. आकाशातील जलधारा व धरणीमाता यांची गळाभेट झाली. आहाहा !!!  काय ते दृश्य सुंदर होते !!!  मातीचा सुंदर सुवास सगळीकडे पसरला होता. सारा आसमंत अल्हादित झाला.पावसाचा कण आणि कण धरणीमाता आपल्यात सामावून घेऊ लागली. वनस्पतींनी पर्जन्यवृष्टी झेलण्याकरता आपले दोन्ही हात पसरले. ते आनंदाने डोलू लागले. लहान मुले पावसात भिजण्यासाठी घरातून बाहेर आली व गाणे म्हणत पावसात भिजू लागली. त्या निरागस चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडत होते. शेतकरी राजा इतका खुश झाला की जणू त्याला त्याच्या पोटच्या मुलाचे प्राण परत आल्या सारखा आनंद वाटत होता. काही दिवसांपूर्वीची भेगाळलेली , पाण्यासाठी आ वासून पडलेली जमीन त्याला आठवली व आत्ताची पाण्याने तृप्त झालेली जमीन जेव्हा त्याने पाहिली तेव्हा खरंच त्या समाधानाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. त्याच्या डोळ्यात आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू आले. त्या अश्रूंची किंमत मोत्या पेक्षा जास्त होती. नदी-नाले पाण्याने भरून वाहू लागले. तगमग, तडफड जाऊन समाधानाची लकेर सर्वत्र पसरली. सर्वत्र आनंदाचे चित्र दिसू लागले. वर्षा ऋतु चा महिमा किती आनंदी आहे ,किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना पटले.  पावसाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे. जल म्हणजे जीवन हे सर्वांना पटले. पाऊस जर झाला नसता तर काय झाले असते?  या विचारानेच थरकाप उडला ! पाऊस न पडण्याच्या पाठीमागची कारणमिमांसा  पाहायला गेले तर  यालाही  मानवच कारणीभूत आहे हे लक्षात आले. स्वतःच्या स्वार्थासाठी, उद्योगधंद्यासाठी, शहरीकरणांसाठी, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मानवाने बेसुमार झाडांची कत्तल केली. जंगले नष्ट केली.हिरव्यागार जंगलांच्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी केली. याचा वाईट  परिणाम झाला. झाडे तोडल्यामुळे जमिनीची धूप थांबली. पावसाने हात आखडता घेतला. याचा वाईट परिणाम मानवा बरोबर निसर्गालाही भोगावा लागला.  यासाठी सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी, वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. झाडे लावूया ,झाडांचे संवर्धन करूया. महिमा वर्षाऋतूचा जाणून घेऊया.

झाडे लावू झाडे जगवू घोष हा न्यारा,
जलधारांनी भरलेला मेघ आम्हा प्यारा.
जाणून महिमा पर्जन्याचा हे मानवा,
पर्यावरण रक्षणाची कास तुम्ही धरा.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

कविता ( ताटवा फुलांचा )

उपक्रम
अष्टाक्षरी
विषय- पाहू चला फुलबाग

शिर्षक- ताटवा फुलांचा

नजरेला सुखावतो 
मस्त ताटवा फुलांचा
हर्ष होतो मनोमनी
मोद वाटे सकलांना 

मोहवते नयनांना 
सुंदरता सुमनांची
विविधता आकाराची
सुंदरशा प्रकारांची

फुलपाखरांची शाळा
फुलाफुलांवर  भरे
भिरभिरताना दिसे
आनंदाचा झरा झरे

कोमलता पाकळ्यांची
स्पर्शताना जाणवते
सुगंधाने तनमन
पुलकित धुंद  होते

नाना रंगी नाना ढंगी
बाग कुसुमांनी फुले
पुष्प दिसे भ्रमराला 
मधु संतोषे प्राशिले

आबालवृद्धांना मिळे
बागेमध्ये विसावून
जीवनात सुखशांती
जाती सारे हसवून

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 3 November 2020

चारोळी ( धुक्याची शाल )

उपक्रम

चारोळी

धुक्याची शाल

प्राचीने पांघरली धुक्याची शाल 
पानापानावर दवबिंदूंचे पडती सडे
लोलकासम चमके सुर्यकिरणांत 
जणू वाजती शरदाचे चौघडे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (रानातील तो झरा )

उपक्रम

काव्यप्रकार-हायकू

विषय-रानातील तो झरा


सतत वाहे
रानातील तो झरा 
आनंद खरा

सुखद वाटे
खळाळणारे जल
मन प्रांजल

सुंदर क्षण
जलचर दिसती 
छान खेळती 

क्षुधा शांतीस 
प्राणीमात्र जमती
सुखाने गाती

दृश्य पाण्याचे
लोभवते लोचनी
वाहते रानी

रानावनात
झुळझुळतो छान
आहेच मान

संध्यासमयी
कीलबिल ऐकतो
निर्झर गातो 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

हायकू( झाडाच्या सावलीत )

हायकू

झाडाच्या सावलीत

मस्त आनंद
झाडाच्या सावलीत
मोद झेलीत

तृषार्थ जन
समाधान उरात
छाया दारात

गप्पा रंगती
शिण निघून जातो
उत्साह येतो

मनाला आस
सूर्यदेव तापला
संतोष झाला

करती मस्ती
सुरपारंब्या आल्या
सख्या जमल्या

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 2 November 2020

चारोळी (प्रेम )

चित्रचारोळी

किमया

नार प्रकटली कणसात मक्याच्या 
मुक्त, लांबलचक केशसंभार शोभे 
पदर पाणांचा चपखल बसला खांद्यावर 
जणू चालली झोकात,असे रानी उभे 

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (कीमया )

चित्रचारोळी

किमया

नार प्रकटली कणसात मक्याच्या 
मुक्त, लांबलचक केशसंभार शोभे 
पदर पाणांचा चपखल बसला खांद्यावर 
जणू चालली झोकात,असे रानी उभे 

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर