Sunday, 28 February 2021

कविता (सूर्यास्त )

अ.भा.शि.साहित्य-कला-मंच

मासिक काव्यलेखन स्पर्धेसाठी कविता

विषय- अशा सांजवेळी

शिर्षक- सूर्यास्त

विचार आले अशा सांजवेळी 
आवर्तने घेत मनामनातून
पाहून सुर्यास्त आकाशात
सौंदर्य भरले कणाकणातून

फिरती माघारी घरट्याकडे
खग फडफडवती पंख ओढीने
आस मनाला सान पिलांची
राहती सहकार्य अन् गोडीने

ओढ आईची लेकराला
माता आगतिक संसारासाठी
दिवस बुडण्याची भिती मनात
धडपड करी पोहचण्यासाठी

छटा सोनेरी तरुवरी फुलल्या
आसमंती लालीमा पसरली
दृश्य मनोहर पाहून हसली
धरा रोमहर्षित पहा झाली

शिणलेल्या मनाला हवा विसावा
पारावर गोतावळा जमला 
जाणून घेतले सुखदुःख सारे 
मनोभावनांचा निचरा झाला

आयुष्याच्या सांजवेळी 
हिशोब जीवनाचा केला
आपलेच संचित आपल्या हाती
सारा कर्तृत्व कर्माचा बोलबाला

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 21 February 2021

चारोळी ( भाषा )

उपक्रम

चारोळी
विषय- भाषा

माध्यम संपर्काची भाषा 
देवाणघेवाण भावभावनांची 
प्रकार जरी अनेक तरी 
जोडते तार मनामनांची 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी (मुक्तसंचार )

चित्रचारोळी

मुक्त संचार

निरभ्र आकाशी घेती भरारी
 करी मुक्त संचार उघडून पर
अलगद उघडून कर प्रेमाने
जाती पाखरे आनंदाने वर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( धुरळा )

धुरळा

कामाचा असो वा मातीचा
धुरळा हा उडतोच उडतो
कीतीही गेला वर जरी 
शेवटी खाली धरतीवरच पडतो

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू (नवी पहाट )

उपक्रम

हायकू

विषय- नवी पहाट

नवी पहाट
सोनेरी किरणांची
सुखवायची

लाल केसरी
लालीमा पसरली
प्राची हसली

जागी अवनी
कामात चराचर
भरे उदर

व्यायामासाठी
योगासने करती
फिरण्या जाती

आरोग्य लाभे
लवकर उठणे
खूप जगणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता (वसंत ऋतू )

साप्ताहिक लेखन स्पर्धेसाठी

विषय- वसंतोत्सव करू साजरा

काव्यप्रकार- दशाक्षरी

शिर्षक- वसंत ऋतू

आला ऋतू वसंत हा आला.
वर्षावत सुंदर फुलांना.
सोनपिवळी पालवी आली,
हलकेच निष्पर्ण झाडांना.

बरसात रंगाची न्यारीच,
रंगीबेरंगी सुमने भारी.
सुगंधित आसमंत वाटे,
तन सहजच दु:खहारी.

सजली धरा हिरवाईने,
सर्वां भासे नववधूसम.
भास्कराच्या भेटीने लाजली,
आहे तिचाच तो प्रियतम.

आम्रतरूवर  बोले मैना,
मंजूळ ताल भुलवी मना.
चैत्राचे चैतन्य बहरले,
चराचर मोदे घेई ताना.

लोचनी सौंदर्य प्रसवले,
कलिकांची पुष्पे फुलारली.
वातावरणी मोद पसरे,
अवनी सारी धुंदच झाली.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 11 February 2021

चित्रहायकू ( फुलपरडी )

चित्रहायकू

फुलपरडी

रंगीबेरंगी
विविध रंगी फुले
गच्चीत डुले

नक्षी सुंदर
कलाकारी नाजूक
पेलते हुक

 फुलांची कुंडी
 चारी बाजू बांधली
छान टांगली

लाल पांढरी
 पुष्पे टवटवीत
सर्वां हवीत

हिरवी पाने
मधून डोकावती
लवलवती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 10 February 2021

हायकू (खट्याळ सांज )

हायकू

खट्याळ सांज

मना भावते
खट्याळ सांज भारी
आनंद उरी

वारा वाहतो
चराचर हलते
धुंद डोलते

सूर्यास्त वेळ
पक्षी निघाले घरा
छान आसरा

गुराखी चाले
सोबती जनावरे
रानात चरे

निस्तेज झाली
टवटवीत फुले
वेचती मुले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 7 February 2021

कविता, अष्टाक्षरी (आयुष्याच्या संध्याकाळी )

काव्यस्पंदनी रविवारीय चित्रकाव्य स्पर्धा

अष्टाक्षरी

शिर्षक- आयुष्याच्या संध्याकाळी


दोन जीव असहाय
चालतात रस्त्यावर
आयुष्याच्या संध्याकाळी
भार झाले मुलांवर

हात धरून हातात
एकमेकां सांभाळती
अनवाणी पाय त्यांचे
पहा उन्हात पोळती

काठी आहे आधाराला
तोल तीच सावरते
वृद्धत्वाने आपसूक
काया ही थरथरते

खांदे झुकले वयाने
देही खुणा वार्धक्याच्या
सोबतीला ताठ मान
स्वाभिमानी पावलांच्या

शुभ्र अनुभवी केस
वस्त्र पाहता ढगळी 
नाही कदर कुणाला
रीत ही जगावेगळी

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर