मानवतेची सेवा
अध्यक्ष महोदय,पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्र-मैत्रीणींनो आज मी आपल्यासमोर मानवतेची सेवा या विषयावर माझे विचार आपणासमोर मांडत आहे.
मानवता म्हणजे मानवाने एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या सुखद:खात सहभागी होणे,त्यांना मदत करणे होय.आपण सर्वांनी एकमेकांशी मानवतेने वागले पाहिजे. घरात मोठ्यांच्या बरोबर बोलताना, वागताना हसत त्यांचा मान ठेवून बोलले पाहिजे.तुम्हाला माहिती आहे का की आपणसुद्धा दररोज मानवतेची सेवा सहज करु शकतो ते? तुम्ही म्हणाल ते कसे काय ? सांगते ऐका.आपण दररोज शाळेत जाताना,संध्याकाळी बाहेर फिरायला जाताना अनेक गरजू व अडचणीत असलेली लोकं पाहतो. व तसेच पुढे जातो. पण जर का आपण या अशा लोकांना मदत केली तर ? म्हणजे जर एखादी आंधळा मनुष्य रस्त्यावरून जात असेल,कींवा त्याला रस्ता पार करायचा असेल तर आपण त्यांना रस्ता पार करण्यासाठी मदत करु शकतो.आजी-आजोबांना मदत करु शकतो.त्यांना त्यांच्या वस्तू शोधून आणून दिली तर त्यांना खूप आनंद होतो.त्याच्याजवळ बसछन गप्पा मारल्या तर त्यांचा वेळही छान जातो.आपल्या वर्गात एखाद्या गरीब मुलगा कींवा मुलगी असेल तर त्यांना मदत करु शकतो.त्यांना हव्या असलेल्या पण त्यांना मिळत नसलेल्या वस्तू घेऊन देऊ शकतो.आपल्या लहान भावंडाना समजावून घेऊन वागले तर आपल्या आपल्यात भांडणे होत नाहीत. घरात शांतता राहते.आपल्या आईवडिलांना आनंद वाटतो.वर्गात दंगा न करता ,मित्र-मैत्रिणी बरोबर न भांडता अभ्यासात लक्ष दिले तर बाकीचेपण तसेच करतील. आपल्याला जास्त मार्क मिळतील व आपला विकास होईल. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण विनाकारण पैसा खर्च करतो.त्याऐवजी जर एखाद्या अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्यासोबत आपला वाढदिवस साजरा करुन त्यांना गोड जेवण दिले. त्यांना काय हवे ते पाहून त्यांना मदत केली तर वाढदिवस साजरा केल्याचा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळेल.
अशा प्रकारे विविध मार्गांनी आपण मानवतेची सेवा करु शकतो.हवी फक्त इच्छाशक्ती. मनापासून करायची भावना हवी. तर आपण सारे सज्ज होऊया मानवतेच्या सेवेसाठी. चला तर मग.धन्यवाद.