Monday, 30 June 2025

मिरची मोर (चित्रकाव्य)

विषय- चित्रकाव्य

शिर्षक - मिरची मोर

कलाकृती सुंदर साकारली 
मनाला सहज मोहवून गेली 
हिरवा मिरची मोर पाहता 
आजीच्या गाली कळी खुलली 

गोलाकार मोर साकारला 
मिरच्यामधून कौशल्य साकारले 
कल्पना आजीची मना भावली 
मांडणीतून तिच्या ते उतरले 

सुबकता पाहता मन आनंदले 
तिखट मिरची लोचनी सुखावे 
पिसाऱ्यासह अंग चितारले 
पाहताना वाटे बघतच रहावे 

शिल्लक दिसे डालग्यात मिरची
बाजूला ढीग दिसतो कशाचा?
लाल तिखट दिसते वाटीत 
तो कुठे अन् कसा वापरायचा? 

शेजारीच ठेवलयं पाणी प्यायला 
पेरू ठेवलेत तोंडी लावायला 
लवकर लवकर सारे या 
कौतुक आजीचे करायला

संदेश यातून एकच मिळतो 
नकारात्मकता घालवायची
तिखट सौंदर्य साकारून 
सकारात्मकता मिळवायची

कवयित्री 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे 
कुरुंदवाड. जिल्हा कोल्हापूर 
९८८१८६२५३०

Friday, 13 June 2025

जागतिक पितृ दिवस

जागतिक पितृ दिवस 

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे वचन आपण नेहमीच ऐकत असतो. यातून आपल्या आईची महती व्यक्त केली जाते. आई आणि वडील हे दोघेही घराचा, कुटुंबाचा आधारस्तंभ असतात.जसं आईविना भिकारी असं म्हटलं जातं तसंच वडिलांच्या विना हे जग त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत दुःखदायी, वेदनादायी असते हे ज्याला वडील नाहीत त्याला जाणवते. बाबा या शब्दातच फार मोठा आधार आहे. यासाठीच दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक पितृ दिन हा साजरा केला जातो. 
हा दिवस साजरा करण्या पाठीमागचा उद्देश हाच की आपल्या वडिलांच्या प्रति आपली प्रेमाची भावना व्यक्त करणे.त्यासाठी आपण आपल्या वडिलांना काहीतरी चांगले गिफ्ट देणे किंवा त्यांना जे काही चांगले वाटेल त्या पद्धतीने कृती केली पाहिजे, जेणेकरून आपल्या वडिलांना आनंद, समाधान वाटेल. हे फक्त एका दिवशीच करायचे असे नाही पण प्रतिनिधीक स्वरूपामध्ये आपण हा दिवस साजरा करत असतो. ज्या घरामध्ये वडील असतात त्या घरामध्ये नेहमी एक प्रकारचे संरक्षीत वातावरण असते. काहीही झाले,कितीही संकटे आली तर आपले वडील  त्यापासून आपली मुक्तता करतील हा एक आंतरिक आत्मविश्वास सर्वांच्या मनामध्ये असतो. ज्या घरामध्ये वडील असतील त्या घराकडे वाकडी नजर करून बघण्याची ही कोणाची हिंमत नसते. कारण त्यांना माहीत असते की वडील हे त्या घरची संरक्षक भिंत असतात, कर्ते पुरुष असतात. ते त्या घरच्या लोकांच्या डोक्यावरचे एक आधाराचे छप्पर असतात. लहान लहान संकटासाठी आपण आपल्या आईचा आधार घेऊन त्यातून बाहेर पडू शकतो पण जेव्हा मोठे संकट येते त्यावेळेला बाबांचीच म्हणजे आपल्या वडिलांचीच आठवण येते व त्यांची गरज भासते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. वडील हे असे व्यक्तिमत्व आहे की जे स्वतः कितीही दुःखी असले तरीही ते दुःख आपल्या कुटुंबासमोर ते कधीही व्यक्त करत नाहीत कारण त्यांना माहिती असते की आपण जर खचलो,दु:खी झालो तर आपल्यावर अवलंबून असणारे हे सर्वजण कुणाकडे पाहतील? त्यामुळे जेव्हा वडील दुःखी असतात तेव्हा ते बाजूला जाऊन रडतील, आपले दुःख प्रकट करतील पण कोणासमोर आपली हतबलता व्यक्त करत नाहीत. यासाठी आपण आपल्या वडिलांना समजून घेतले पाहिजे त्यांच्या भावभावनांचा विचार केला पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावर पाहून त्यांच्या मनामध्ये काय चालले आहे हे समजून घेतले पाहिजे. यासाठी आपलं आपल्या वडिलांच्या बरोबरच नातं अत्यंत घनिष्ठ आणि जवळच पाहिजे. हे केव्हा घडेल? जेव्हा आपण आपल्या वडिलांच्या बद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारची सन्मानाची, आदराची भावना ठेवू तेव्हाच हे घडेल. बाप कितीही गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी ते सतत झटत असतात. त्यांच्या भल्याचा विचार करत असतात व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही कशी पुढे जाईल त्याला कसा समाजामध्ये मानसन्मान मिळेल हाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी घोळत असतो. आज समाजामध्ये आपण पाहतो की वडिलांच्या विना अनेक कुटुंबे आपले जीवन व्यतीत करत असतात.कुटुंबातील स्त्री ही सक्षम असेल तर ते कुटुंब व त्या कुटुंबातील व्यक्ती, मुले ही निर्धास्तपणे राहू शकतात पण जर त्या घरातील स्त्रीकडे कोणतेही काम नसेल, पैसा मिळवण्याचे साधन नसेल, ती कुठेही नोकरी करत नसेल तर त्यांचे हाल त्यांनाच माहीत, कारण त्यांना प्रत्येक लहान सहान गोष्टींवर दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते यावेळी त्या स्त्रीला किंवा तिच्या मुलांना तिच्या पतीची किंवा त्या मुलांना आपल्या बाबांची पावलोपावली आठवण येत असते.
लहान मुल सुद्धा प्रत्येक पुरुषांमध्ये आपल्या बाबाला पाहत असते. व त्यांच्याकडे झेपावून ते आपल्याला कधी उचलून घेतील आपल्याला फिरवून आणतील अशी एक भाबडी अशा त्याच्या मनामध्ये दिसत असते. लहानपणापासूनच नकळत मुलांच्या मनावर बाबा बद्दलची एक आधाराची भावना नकळत तयार होत असते.
मला माझ्या बाबांच्या बद्दल खूप अभिमान आहे. माझे वडील श्री.भूपाल तातोबा दिवटे हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे जीवन कोणालाही आदर्श घेण्यासारखेच आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले व माझ्या आईला म्हणजे पुष्पा भूपाल दिवटे हिलाही त्यांनी लग्नानंतर शिक्षण देऊन नोकरी मिळवून दिली. तिला तिच्या पायावर उभे केले. घरातील विरोधाचा सामना करत त्यांनी हे सर्व पूर्ण केले. राष्ट्रसेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे त्यांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व माहिती होते. त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वतःकृती केली. घरामध्ये समानतेची वागणूक दिली. आम्हा मुलांच्यावर त्यांचा आदरयुक्त धाक होता. अभ्यासाच्या बाबतीत मात्र त्यांनी कधीही आमच्यावर दया दाखवली नाही. त्यामुळेच आज आम्ही भावंडे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. पेशाने शिक्षक असल्यामुळे त्यांना आपल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल अति आत्मीयता होती. त्यांचा सर्व वेळ हा शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेतच जायचा. आपला विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये नेहमीच चमकत राहिला पाहिजे ही त्यांची उर्मी त्यांना कधीही स्वस्त बसू देत नव्हती. शाळा सुटायच्या आधी व शाळा सुटल्यानंतरही ते स्कॉलरशिपचे जादा तास घेत असत. त्यांची क** शिस्त व शिक्षणावरील प्रेम व विद्यार्थ्यांच्या बद्दलची मनामधली अस्मिता यामुळेच कित्येक विद्यार्थी त्यांचे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत व आज ते मोठमोठ्या मुद्द्यावर कार्यरत आहेत. त्यांची जिथे जिथे बदली होईल तिथे त्यांनी त्या शाळेचे नंदनवनच केलेले आहे. शैक्षणिक कार्याबरोबर समाजकार्याचीही त्यांना आवड होती. शिक्षक संघटनेचे कार्यही अत्यंत जोमाने करत होते. नरसोबावाडी च्या श्री गुरुदेव दत्त यांच्यावर त्यांची प्रगाढ  श्रद्धा असल्यामुळे त्यांनी दत्तगुरुंवर लिखाण केले आहे. त्यांना वाचनाची खूप आवड असल्यामुळे त्यांनी खूप वाचन केले. याचाच परिणाम त्यांची लेखणीही चालू लागली. त्यांच्या हस्ताक्षरही मोत्याप्रमाणे सुंदर आहेत. आपले आई बाबा हेच आपले मार्गदर्शक, दिशादर्शक असतात ते जसे वागतात त्याप्रमाणेच त्यांची मुले वागत असतात. त्या पद्धतीने आमच्या वडिलांचे हस्ताक्षर पाहून आम्हा तिन्ही भावंडांचे  हस्ताक्षर सुंदर आहेत. याचा उपयोग आम्हाला आमच्या नोकरीच्या कालावधीमध्ये खूप होतो. त्यांचे विद्यार्थी हे मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत पण त्यांनी लावलेल्या जिव्हाळ्यामुळे ते कुठेही असले व घरी आले की ते आमच्या वडिलांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत याशिवाय दुसरे एका शिक्षकाला काय हवे? त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना वडिलांची माया लावली यामुळेच हे शक्य झाले. आज ते सुखी समाधानी आहेत. आजारपणामुळे आज त्यांच्यावर बंधने आलेली आहेत, पण नेहमी सतत मनामध्ये दुसऱ्यांच्या चांगल्या चा विचार करणे, त्यांच्याबद्दल प्रेमभावना ,आदर भावना व सद्भावना व्यक्त करणे हे ते करत असतात. ज्याच्या घरात आई वडील सुखी समाधानी ते घर एका मंदिराप्रमाणे पवित्र असते. ते भाग्य आम्हाला लाभले. खरंच आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. पण समाजामध्ये, बाहेरच्या जगामध्ये जेव्हा मी पाहते तेव्हा अनेक वेळेला मनाला दुःख, वेदना होतात. 

आज जेव्हा वृद्धाश्रमाकडे पाहतो त्यावेळी असे दिसते की या वृद्धाश्रमामध्ये असणारे जे पुरुष आहेत ते कोणाचे तरी वडील असतील पण त्यांच्या मुलांनी त्यांना या वृद्धाश्रमात आणून दाखल केलेले असते. अशावेळी मला असे म्हणावेसे वाटते की ही मुले बाबा शिवाय जीवन कसे जगतात? हे त्यांच्या कपाळकरंटेपणाचेच लक्षण म्हणावं लागेल. अशा लोकांना माझी एवढेच सांगणे आहे की तुम्ही काय करत आहात? आपल्या मुलांच्या समोर कोणते उदाहरण ठेवत आहात? उद्या तुमचा भविष्य असेच असणार आहे कारण तुम्ही तुमच्या मुलांना असेच संस्कार देत असणार असाल तर आज तुम्ही तुमच्या वडिलांना जर बघत नसाल तर उद्या तुमची मुलेही तुम्हाला नक्कीच बघणार नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे. समाजामध्ये याबद्दलची जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्वांच्या मनामध्ये आपल्या वडिलांच्या बद्दलची कृतज्ञतेची भावना सतत व्यक्त होत राहिली पाहिजे. जेणेकरून आपले वडील आपल्या कुटुंबाकडे पाहून आपल्या कुटुंबातील व्यक्तींची आपल्यावरील प्रेम पाहून कृतार्थपणे जगतील.
मला माझ्या बाबांच्या बद्दल एवढेच म्हणावेसे वाटते
  देवतुल्य माझे आई बाबा,
  नाही दुजा इथे स्थान.
  सर्वस्वाची देऊन आहुती,
  राखीन सदैव त्यांचा मान.
जागतिक पितृ दिनाच्या वडिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.


          माझे बाबा

प्रेमस्वरुप सिंधु ,
आहेत माझे बाबा.
मनावर असतो आमच्या ,
नेहमीच त्यांचा ताबा .

धीरगंभीर संयमी चेहरा,
प्रोत्साहनप्रसंगी होतो हसरा
संदेश जीवनी स्वताः देतसे,
साधी राहणी अंगीकारा .

लेखणीवर आहे ताबा ,
हस्ताक्षर जसे सुंदर मोती.
पाहताच मन मोहून जाते ,
सकलजन निरखून पाहती.

शिक्षणक्षेत्र पवित्र केले ,
विद्यार्थीप्रीय सदा सर्वदा .
निस्वार्थी सेवा विद्यामंदिरात
ज्ञानदानात मग्न सदा .

समाजसेवा पिंड तयांचा,
करुणासागर मायेचा ,सेवेचा
कर्तव्यदक्ष , प्रेरणास्फूर्ती ,
आदर्श व्रतस्थ जीवनाचा .

लेखिका 
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड 
९८८१८६२५३०